Ashwini Devare
Ashwini Devare Sakal
लाइफस्टाइल

Ashwini Devare : ‘आयर्नमॅन’ बनण्याचा ‘भक्कम’ प्रवास

सकाळ वृत्तसेवा

- अश्‍विनी देवरे, सायकलपटू

माझे बालपण नाशिकमधल्या ‘जायखेडा’ या खेड्यामध्ये गेले. घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून शिक्षण घेत होते. वडिलांच्या नावे कोरडवाहू शेती आल्याने दुसऱ्याच्या शेतात काम करून उदरनिर्वाह करावा लागत होता. माझी पहिली मजुरी म्हणजे आठ रुपये. नऊ तास काम करून आठ रुपये मजुरी मिळाली होती. तेव्हापासून मी कामाला सुरुवात केली आणि आजही मी करत आहे.

लग्नाबाबत ठामपणा

मी त्या काळातील महिला आहे, जेव्हा मुलीची दहावीदेखील संपली नसेल, तेव्हा कुटुंबातील नातेवाईक लग्नाची लगबग सुरू करत. मात्र, मला त्या वयात लग्न करायचे नव्हते. ‘चूल आणि मूल’ हे समीकरण मोडून काढायचे होते. त्यासाठी मी आई-वडिलांना विश्वासात घेऊन मला नक्की काय करायचे आहे, हे त्या वेळी समजावून सांगितले आणि त्यांना पटवूनदेखील दिले.

मात्र, त्या काळात मला समाजाचा विरोध आणि त्यांचे कटू बोलणेदेखील सहन करावे लागले. सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून माझ्या शिक्षणाचा लढा सुरू ठेवला आणि शिक्षण पूर्ण केले. लग्नापेक्षाही शिक्षणाला प्राधान्य देत मी पोलिस विभागात भरती झाले.

खेळाची आवड

शहरामध्ये प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या शिक्षकांची नेमणूक केली जाते. मात्र, खेड्यापाड्यांमध्ये एकच शिक्षक सगळे विषय शिकवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाची गोडी असेल, तर त्याला परिपक्व होण्यासाठी तसे शिक्षकदेखील असणे गरजेचे आहे. माझ्याही शाळेत त्या वेळी क्रीडाशिक्षक नव्हते. आमच्या शाळेत असलेल्या बोरसे सरांमुळे मी खेळाची सुरुवात केली. बोरसे सरांचे खेळाच्या बाबतीत मला नेहमीच योगदान लाभले.

खेळाची आवड शालेय जीवनातच लागली होती. पुस्तकांपेक्षा मी मैदानावर जास्त रमत होते. शाळेत मुली जास्त खेळत नसल्याने मी मुलांबरोबर कबड्डी खेळायला सुरुवात केली. त्यामुळे त्या वेळी मला भावाचा मार पडत होता. मुलांसोबत खेळते म्हणून समाजातदेखील चर्चा होत होती. मात्र, आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवायचे या आत्मीयतेने मी झटत राहिले.

किरण बेदी यांचा आदर्श

किरण बेदी या माझा नेहमीच आदर्श राहिल्या आहेत. लहानपणापासूनच मी त्यांची वर्तमानपत्रातून कात्रणे कापून ठेवत असे. मी पोलिस खात्यात भरती कशी झाले, याचा विचार करायला लागले, की नाशिकची मॅरेथॉन आठवते. आयुष्यात पहिल्यांदा त्या मॅरेथॉनला धावले. तेव्हा माहीतदेखील नव्हते, की मॅरेथॉन म्हणजे काय? फक्त धावायचे हे माहिती होते. मॅरेथॉनसाठी मी पहिल्यांदाच नाशिक जिल्हा पाहिला.

आजपर्यंत ज्या शहराबद्दल केवळ ऐकलं होतं, ते प्रत्यक्षात पाहायला मिळालं, याचं कारण माझी ‘खेळाची ओढ.’ तेव्हापासून मी खैरनार सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि नाशिक, जळगाव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये खेळण्यासाठी जाऊ लागले. शालेय स्पर्धांमध्ये विभागापर्यंत खेळत असल्यामुळेच मला पोलिसभरतीची संधी मिळाली.

गावामध्ये कोणीच महिला पोलिस नव्हती, त्यामुळे आपण आपल्या गावातील मुलींसाठी आदर्श बनू शकतो, अशा विचाराने पोलिस झाले. त्याचबरोबर घरातील आर्थिक परिस्थितीमुळे मी हा निर्णय घेतला. ‘मलाच माझ्या कुटुंबाचा आधार बनायचंय,’ या विचारातून मी २००१ मध्ये मुंबई पोलिस दलामध्ये भरती झाले.

कुटुंब आणि स्वप्न

शालेय स्पर्धांमध्ये मी खेळतच होते. मात्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न अपूर्णच होते. २००६ मध्ये माझे लग्न ठरले. तेव्हा मी माझ्या होणाऱ्या पतींना एकच गोष्ट मागितली, की मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि मी हुंडा देणार नाही. या अटीवर मी लग्नास होकार दिला आणि तो त्यांनी मान्यदेखील केला. लग्नानंतर मी वीर आणि शौर्य या दोघांची आई झाले, तेव्हा खऱ्या अर्थाने कसोटी सुरू झाली. आई आणि पोलिस अशी कर्तव्ये बजावताना माझी तारेवरची कसरत सुरू झाली.

घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत मी सुट्टीच्या दिवशी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊ लागले. मुलांना बरोबर घेऊन मी प्रत्येक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. २०१६ मध्ये मास्टर नॅशनलसाठी खेळण्याची संधी मिळाली होती. मलेशियामध्ये ही स्पर्धा होणार होती आणि त्यासाठी पतींनी मला मदतदेखील केली.

मी या मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक मिळवले. १९९३ मध्ये पाहिलेले आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे स्वप्न २०१६ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर श्रीलंका येथील मॅरेथॉनमध्येदेखील मी तीन सुवर्णपदकांची कमाई केली अन् माझा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा प्रवास सुरू झाला.

निर्णयावर ठाम राहा

महिलांनी त्यांच्या स्वप्नांच्या बाबतीत तडजोड करू नये. आपल्या निर्णयावर ठाम राहावे. कितीतरी संघर्ष करावा लागला, तरी जिद्द न सोडता ध्येय निश्चित करून ते गाठले पाहिजे.

एका वाक्याने कलाटणी

‘आर्यनमॅन’ काय असतं, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधापासून माझा ‘आयर्नमॅन’ स्पर्धेचा प्रवास सुरू झाला. त्यासाठी मला सायकलिंग, पॉवरलिफ्टिंग, जलतरणाचे धडे घ्यावे लागले. खुली जलतरण स्पर्धा हा सर्वांत अवघड टप्पा होता. त्यासाठी माझ्या मुलाने मला प्रशिक्षण दिले आणि यासाठी तो माझा गुरू बनला.

या स्पर्धेसाठी सराव करताना मला भीती वाटत होती, तेव्हा वीर म्हणाला, ‘आई तू अशी घाबरलीस, तर तू ‘आर्यनमॅन’ होऊ शकणार नाहीस,’ या एका वाक्याने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आठ वर्षांचा वीर या स्पर्धेसाठी माझी प्रेरणा बनला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT