59516
न्यायासाठी पोलिस अधीक्षकांना साकडे
मालवणातील गैरव्यवहार; सोने घेऊन फसवणूक प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : शहर परिसरात सोने तारण योजनेच्या नावाखाली झालेला कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार आणि फसवणूक प्रकरणी पीडितांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट घेत या प्रकरणात तात्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. पीडितांचे मूळ दागिने किंवा योजनेनुसार देय असलेली रक्कम त्वरित परत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
परिसरातील अनेक महिलांसह नागरिकांचे सोने आमिष दाखवून एका योजनेअंतर्गत जमा केले होते. सोने सुरक्षित राहील, त्यावर नियमित परतावा मिळेल आणि आवश्यकतेनुसार दागिने परत दिले जातील, असे आश्वासन पीडितांना दिले होते. या विश्वासावर नागरिकांनी आपल्या आयुष्यभराचे कष्टाचे दागिने तारण ठेवले; मात्र, त्यानंतर पीडितांच्या संमतीशिवाय किंवा अपरोक्षपणे त्यांच्या नावावर गोल्ड लोन, टॉप-अप, रिप्लेसमेंट आणि इतर कर्ज व्यवहार करण्यात आले. काही प्रकरणांत कर्जाची रक्कम जमा करून घेऊनही पीडितांना त्यांचे मूळ दागिने परत दिले जात नसल्याचे प्रकार आता समोर आले आहेत.
उपलब्ध पुरावे, कागदपत्रे आणि जबाबांच्या आधारे फसवणूक, विश्वासाने सोपवलेल्या मालमत्तेचा गैरवापर, बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा गैरवापर अशा गैरव्यवहार प्रकरणी संबंधित सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कलमांखाली त्वरित गुन्हे दाखल करावेत. जानेवारीपासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर सोने जमा झाले असून प्रति तोळा प्रति आठवडा ५ हजार रुपये परतावा देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे किती सोने जमा झाले आणि कोणाचे किती पैसे बाकी आहेत, याचा पीडितनिहाय अधिकृत हिशोब तपासावा आणि देय रक्कम मिळवून द्यावी. जर योजनेतील परतावा देणे शक्य नसेल, तर पीडितांची सर्वात प्राथमिक मागणी म्हणजे त्यांचे स्त्रीधन व मूळ सोन्याचे दागिने शोधावेत, त्यांची मालकी पडताळून ते तात्काळ संबंधित पीडितांना परत करावेत. पीडित व्यक्ती, दागिने, लोन अकाउंट, लोन अमाउंट, बँक अकाउंट, कॅश ट्रान्सफर व अंतिम लाभार्थी या संपूर्ण तपासाची साखळी लावून पैशांचा आणि दागिन्यांचा माग लावावा, अशी मागणी केली. यावेळी माधुरी प्रभू, सिया धुरी, कविता मोंडकर, नमिता आडकर, नीता रोगे, सेजल परब, हिना केळुसकर, दीपिका घारे, पूजा सरकारे, अर्चना आचरेकर, सचिन तारी, कल्पेश रोगे, दिलीप घारे, भूषण आडकर, दीक्षिता रोगे, दाजी जोशी, रविकिरण तोरसकर, रुपेश प्रभू आदी उपस्थित होते.
-------------
न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार
‘‘आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाही, पण आमच्यावर झालेला अन्याय सहन करणार नाही. हे दागिने महिलांचे स्त्रीधन आणि आयुष्यभराची कमाई आहे. तपास यंत्रणेला आमचे पूर्ण सहकार्य राहील, पण न्याय मिळेपर्यंत आमचा कायदेशीर लढा असाच सुरू राहील,’’ असा इशारा यावेळी पीडितांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.