आधी कासवांचे संरक्षण
मगच किनारपट्टीवर बांधकाम!
संवर्धनासाठी पाऊल; कांदळवन समितीकडून किनाऱ्यांची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर होणाऱ्या अनियोजित धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांमुळे सागरी कासवांच्या प्रजननात अडथळे निर्माण होत आहेत. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने कोकण किनारपट्टीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यापूर्वी कांदळवन कक्षाचे ‘नाहरकत प्रमाणपत्र’ घ्यावे, असे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई कांदळवन कक्षाच्या समितीने किनाऱ्यांची पाहणी केली असून, त्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणच्या परीसरातील बंधाऱ्याचा भाग सोडून पुढील कामे करावी लागणार आहेत. याला कांदळवन विभागाकडून दुजोरा मिळाला आहे.
रत्नागिरीतील भाट्ये, नेवरे आणि आडे यांसारख्या महत्त्वाच्या घरट्यांच्या जागांवर उभारण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतींमुळे कासवांना अंडी घालण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. याची दखल घेत कांदळवन कक्षाने तज्ज्ञांची एक समिती नियुक्त केली होती. कांदळवन कक्षाच्या मरिन बायोलॉजिस्ट धनश्री बगाडे, सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये, सहाय्यक उपजीविका तज्ञ अभिनय केळसकर या समितीने संपूर्ण किनारपट्टीची पाहणी केली. अनियोजित खडक आणि भिंतींमुळे कासवे अंडी न घालताच समुद्रात परत जात असल्याचे निरीक्षण या समितीने नोंदवले. त्यांच्या अहवालानंतर कासवे अंडी घालण्याची ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. त्या भागातील बंधाऱ्याचे काम सोडून उर्वरित बंधारा पूर्ण केला जाईल.
कांदळवन कक्षाच्या सूचनेनुसार, प्राधिकरणाने १९४ व्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. यापुढे गणपतीपुळे, माखजन खाडी, राजीवाडा आणि भाट्येसारख्या संवेदनशील भागात संरक्षण भिंती बांधण्यापूर्वी कांदळवन कक्षाची संमती आवश्यक असेल. ज्या ठिकाणी कासवांच्या अंडी घालण्याची नैसर्गिक ठिकाणे आहेत तेथील बंधाऱ्यांची कामे थांबवायची आहेत. संबंधित ठिकाणचा पर्यावरणपूरक आराखडा असल्याशिवाय परवानगी दिली जाणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.
चौकट
संवर्धनाला बळकटी
सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी केली जात आहे. कासवांच्या अधिवासाचे रक्षण करताना किनारपट्टीची धूप कशी थांबवता येईल, या दृष्टीने तांत्रिक माहिती संकलित केली जात आहे. कांदळवन कक्षाच्या निर्णयामुळे सागरी जैवविविधतेच्या संवर्धनाला मोठी बळकटी मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.