आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी हिंदू धर्मांमध्ये सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते. वारकरी, विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. लाखो वारकरी आज विठुरायाच्या चरणी लीन झाले आहेत. पण तुम्हाला माहितीय का पंढरीत पोहोचल्यानंतर विठु रायाच्या चरणापर्यंत कशी घालायची प्रदक्षिणा आणि काय आहे योग्य प्रदक्षिणा मार्ग? तर जाणून घेऊयात या संदर्भात.
शास्त्रात सांगितल्यानुसार, देवमूर्तीची प्रदक्षिणा नेहमी उजव्या बाजूपासून सुरू केली पाहिजे. कारण देवी शक्तीच्या अभामंडळाची गती दक्षिणावरती असते. डाव्या बाजूने फिरत असताना, दिव्य शक्तीच्या खगोलीय क्षेत्राची हालचाल आणि आपल्यामध्ये असलेल्या दैवी अणूत एक टक्कर होते, ज्यामुळे आपले तेज नष्ट होते. नकळत उलटी प्रदक्षिणा घालण्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. तर लक्षात ठेवा की प्रदक्षिणा नेहमी मूर्तीच्या उजव्या बाजूने सुरू होते.
तर लाडक्या विठुरायाच्या चरणापर्यंत कशी घालायची प्रदक्षिणा जाणून घेऊ
क्षेत्र-प्रदक्षिणा
क्षेत्र-प्रदक्षिणा हा वारकऱ्यांच्या चतुर्विध कार्यक्रमातील एक महत्त्वाचा भाग आहे. चंद्रभागास्नान, श्रीपांडुरंगाचे वा विठ्ठलमंदिराच्या कळसाचे दर्शन, चारिकीर्तन व क्षेत्रप्रदक्षिणा हे चतुर्विध कार्यक्रम होतात. क्षेत्र-प्रदक्षिणा हा विशेष महत्त्वाचा भाग असून पांडुरंगाच्या भक्तांसाठी तो एक संस्कार्य भाग आहे.
आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या संतांच्या सर्व पालख्या एकादशीच्या दिनी सकाळी क्षेत्र-प्रदक्षिणा करतात. प्रत्येक शुद्ध एकादशीला येणाऱ्या दिंड्याही प्रदक्षिणा करतात. या दिंड्यांची एक विशिष्ट अशी पद्धत आहे.
वैभवाचे प्रतीक असणाऱ्या गरुड हनुमंताच्या चांदीच्या मूर्ती ज्यावर आहेत अशा मोठ्या दोन पताका धारण करणारे दोघेजण अग्रभागी दोन्ही बाजूस चालतात. त्यांच्यामागे दोन ओळीत टाळकरी, मध्ये मृदंग-पखवाज वाजविणारे, त्यांच्यामागे वीणाधारी. हे बहुधा त्या फडाचे वा दिंडीचे मुख्य असतात.
एक नियम मात्र कटाक्षाने पाळण्यात येतो, तो म्हणजे प्रदक्षिणा संपेपर्यंत वाटेत कोठेही विसावा घ्यायचा नाही. प्रदक्षिणामार्गावर संतांचे मठ व विविध देवतांची मंदिरे आहेत. त्या त्या ठिकाणी उभे राहून ठराविक अभंग म्हणण्याची परंपरा आहे.
प्रदक्षिणामार्ग
श्रीज्ञानेश्वर मंदिरापासून प्रदक्षिणेस प्रारंभ केल्यास तो मार्ग असा : श्रीज्ञानेश्वर मंदिर, एकनाथ मंदिर, भजनदास मठ, तांबडा मारुती, उद्धव मंदिर, तेथून उद्धव घाटाने नदीत उतरून, देहुकर बुवांची समाधी, चंद्रभागा वंदन, पुंडलिक दर्शन,
नंतर चोपडेकर, अमळनेरकर व बेलापूरकर महाराजांच्या समाध्यांचे दर्शन करून चंद्रभागा घाटाने वर चढावयाचे व वासकर मठ, तुकाविप्र मंदिर, पंचमुखी मारुती, कालिका मंदिर, बंकटस्वामींचा मठ, रोहिदास मठ, बेलीचा महादेव, काळा मारुती, खिस्ते महाराज समाधी, चौफाळा, दामशेटी मंदिर, गुंडा महाराज मठ, ज्ञानोबा माऊलीचा मठ, श्रीनिवृत्तिनाथ मंदिर, संत एकनाथ मंदिर व नाथ चौक.
घाटावर पाणी असताना तांबड्या मारुतीस वळसा घालून, मुक्ताबाई मठ, महाद्वार व मग पुढे डावीकडे वळून चंद्रभागा घाटावर यावयाचे.
पंचक्रोशी प्रदक्षिणा
पूर्वद्वारे स्थिता देवी ब्रह्मपत्नी वरानना । सिद्धेशो दक्षिणद्वारे पश्चिमे भुवनसुंदरी ।। दुर्गा उत्तरद्वारे महिषासुरमर्दिनी । द्वाराणि एतानि चत्वारि तथा द्वारस्थदेवताः ।। प्रदक्षिणीयाः प्रयत्नेन पूजनीयाः प्रयत्नतः । पितृनुद्दिश्य यत्किंचित् दत्तं भवति चाक्षयं ।।
या क्षेत्रास चारद्वार सांगितली आहेत. पूर्वद्वाराची अधिष्ठात्री संध्यावळी देवी आहे. दक्षिणद्वाराचे ठायी पद्मावती आहे व पश्चिमद्वारात भुवनेश्वरी देवी आहे. उत्तरद्वाराची अधिष्ठात्री दुर्गादेवी आहे.
ज्यांना पंचक्रोशात्मक प्रदक्षिणा करावयाची असेल त्यांनी श्रीपांडुरंगास नमस्कार करून पंचक्रोशात्मक प्रदक्षिणा करण्याचा संकल्प करावा. त्यांनतर पूर्वद्वारापासून ज्याची अधिष्ठात्री संध्यावळी देवी आहे त्यांच्यापासून प्रदक्षिणेला सुरुवात करून क्रमाने पद्मावती, भुवनेश्वरी आणि दुर्गादेवी पर्यंत आल्यास प्रदक्षिणा पूर्ण होते. या प्रदक्षिणेपासून पूर्वजन्माच्या ठायी जी ब्रह्महत्यादिक पातके झाली असतील व या जन्माच्या ठिकाणी जी महापातके झाली असतील त्यांचाही नाश होतो, असे म्हणतात.
अविमुक्तमिदं क्षेत्रमपि ब्रह्मांडमध्यगम् ।।
न भवेत् ब्रह्मगोले तु क्रोशार्द्धविस्तृतायतं ।। ३६ ।।
पंढरपूर क्षेत्राबरोबरीचे दुसरे क्षेत्र या ब्रह्मांडामध्ये नाही. म्हणून सर्वांनी येथील दर्शन व क्षेत्रप्रदक्षिणा अवश्य करावी, असे सांगितले जाते. भक्तकामकल्पद्रुम श्रीविठ्ठल संतुष्ट होऊन सर्व इच्छित मनोरथ पूर्ण करून अंती आपल्या पदास नेतो, अशी श्रद्धा आहे.
वारी-उत्सवा दरम्यान दिंडी, चंद्रभागा स्नान, क्षेत्र प्रदक्षिणा अशी भाविक भक्तांची घाई चाललेली असते आणि विठुराया आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी अहोरात्र उभे असतात. भक्तांचा भाव आहे की थकलेल्या विठुरायाचा शीण घालवण्यासाठी आषाढी, कार्तिकी वारीनंतर एक विशेष उत्सव साजरा केला जातो, त्यास 'प्रक्षाळपूजा' म्हणतात.
डिस्क्लेमर : संबंधित माहिती लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर या पुस्तकातून घेण्यात आली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.