dr samira gujar joshi sakal
लाइफस्टाइल

‘गोळा’ होणारा आनंद

एखादा दिवस असा विचित्र उगवतो ना! उदाहरणार्थ सोमवार सकाळ, आपल्याला महत्त्वाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचं असतं; पण मी अलार्म स्नूझ करते.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. समीरा गुजर-जोशी

एखादा दिवस असा विचित्र उगवतो ना! उदाहरणार्थ सोमवार सकाळ, आपल्याला महत्त्वाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचं असतं; पण मी अलार्म स्नूझ करते. पाच मिनिटांनी परत वाजला, की उठू असा माझा विचार असतो.... पण मी अलार्म स्नूजच्या ऐवजी चुकून ऑफ केलेला असतो. तेवढ्या पाच-दहा मिनिटांत गाढ झोप लागते. जाग येते, तेव्हा उठायला वीस-पंचवीस मिनिटे उशीर झालेला असतो. मनाची चलबिचल होते.

आपण एका बाजूला चहा ठेवतो. एका बाजूला आंघोळीचे पाणी सोडतो. मी न उठल्यानं घरातली इतर मंडळी अजून झोपलेली असतात. त्यांना उठवत मी पांघरूणाच्या घड्या घालत असते, तेवढ्यात चहाचा गॅस मोठा राहिला असल्याने, चहा उतू जातो. आता ओटा पुसण्याशिवाय गत्यंतर नसतं.

तेवढ्यात लक्षात येतं- अंघोळीचं पाणी सोडलं होतं. ती बादली भरून वाहत असते. आपली आणखी चिडचिड होते. ‘घरात मी सोडून इतर कोणी लक्ष देणार आहे का?’ असं म्हणत आपल्या तोंडाचा पट्टा सुरू होतो. इतक्यात मुलं म्हणतात, ‘जाऊ दे आई, नाष्टा नको. उशीर झाला आहे. आम्ही निघतो.’ ती न खाताच निघतात. वगैरे वगैरे...

कविवर्य मंगेश पाडगावकर यांची एक छोटीशी कविता आहे, मला अशा वेळी ती कविता हमखास आठवते.

कधी कधी

सगळंच कसं चुकत जातं!

नको ते हातात येत,

हवं ते हुकत जातं!

हा आणि असे अनेक अनुभव आपल्या परिचयाचे आहेत. यालाच एक नवा शब्द मी वाचला तो म्हणजे ‘स्नोबॉल इफेक्ट’. ज्या ठिकाणी बर्फ पडतो, त्या ठिकाणी असं बघायला मिळतं, की एखादा बर्फाचा छोटा बॉल तयार केला आणि तो बर्फ पडलेल्या डोंगराच्या उतारावरून सोडून दिला, तर तो खाली पोहोचेपर्यंत त्याचा मोठा गोळा झालेला असतो. कारण तो घरंगळत खाली येताना आपल्या भोवती आणखी बर्फ गोळा करत खाली येतो. यालाच आपण कंपाऊंड इफेक्टसुद्धा म्हणू शकतो. (लहानपणी शाळेत शिकलो होतो त्या चक्रवाढ व्याजाची आठवण यानिमित्ताने येते.)

आता वरच्या घटनेतच पाहा ना! उठायला दहा-पंधरा मिनिटं उशीर झाला आणि त्यातून नुकसान, वैताग, चिडचिड ही सगळी मालिका सुरू झाली; पण मग करावं काय? मला पाडगावकरांच्या कवितेतील पुढील ओळी महत्त्वाच्या वाटतात.

अशा वेळी काय करावं?

सुकलेल्या झाडांना

न बोलता पाणी द्यावं!

(अलीकडे आपण समुपदेशन अर्थात कौन्सिलिंगविषयी सतत ऐकत बोलत असतो; पण अनेकदा मला वाटतं, की पाडगावकरांची कविता आपल्याला नकळत समुपदेशन करत असते.)

काय सुचवायचं आहे पाडगावकरांना? pause and ponder. जरा थांब आणि विचार कर असं सुचवत आहेत का ते? कारण असा वैतागवाडी दिवस तुम्ही संपवता कसा हेही महत्त्वाचे असतं. तो त्राग्याचा, कटकटीचा बर्फाचा गोळा जो मोठा मोठा होत चालला आहे त्याला अडवलं पाहिजे. सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यायचं हेच नेमकं त्यांना अपेक्षित आहे का? की ती क्रिया कसलं रुपक म्हणून आली आहे कवितेत? खरंच आपण झाडाला पाणी घालतो.

अगदी आपल्या बाल्कनीत चारच कुंड्या असतील तरी - तेव्हा खूप छान वाटतं. निसर्गाजवळ गेलं, की मन शांत होतं. झाड सुकलेलं असलं, तरी त्याला पाणी घालताना आता हे नव्यानं बहरेल हा विचार मनात येतो. म्हणजे मनात सकारात्मक विचाराची पेरणी होते. असंच रोज पाणी घालत राहिलो तर एक दिवस वठलेल्या झाडाला छोटी हिरवी पालवी फुटलेली दिसते. पण पाणी घालायचं ‘न बोलता’ - घडून गेलेल्या गोष्टींचा पुनःपुन्हा विचार करत बसायचं नाही. असं कसं झाड सुकलं याची चर्चा नको. आता झाडाला पाणी घालू.

असा चुकत जाण्याच्या दिवसाचा कालावधी नेमका चोवीस तासांचा असेल असं नाही. आपल्या आयुष्यातला काही दिवसांचा किंवा महिन्यांचा कालखंड असा असू शकतो. अशावेळी सुकलेल्या झाडाला पाणी हवं आहे हे ओळखता आलं पाहिजे. अगदी सोप्या प्रकारे सांगायचं, तर हा स्नो-बॉल इफेक्ट फक्त निगेटिव्ह (नकारात्मक) गोष्टींचाच असेल असं नाही.

आपण एक छोटीशी गोष्ट बदलली, तर सकारात्मक गोष्टींचा सुद्धा मोठा बर्फगोळा तयार होऊ शकतो. वरच्या उदाहरणात मला अलार्म स्नूझ करायचा नाही आहे असं मी ठरवलं तर! मी कदाचित माझं घड्याळ बेडपासून किंचित दूर असलेल्या टेबलावर ठेवते. यानं काय होतं? तर तो अलार्म स्नूझ करायला मला बेड सोडून उठावं लागतं. डोळे पूर्ण उघडावे लागतात.

मग असं वाटतं, की ‘आता उठलोच आहोत. जाऊ दे स्नूझ नको. बंदच करूया अलार्म.’ मग वेळेत उठल्यामुळे चहा निवांतपणे घेता येतो. चहा उकळेपर्यंत उभ्या उभ्या पपई चिरून होते. छान काचेच्या बाऊलमध्ये ती ठेवताना, मलाच छान वाटतं. मी शांतपणे चहाचे दोन घोट पिऊन तरतरीत होते. घरातल्या इतर मंडळींना हाक मारते. आज ब्रेकफास्ट टेबलवर हसरे चेहरे असतात.

‘पपई किती गोड आहे गं आई!’- मुलीचे शब्द कानावर येतात. मी म्हणते, ‘‘दिवसाची सुरवात त्याहून गोड आहे गं.’ आता मला खात्री असते – मी माझ्या हातानं तयार केलेला हा शुभ्र बर्फाचा गोळा आता उतारावरून घरंगळला आहे. आता दिवसभरात हा ‘आनंदाचा गोळा’ मोठा मोठा होत जाईल.

पाडगावकर कदाचित हेच सांगत आहेत का? झाड फुलतं, बहरतं.... छान छान फुलं देतं, त्यावर फुलपाखरं येतात, कधी? तर सुकलेल्या झाडाला शांतपणे पाणी घातलं तर?!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT