Paris Olympic 2024 Day 7 Sakal News
क्रीडा

Paris Olympic 2024 Day 7: तिरंदाजीत पदक हुकलं, पण मनू भाकर तिसऱ्यांदा फायनलमध्ये, तर लक्ष्य सेनची आगेकूच; दिवसभरात काय घडलं?

Paris Olympic 2024 Day 7 Result: शुक्रवारी मनू भाकरने २५ मीटर पिस्तुल प्रकारातही अंतिम फेरी गाठली आहे. याशिवाय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि हॉकी संघासाठीही शुक्रवारी मिळवलेले विजय ऐतिहासिक ठरले. एकूण या दिवशी काय निकाल लागले याचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

India in Paris Olympic 2024 Day 7 results: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील सातव्या दिवसाचे खेळ शुक्रवारी झाले. हा दिवस भारतीयांसाठी आनंद-निराशेच्या चढ-उतारांचा राहिला. भारताची नेमबाज मनू भाकरने यंदा तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली, पण भारताचं तिरंदाजीतील पहिलं पदक अगदी थोडक्यात हुकलं.

याशिवाय शुक्रवारी दिवसभरात बॅडमिंटन, ज्युदो, गोल्फ, ऍथलेटिक्स, सेलिंग अशा विविध खेळात भारतीय खेळाडू खेळताना दिसले. एकूणच या दिवशी भारतीय खेळाडूंचे काय निकाल होते, याचा आढावा घेऊ.

नेमबाजी

२२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात क्वालिफायर्समध्ये दुसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने यापूर्वी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात महिलांच्या गटात आणि मिश्र गटात कांस्य पदक जिंकले आहे. त्यामुळे आता तिला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक जिंकण्याची संधी असणार आहे. दरम्यान, तिच्यासह महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात इशा सिंगही उतरली होती. मात्र ती १८ व्या क्रमांकावर राहिली.

याशिवाय नेमबाजीतील पुरुषांच्या स्किट प्रकारातील क्वालिफायर्सचा पहिला दिवस पार पडला. यामध्ये तो २६ व्या क्रमांकावर राहिला.

गोल्फ

गोल्फमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारातील शुक्रवारी दुसरी फेरी झाली. या फेरीत भारताचा शुभंकर शर्मा सध्या संयुक्तरित्या २५ व्या क्रमांकावर, तर गगनजीत भुल्लर ५२ व्या क्रमांकावर राहिला. आता शनिवारी तिसरी फेरी होईल.

तिरंदाजी

तिरंदाजीमध्ये धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत ही जोडी इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकली. त्यांना तिरंदाजीच्या मिश्र गटात कांस्य पदकाच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना कांस्य पदकाच्या सामन्यात अमेरिकेच्या कॅसी कौफहोल्ड आणि ब्रॅडी एलिसन या जोडीने ६-२ अशा फरकाने पराभूत केले.

त्यापूर्वी अंकिता आणि धीरज यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या जोडीला पराभूत केलं होतं. त्यानंतर त्यांनी स्पेनच्या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केलं. पण उपांत्य सामन्यात त्यांना कोरियाच्या जोडीकडून पराभूत व्हावं लागलं.

ज्युदो

भारताचे ज्युदोमध्ये तुलिका मान हिने ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलं. पण तिचा पहिलाच सामना क्युबाच्या दिग्गज ज्युदोका इडॅलिस ऑर्टिझविरुद्ध झाला. या सामन्यात इडॅलिस ऑर्टिझने तुलिकाला पराभूत केल्याने तिचं आव्हान संपलं. इडॅलिस ऑर्टिझ पाचव्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली असून तिने चारवेळा पदकेही जिंकली आहेत.

रोइंग

भारताचा रोवर बलराज पनवार यापूर्वीच पुरुष एकेरी स्कल प्रकारात पदकांच्या शर्यतीतून बाहेर झाला होता. पण त्याचं या प्रकारातील स्थान निश्चित होण्यासाठी शुक्रवारी त्याने फायनल D मध्ये शर्यत केली. यामध्ये तो ०७:०२.३७ सेकंद वेळेसह ५ व्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे तो एकूण २३ व्या क्रमांकावर राहिला.

ऍथलेटिक्स

ऍथलेटिक्समध्ये महलांच्या ५००० मीटर शर्यतीत भारताची पारुल चौधरी आणि अंकिता सामील झाले आहेत. या प्रकारातील पहिली फेरी शुक्रवारी झाली. यामध्ये अंकिता पहिल्या हिटमध्ये १६:१९.३८ सेकंद वेळ नोंदवत २० व्या क्रमांकावर राहिली, तर पारुल चौधरी दुसऱ्या हिटमध्ये १५:१०.६८ सेकंद वेळ नोंदवत १४ व्या क्रमांकावर राहिली.

दरम्यान, प्रत्येक हिटमधील केवळ ८ खेळाडूच पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणार असल्याने अंकिता आणि पारुल या दोघींनाही पुढच्या फेरीत जाता आले नाही.

पुरुषांच्या गोळाफेक क्वालिफायर्समध्ये भारताचा तेजिंदरपाल सिंग १५ व्या क्रमांकावर राहिला. त्याने पहिल्या प्रयत्नात 18.05 लांब गोळा फेकला. त्यानंतरचे त्याचे दोन्ही प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे त्याचे आव्हान संपले आहे.

सेलिंग

महिलांच्या डिंघीमध्ये नेत्रा कुमनन चौथ्या शर्यतीनंतर २७ व्या क्रमांकावर राहिली. तसेच पुरुषांच्या डिंघीमध्ये विष्णू सर्वनन चौथ्या शर्यतीनंतर १९ व्या क्रमांकावर राहिला.

हॉकी

हॉकीमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने ऑस्ट्रेलियाला ३-२ अशा गोलफरकाने पराभूत करत बी ग्रुपमध्ये दुसरं स्थान पक्कं केलं.

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑलिम्पिकमधील ५२ वर्षांनंतरचा हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी १९७२ साली भारताने ऑस्ट्रेलियाला ऑलिम्पिकमध्ये पराभूत केलं होतं. भारतीय हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीतही प्रवेश केला आहे.

बॅडमिंटन

बॅडमिंटनमध्ये भारताच्या लक्ष्य सेनने पुरुषांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तिपेईच्या चोयू टिएन चेन विरुद्ध १९-२१, २१-१५, २१-१२ अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तो पुरुषांच्या एकेरी प्रकारात उपांत्य फेरीत पोहचणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT