महावितरणकडून जनावरांच्या
अपघाती मृत्यूभरपाईत मोठी वाढ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) विद्युत वाहिन्या किंवा इतर उपकरणांमुळे घडणाऱ्या अपघातांमध्ये दुभती व कामकरी जनावरे किंवा लहान जनावरे दगावल्यास दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये महावितरणने मोठी वाढ केली आहे. यासंदर्भातील प्रशासकीय परिपत्रक महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले असून हे सुधारित दर तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत.
महावितरणच्या यंत्रणेमुळे होणाऱ्या प्राणांतिक व अप्राणांतिक अपघातांच्या प्रसंगी तातडीची मदत म्हणून देण्यात येणाऱ्या भरपाईबाबत २००८ आणि २०११ मध्ये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, वाढत्या महागाईच्या काळात शेतकरी आणि पशुपालकांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान विचारात घेऊन या रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर आता ही वाढ निश्चित करण्यात आली आहे. सुधारित नियमानुसार गाय, म्हैस, बैल, घोडा तसेच गाढव यांसारख्या मोठ्या किंवा दुभत्या व कामकरी जनावरांचा विद्युत अपघातात मृत्यू झाल्यास आता ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. शेळी, मेंढी तसेच वासरू यांसारख्या लहान जनावरांचा विद्युत अपघातात मृत्यू झाल्यास ५ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येतील. अपघाताच्या घटनेनंतर आर्थिक मदतीचे प्रस्ताव तयार करणे आणि नुकसान भरपाई वाटप करण्याची उर्वरित कार्यपद्धती व पूर्वीच्या परिपत्रकातील इतर नियम पूर्ववत अबाधित राहतील, असेही महावितरणमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.