लोकशाही दिन
सात सप्टेंबर रोजी
रत्नागिरी ः सप्टेंबरचा लोकशाही दिन ७ सप्टेंबरला दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात होणार आहे. जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. लोकशाही दिनाकरीता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात. लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात १५ दिवस आधी २ प्रतीत पाठवणे आवश्यक राहील.
----------
नवभारत हायस्कूलमध्ये
सापांवर प्रबोधनपर व्याख्या
खेड ः भरणे येथील नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी साप, सापांचे जीवन आणि सापांविषयीच्या अंधश्रद्धा, या विषयावर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात होते. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर, जिल्हा कार्याध्यक्ष नंदलाल शिंदे, वैज्ञानिक जाणीवा प्रमुख नियती गोवळकर, भिकू गोवळकर हायस्कूलचे शिक्षक उपस्थित होते. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतातील उंदीर साप खात असतो. सर्वच साप विषारी नसतात. सापांच्या विविध प्रजाती, त्यांचे अधिवास, सापांचे पर्यावरणातील महत्त्व, विषारी व बिनविषारी साप यांतील फरक तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती गोवळकर यांनी दिली. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयीची भीती कमी करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यात आला.
---------------------
फलोत्पादन अभियानाचा
लाभ घ्या ः सदाफुले
रत्नागिरी ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासह अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. या योजनेंतर्गत रोपवाटिका स्थापन करणे, क्षेत्रविस्तार तसेच स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, पॅशन फ्रूट, किवी, अव्हेकॅडो, अननस, पपईसारख्या फळपिकांची लागवड यासाठी लाभ दिले जाणार आहेत. तसेच विशेष शेती व उत्पादन, पाणी व संरक्षित शेतीतून सामूहिक शेततळे व हरितगृह यासाठी निधी दिला जाईल. प्लास्टिक मल्चिंग, फळांच्या घडांचे कव्हर, तण नियंत्रक आच्छादन याचाही योजनेत समावेश आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी जवळच्या ''आपले सरकार सेवाकेंद्रा''मध्ये जाऊन किंवा थेट महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदवू शकतात, असे सदाफुले यांनी सांगितले.
-----------
उपाध्याय योजनेसाठी
अर्ज उपलब्ध
रत्नागिरी ः उच्चशिक्षण घेत असताना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्यावतीने ''ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना'' तसेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ''पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना'' राबवण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली असून, पात्र विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. या योजनेसाठी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग तसेच धनगर समाजातील विद्यार्थी पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahsit.org/ या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आणि सोबत जोडलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची एक छायांकित प्रत (झेरॉक्स) रत्नागिरी येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावयाची आहे. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.