अखेर भोंदू मनोहरमामा पोलिसांच्या ताब्यात!
करमाळा : स्वतः बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसले प्रकरणामध्ये दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. २७ एकरांत आलिशान मठ उभारणाऱ्या भोंदू मनोहर भोसलेकडे राज्यातील अनेक पक्ष व गटांचे आमदार, खासदार व कार्यकर्ते ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी येत होते. काँग्रस तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर उंदरगाव येथील मठात मनोहर भोसलेसोबत जेवण केले होते. गतवर्षी मनोहर भोसले याचा हडपसर (पुणे) जवळील एका रिसॉर्टमध्ये वाढदिवस साजरा झाला होता. या वाढदिवसाला राज्यातील ९० आमदार उपस्थित होते. माझ्या पुढील वाढदिवसाला तर १४५ ते १५० आमदार उपस्थित राहणार असल्याचे मनोहर भोसले याने सांगितले होते, असा दावा घोटीचे सरपंच विलास राऊत यांनी केला आहे.
उंदरगाव (ता. करमाळा) येथे अगदी छपराच्या घरातून लोकांचे भविष्य सांगायला सुरुवात केलेल्या मनोहर भोसलेच्या भोंदगिरीचा प्रवास उंदरगाव, घोटी, नवी मुंबई ते गाणगापूर असा आहे. आज मनोहर भोसले याचे भक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशभर पसरले आहेत. श्रीमंत लोक, उद्योगपती, राजकारणी, चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्याकडे भविष्य पाहायला येत होते. मनोहर भोसले याने घोटी हद्दीत २७ एकरांत मठ बांधला आहे.
मठाच्या शेजारील ननवरे वस्तीकडे जाणारा रस्ता बळजबरीने बंद करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. मात्र, याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. माझ्या वाढदिवसाला ९० आमदार उपस्थित होते. पुढील वाढदिवसाला तर १४५ ते १५० आमदार उपस्थित राहणार असल्याचे सांगत मनोहर भोसले याने ग्रामस्थांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही ते होऊ दिले नाही, असेही सरपंच विलास राऊत यांनी सांगितले.
लासुर्णे (ता. इंदापूर) हे त्याचे मूळगाव आहे. वडील रोजंदारीसाठी उंदरगाव येथे आले तेव्हा मनोहर भोसले पाचवी किंवा सहावीमध्ये शिकत होता. त्याचे राजुरी (ता. करमाळा) येथील राजेश्वर विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर त्याने अकरावी, बारावी व डीएडचे शिक्षण घेतले. आई-वडिलांना मदत म्हणून मनोहर भोसले हा शेजारील गावात आठवडे बाजारात सुकट, बोंबील व भाजीपाला विकत होता. उंदरगाववरून उमरड, पारेवाडी, जेऊर, कोर्टी येथे तो आठवडे बाजार करत असल्याचे लोक सांगतात. त्यानंतर तो अचानक वर्ष ते सव्वा वर्ष गायब झाला.
वर्षभराने परत आल्यानंतर ‘मला बाळूमामा प्रसन्न झाला आहे’, असे सांगून आपल्या छपराच्या घरातच लोकांचे भविष्य सांगायला सुरुवात केली. काही लोकांना मनोहर भोसलेकडून गुण आल्यानंतर ‘मनोहरमामाला घर बांधून दिले पाहिजे’ या भावनेतून काही भक्तांनी विटा, सिमेंट, वाळू, खडी, तर कोणी लोखंड दिले. काही भक्त मनोहरमामाच्या गाईंच्या धारा काढून डेअरीला दूध घालण्याचे काम करू लागले. यातूनच मनोहर भोसले याचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढले.
सुरुवातीला शेजारील मांजरगाव, उमरड, राजुरी, पश्चिम सोगाव, वाशिंबे, पारेवाडी या गावांतील लोक मनोहर भोसलेकडे भविष्य पाहण्यासाठी येऊ लागले. त्यांना मनोहर भोसलेच्या ढोंगीपणाचा अनुभव आल्यानंतर या लोकांनी भविष्य पाहायला येणे बंद केले. तरीही त्याचे प्रस्थ एवढे वाढत गेले की पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांतील श्रीमंत लोक, उद्योगपती, राजकारणी, चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्याकडे भविष्य पाहायला येऊ लागले होते. अलीकडच्या काळात नवी मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये मनोहर भोसले भक्तांचा दरबार भरवत असे. तसेच कर्नाटकमधील गाणगापूर येथेही प्रशस्त मठ उभारणी केली असून तेथेही भक्तांचा दरबार भरत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.
पहिल्या गुन्ह्यानंतर विस्तारले जाळे
९ सप्टेंबर २०२१ रोजी करमाळा पोलिसांत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली. जामिनावर सुटल्यानंतर भोसले याने घोटी (ता. करमाळा) येथे २७ एकरांत नवा मठ उभारला. येथे पुन्हा ‘भविष्य’ सांगण्यास सुरुवात झाली. अमावस्या व पौर्णिमेला मोठी गर्दी होत होती. २०२१ नंतर त्याने उंदरगावला भेट दिली नसल्याचे सांगितले जाते; मात्र रात्रीच्या वेळी गुप्त भेटी झाल्याच्या चर्चा आहेत.
मूळस्थान म्हणून उंदरगावातही गर्दी
घोटी येथे मठ सुरू असला तरी उंदरगाव हे ‘मूळस्थान’ असल्याचे सांगत भक्तांना तेथे जाण्यास प्रवृत्त केले जात होते. त्यामुळे घोटीला येणारे भाविक उंदरगावालाही भेट देऊ लागले आणि तेथेही अलीकडे गर्दी वाढली.
‘पावती’शिवाय नाही भविष्य
घोटी मठात अमावस्या-पौर्णिमेला हजारो भाविक येत. भविष्य पाहण्यासाठी ११ ते २१ हजार रुपयांची पावती आवश्यक होती. पावती घेतल्यानंतरच भेट दिली जात असे. नाशिकमधील प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी चौकशीची मागणी केली होती. प्रकरण गाजू लागल्यानंतर भोसले मठातून गायब झाला.
तक्रारींसाठी पुढे या : पोलिस अधीक्षक
कुर्डुवाडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी भोसले याला मांजरी (जि. पुणे) येथे अटक केली. पुणे, बारामती, सोलापूरमध्येही तक्रारी असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. आणखी तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामस्थांचा विरोध
घोटी येथे गावापासून दूर मठ उभारण्यात आला होता. बाहेरगावचे भाविक मोठ्या संख्येने येत असले तरी स्थानिक ग्रामस्थ दूर राहिले. मठासाठी मोठा खर्च करण्यात आला होता. ननवरे वस्तीकडे जाणारा रस्ता बंद करण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र तो हाणून पाडला, अशी माहिती सरपंच विलास राऊत यांनी दिली.
दिग्गज राजकीय नेत्यांसोबत असलेले फोटो व्हायरल
आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांबरोबर मनोहर भोसलेच्या भेटी झाल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मावळचे आमदार सुनील शेळके, याशिवाय करमाळा तालुक्यातील आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. तसेच समृद्धी महामार्गाशी संबंधित एक बडा अधिकारी आणि मुंबईतील एक उद्योजक आमदार हेलिकॉप्टरने मनोहर भोसले याला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भेटायला आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.