रायपाटणमध्ये १८ला
खुली वेशभूषा स्पर्धा
राजापूर ः तालुक्यातील रायपाटण येथे जागृत सेवा मंडळाच्यावतीने अक्षय तृतीयेच्या निमित्ताने १८ एप्रिलला गावमर्यादित खुली वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा श्री वडचीआई मंदिरातील स्व. चंद्रभागा तुकाराम गांगण सभागृहात रात्री ८ वा. होणार आहे. सर्व वयोगटातील पुरुष व महिलांसाठी स्पर्धा खुली आहे. प्रथम क्रमांकासाठी ३००१ रुपये, द्वितीयसाठी २००१ रुपये, तृतीयसाठी १५०१ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच पाच उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी ५०१ रुपये देण्यात येतील. रायपाटणवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पनवेलमध्ये रविवारी
सत्यशोधक परिषद
खेड ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (रायगड) यांच्यावतीने १२ एप्रिलला नवीन पनवेल येथे कोकण विभागीय सत्यशोधक परिषद आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयात परिषद होईल. महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष, दि. बा. पाटील जन्मशताब्दी समारोप आणि चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार सुरेश म्हात्रे उद्घाटन करणार असून, माधव बावगे अध्यक्षस्थानी असतील. सामाजिक परिवर्तनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
एम-सँड युनिटसाठी
इच्छुकांनी अर्ज करा
रत्नागिरी ः नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून ‘एम-सँड’ (कृत्रिम वाळू) उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यशासनाने नवीन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एम-सँड युनिट उभारण्यास इच्छुक असलेल्या व्यक्ती आणि संस्थांनी एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. ज्या युनिटधारकांनी यापूर्वी ‘महाखनिज’ या संगणक प्रणालीवर अर्ज केले आहेत त्यांना आता पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. पायाभूत सुविधांच्या विकासात वाळूची भूमिका महत्त्वाची आहे; मात्र, नद्यांचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून एम-सँडचा वापर वाढवण्याचे धोरण महसूल व वनविभागाने १७ जुलै आणि २७ ऑक्टोबर २०२५च्या शासननिर्णयानुसार निश्चित केले आहे. या धोरणाबाबतची सविस्तर माहिती खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व उपविभागीय आणि तहसील कार्यालयांत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.