Loksabha 2019

Loksabha 2019 : निष्ठावंत नेत्यांमुळे पुण्याची उमेदवारी लटकली

संजय मिस्कीन

मुंबई : राज्यातील सर्व मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पुण्यात कॉंग्रेसमध्ये उमेदवारीची टांगती तलवार लटकवत ठेवावी लागली. संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना पक्षश्रेष्ठींनी कॉंग्रेसची उमेदवारी देण्याचा निर्धार केल्याने पुण्यात "ब्रिगेड' विरूद्ध "पुणे कॉंग्रेस' अशी अटीतटीची लढाई सुरू झाली.

स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी गायकवाड यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कोंडी झाली. स्थानिक नेत्यांची मनधरणी करण्यात महिनाभर झाले तरी यश येत नसल्याने ही उमेदवारी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रवीण गायकवाड यांची शिफारस केल्याचे सांगितले जाते. गांधी यांनाही गायकवाड यांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीबद्दल शंका नसल्याने त्यांनीही हिरवा कंदिल दाखवला. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असहकार्याचा पवित्रा पाहून प्रदेशाध्यक्षांनी "वेट ऍण्ड वॉच' ची भूमिका घेतली. 
पुण्याचे स्थानिक नेते मोहन जोशी, अभय छाजेड, उल्हास पवार, अरविंद शिंदे व अनंत गाडगीळ या पाच जणांची नावे पुणे कॉंग्रेसने प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविली होती. मात्र, 19 फेब्रुवारीलाच प्रवीण गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतरही ध्रुवीकरणाच्या धास्तीने प्रदेश कॉंग्रेस संशयाच्या फेऱ्यात अडकली. त्यातच स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी पक्षाबाहेरचा उमेदवार दिल्यास काम करणार नसल्याचा इशारा दिला.

गायकवाड यांच्या विरोधात मोहिम उघडून दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात आल्या. दरम्यान गायकवाड यांची राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी दोन तीन वेळा चर्चाही झाली. गायकवाड यांना मानणारा मोठा युवा वर्ग राज्यभरात असल्याने कॉंग्रेसला त्याचा मोठा फायदा होईल असा विश्‍वास पक्षश्रेष्ठींचा बसला. पण मूळ कॉंग्रेसच्या स्थानिक निष्ठावंत नेत्यांनी गायकवाड उमेदवार नकोत हा पवित्रा कायम ठेवला. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या सर्व नेत्यांची समजूत काढण्याचा वेळोवेळ प्रयत्न केला पण तो असफल झाला. त्यातच प्रवीण गायकवाड यांच्या प्रतीक्षेचा बांध फुटला. उमेदवारी मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकल्याने पुन्हा नवा पेच निर्माण झाला. आज त्यांनी खर्गे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाचे राज्यभरात संभाजी ब्रिगेड-मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करत जिल्ह्याजिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

कॉंग्रेस पेचातच 

गायकवाड यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी पुणे कॉंग्रेसचा कोणताही नेता उपस्थित नसल्याने पक्षश्रेष्ठींसमोर नवा पेच उभा राहिला आहे. गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास पुणे कॉंग्रेसमध्ये मोठे बंड होण्याची भीती असल्याने त्यांची उमेदवारी तात्काळ जाहीर केली नाही. पुणे कॉंग्रेस व "गायकवाड ब्रिगेड' असा थेट संघर्ष सुरू असल्याने पुणे लोकसभेच्या उमेदवारीचा पुन्हा "क्‍लायमॅक्‍स' तयार झाला आहे. 

कॉंग्रेसचे स्थानिक नेते मात्र अद्यापही गायकवाड यांच्याबाबत सहमत नसून कॉंग्रेससमोर पुणे लोकसभेचा मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT