26O64328
एआय चित्र
विद्यापीठांना संशोधनासाठी ७२ कोटी
सूरज मांढरे ः कृषी संशोधन अन् विकास समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १६ ः ‘राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची कार्यपद्धती वेगवेगळी असली तरी ती शेती प्रगतीचे केंद्र आहेत. प्रत्येक विद्यापीठाला संशोधनासाठी ७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बैठकीत मंजूर झालेल्या सर्व शिफारसी हा माझ्यासाठी कृती आराखडा असून, प्रशासकीय स्तरावर त्या वेगाने पूर्ण करण्यावर माझा भर राहील,’ असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले.
येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या तीनदिवसीय ‘संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती’ बैठकीचा समारोपावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैया सभागृहात झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, कृषी विस्ताराची दिशा बदलण्यासाठी ‘शेतकरी ते शेतकरी’ असा तंत्रज्ञानाचा प्रसार होणे गरजेचे आहे. कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयसीएआरच्या धर्तीवर पदोन्नती देण्याचा प्रयत्न असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक ‘इन्क्युबेशन सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे.
या वेळी अकोला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख म्हणाले, ‘भौगोलिक परिस्थिती वेगळी असली तरी शेतकरी समृद्ध करणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा निधी आणि शासनाकडून अटींमध्ये शिथिलता मिळणे गरजेचे आहे.’
राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी ‘शासनाने संशोधनासाठी सातत्यपूर्ण आणि भरीव आर्थिक मदत दिली पाहिजे. सर्व संलग्न विभागांनी एकत्र येऊन ‘खेत बचाओ अभियान’ जोरकसपणे राबवावे,’ अशी सूचना केली.
या कार्यक्रमास विविध कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक अनुक्रमे डॉ. लोढे (पुणे), डॉ. प्रशांत बोडके (राहुरी), डॉ. माने (अकोला), डॉ. आसेवार (परभणी) आणि डॉ. प्रशांत शहारे (दापोली) उपस्थित होते. डॉ. मकरंद करमरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांनी आभार मानले.
---
ध्येयपूर्तीवर भर द्या
‘टीकेकडे दुर्लक्ष करून आपण ध्येयपूर्तीवर भर दिला पाहिजे. शेतीमध्ये पशुपालनाचा समावेश असेपर्यंत परिसंस्था संतुलित राहते. विद्यापीठाच्या शिफारशींचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणी येत नाहीत,’ असे दापोली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.