दापोली-पुणे स्लीपर बसमुळे प्रवाशांना भुर्दंड
वाढीव तिकिटामुळे नाराजी; २०५ रुपये अधिक, साध्या बसची मागणी
दापोली, ता. ७ ः पश्चिम महाराष्ट्राशी दापोलीचा संपर्क पूर्ववत करण्यासाठी दापोली–पुणे एसटी बससेवा पुन्हा सुरू केली असली तरी साध्या बसऐवजी स्लीपर (शयनयान) बस सुरू केल्यामुळे प्रवाशांवर आर्थिक बोजा पडत आहे. साध्या बसच्या तुलनेत थेट २०५ रुपये अधिक मोजावे लागत असल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि नियमित प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या मार्गावर तातडीने पूर्ववत साधी बस सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी, भोर आणि आंबेनळी हे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे प्रमुख घाटमार्ग एकाच वेळी बंद झाले होते. त्यामुळे दापोली आगाराच्या पुणे मार्गावरील आठ फेऱ्यांसह ई-शिवाई, स्लीपर बस आणि इतर लांब पल्ल्याच्या शिर्डी, छत्रपती संभाजीनगर सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या होत्या. परिणामी, प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आणि अनेकांना मुंबईमार्गे अधिक खर्चिक व वेळखाऊ प्रवास करावा लागला. घाटमार्गावरील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १२ जुलैपासून दापोली–खेड–पाली–खोपोलीमार्गे सकाळी ७.४५ वा. पुणे बससेवा पूर्ववत सुरू केली. या मार्गावर साधी बस चालवण्याचे नियोजन असताना प्रत्यक्षात मात्र स्लीपर बस धावू लागली.
चौकट
आर्थिक फटका आणि असंतोष
सध्या दापोली ते पुणे साध्या बसचे भाडे ५७५ रुपये असताना, स्लीपर बससाठी ७८० रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला नाहक २०५ रुपये जास्त द्यावे लागत आहेत. या संदर्भात प्रवाशांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन साधी बस उपलब्ध करून देण्याची विनंती केली; मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. भाडेवाढीमुळे कंटाळून अनेक प्रवासी खासगी वाहनांचा पर्याय शोधत आहेत.
कोट १
दापोली–पुणे मार्गावर साध्या बसऐवजी स्लीपर बस चालवून सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांची लूट सुरू आहे. एसटी महामंडळाने या निर्णयाचा तत्काळ फेरविचार करून साधी बस सुरू करावी, अन्यथा प्रवाशांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- मंगेश मोरे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.