59580
मालवणात स्त्रीरोग तज्ज्ञाअभावी रुग्णांचे हाल
मनसेची खंत; वैद्यकीय अधीक्षकांकडे सुविधांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वाचे उपचार केंद्र असलेल्या मालवण शासकीय रुग्णालयातील गैरसोयींचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. गेल्या १२ दिवसांपासून रुग्णालयात एक्स-रे तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने महिला रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विस्कळीत कारभाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देऊन तातडीने सोयी-सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
विविध आजार आणि दुखापतींच्या अचूक निदानासाठी एक्स-रे तपासणी अत्यंत अत्यावश्यक असते. मात्र, तंत्रज्ञ नसल्याने रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना खासगी रुग्णालये किंवा इतर केंद्रांचा रस्ता धरावा लागत आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर नाहक आर्थिक भार पडत आहे. शासकीय रुग्णालयात येऊनही रुग्णांना बाहेर पडावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी निवेदनात नमूद केले.
रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने विशेषतः गर्भवती महिला आणि स्त्रीरोगाशी संबंधित इतर रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. महिलांच्या आरोग्याशी संबंधित तपासण्या आणि उपचार वेळेत मिळणे अत्यंत गरजेचे असताना, तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपलब्धता चिंताजनक ठरत आहे. शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या हक्काचे केंद्र आहे. येथे उपचारांऐवजी रुग्णांना खासगी रुग्णालयांत जावे लागत असेल, तर ही प्रशासकीय अनास्था आहे असे निवेदनात म्हटले आहे. मागील १२ दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ का उपलब्ध नाही, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने तात्काळ द्यावे. एक्स-रे तंत्रज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञांची तातडीने उपलब्धता करून रुग्णांची अडचण दूर करावी, अशी मागणी केली.
---
कायमस्वरूपी उपाययोजना करा!
भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. रुग्णांच्या जिवाशी निगडित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने केवळ पोकळ आश्वासने न देता प्रत्यक्ष डॉक्टर आणि तंत्रज्ञ उपलब्ध करून दिलासा द्यावा, अशी तीव्र अपेक्षा आता स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.