सोलापूर : वडिलांच्या मार्गदर्शनाखाली १७ वर्षे वकिली केल्यानंतर ॲड. अमित विश्वनाथ आळंगे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. शालेय शिक्षण सिद्धेश्वर प्रशालेतून तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेजमधून घेऊन त्यांनी पुढे तेथेच बी.एस.एल.एल.बी.चे शिक्षण घेतले. २०१० मध्ये भारती विद्यापीठातून एलएलएम आणि २०१३ मध्ये एमएसडब्ल्यूचे शिक्षण पूर्ण केले. २००८ पासून त्यांनी वकिली व्यवसायात पदार्पण केला. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी- फौजदारी, कौटुंबिक, ग्राहक मंच, शाळा न्यायाधिकरण ट्रस्ट याठिकाणी त्यांनी वकिली केली आहे.
बालपणापासून सामाजिक कार्याची आवड असलेल्या ॲड. आळंगे यांनी समाजातील वंचित घटकांना मदत व्हावी म्हणून वकिलीचे शिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी आळंगेज् लॉ क्लासेसच्या माध्यमातून वकिली व्यवसायात करिअर करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शनही केले. त्यांनी सोलापुरातील मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, दयानंद विधी महाविद्यालय, सोनी कॉलेज येथे प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. त्यांची पत्नी स्मिता आळंगे याही वकिली व्यवसायात आहेत. लहान बंधू ॲड. अजित आळंगे मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत. ॲड. अमित आळंगे यांनी कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये १५० ते २०० कामगारांना सामूहिकरीत्या दाखल गुन्ह्यात अंतरिम जामीन मिळवून दिला. एक शिक्षक, वकील, अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
आता त्यांना जिल्हा न्यायाधीश म्हणून कुटुंब व्यवस्था बळकट करण्याची संधी मिळाली आहे. आजच्या समाज व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. दैनंदिन व्यवहारात देखील त्यांनी सजग राहणे आवश्यक असल्याचे ॲड. अमित आळंगे यांचे ठाम मत आहे. यासाठी प्रत्यक्ष कृतीतून कार्य करत त्यांनी पोलिस अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, गुन्ह्यातील पीडितांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व सल्ला दिला असून अनेक कायदेविषयक जनजागृती शिबिरातून मार्गदर्शन देखील केले आहे.
सोलापूर बार असोसिएशनचा दिला राजीनामा
ॲड. अमित आळंगे सध्या बार असोसिएशनचे अध्यक्ष असून कौटुंबिक न्यायालयात जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाल्यावर त्यांनी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ॲड. आळंगे यांनी सोलापुरातील विधीसेवा प्राधिकरण, सोलापूर महापालिका, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व सिद्धेश्वर देवस्थान, गोकूळ शुगर, सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना, कंचेश्वर सहकारी साखर कारखाना, सोलापूर सेकंडरी स्कूल, एम्प्लॉईज को. ऑप. सोसायटी अशा अनेक संस्थांवर पॅनेल ॲडव्होकेट म्हणून काम केले आहे. पैसे कमविणे हा प्रमुख उद्देश न ठेवता अनेक गोरगरिबांना त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला मोठे यश मिळाल्याचे ॲड. आळंगे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.