उपविभागीय पोलिस
अधिकारीपदी यादव
रत्नागिरी ः रत्नागिरी येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून अरांशा यादव यांची नियुक्ती केली आहे. सध्या त्या कोल्हापूर येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे रत्नागिरीच्या पोलिस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. यादव या मूळच्या हरियाना राज्यातील आहेत. त्यांनी दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून इंग्रजी ऑनर्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पोलिसदलातील प्रशासकीय, तसेच कायदा-सुव्यवस्था हाताळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कोल्हापूर येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
--------
पोफळी शाळेत
मंगळागौर उत्साहात
चिपळूण ः येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळेत श्रावणातील मंगळागौर उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणलेल्या पाना-फुलांनी देवीची आकर्षक आरास करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. प्रतिभा धुमाळ यांनी मंगळागौरीचे महत्त्व सांगितले. पूजा झाल्यानंतर मुख्याध्यापक महेंद्र कापडी यांनी शुभेच्छा दिल्या. शिक्षिका, पालक व बचत गटातील महिलांच्या उपस्थितीत आरत्या, झिम्मा-फुगडी, विविध खेळ, नृत्य व गाणी असे कार्यक्रम झाले. प्रतिभा धुमाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थ्यांना पौष्टिक गूळ-शेंगदाणा लाडू देण्यात आले. सण-उत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कृतीची ओळख करून देत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा उपक्रम शाळेत राबवला जात असल्याचे सांगण्यात आले.
----------
‘डीबीजे’ महाविद्यालयात
आज संस्कृत दिन
चिपळूण : ‘डीबीजे’ महाविद्यालय आणि संस्कृत भारती यांच्यातर्फे गुरुवारी (ता. २७) संस्कृत दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील वाङ्मय मंडळ, संस्कृत विभाग आणि भाषा-अध्ययन केंद्र यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. संस्कृत भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैशाली केतकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी पावणेअकरा वाजता महाविद्यालयातील सेमिनार सभागृहात होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.