Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र

हृदयात महाराष्ट्र..., नजरेसमोर राष्ट्र...!

सकाळ वृत्तसेवा

- अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

‘हृदयात महाराष्ट्र, नजरेसमोर राष्ट्र’ हा विचार समोर ठेवूनच राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी दि. १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही, तर तो एक विचार आहे. या विचाराचा आज २२ वा वर्धापन दिन.

पक्षाच्या गेल्या दोन दशकांच्या इतिहासाचे सिंहावलोकन केले, तरी ही गोष्ट अगदी ठळकपणे लक्षात येईल. महाराष्ट्राच्या समृद्धीचा आणि देशाच्या परिवर्तनाचा हा विचार आहे. त्या विचारातूनच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जन्म झाला. ज्या परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला, तो विचार देशाला नवी दिशा, ऊर्जा देणारा ठरला. त्यामुळेच झारखंड विधानसभेचा निकाल लागल्यानंतर जिंकलेले विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन साहेबांनी त्यांच्या विजयाची प्रेरणा आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे जाहीरपणे सांगितले. पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक, विक्रमी विजयानंतर ममतादीदींनीही आवर्जून आदरणीय पवार साहेबांची आठवण केली.

पक्ष देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी, प्रगत, सुधारणावादी विचारांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह अनेक संतांचे प्रबोधनाचे संस्कार महाराष्ट्राच्या मातीत रुजले आहेत. या थोर विभूतींच्या विचारांना मानणारा आणि याच संस्कारांवर काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळेच जवळपास दीड शतकाचा इतिहास असणारा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, अर्ध्या शतकाचे वय असलेला भारतीय जनता पक्ष, या राष्ट्रीय पक्षांसह देशभरातील डझनभर प्रादेशिक पक्षांच्या मांदियाळीत अवघ्या दोन दशकांपूर्वी जन्मलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी राहण्यात नेहमीच यशस्वी राहिला आहे.

वीस लाखांहून अधिक सक्रिय सभासद

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाचा करिष्मा याचे प्रमुख कारण असले तरी नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली बैठकही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वीस लाखांहून अधिक क्रियाशील सभासद आहेत. महाराष्ट्राबरोबरच केरळ, गुजरात आणि छत्तीसगड विधानसभेतही पक्षाचे प्रतिनिधी आहेत. देशातील गोवा, नागालँड, मेघालय, मणिपूर, आसाम, बिहार, ओडिशा, झारखंड, अरुणाचल प्रदेश या राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत ५३ आमदारांचे संख्याबळ, तर लोकसभेत ५ आणि राज्यसभेत पक्षाचे ४ सदस्य आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाला हेवा वाटावा अशी अनुभवी आणि युवा नेतृत्वाची, कार्यकर्त्यांची दमदार फळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, हीसुद्धा पक्षाची मोठी ताकद आहे.

कृषी-औद्योगिक समाजरचना साकारणार

गेली साडेपाच दशके राज्यासह केंद्राच्या राजकारणात लोकाभिमुख, मोठा जनाधार असलेलं प्रभावशाली नेतृत्व म्हणून आदरणीय पवार साहेबांचा लौकिक आहे. हा लौकिक त्यांनी कृतीतून सिद्ध केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे कृषी-औद्योगिक समाजरचनेचे स्वप्न साकार करणे, हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख धोरण आहे. त्यादृष्टीनेच पक्षाची आजवरची वाटचाल राहिली आहे. समाजाच्या सर्वांत कनिष्ठ स्तरातील सर्वसामान्य माणसांचा विकास हे पक्षाचे उद्दिष्ट आणि अंतिम ध्येय आहे. सामाजिक सुसंवाद, राजकीय भान आणि प्रशासकीय कौशल्याच्या आधारे उद्योग, कृषिक्षेत्र, अन्नसुरक्षा, कृषी संशोधन, संरक्षण, सहकार क्षेत्र, महिलांचे सक्षमीकरण, दुर्बल घटकांसाठी आरक्षण, आपत्कालीन व्यवस्थापन, गरीब व उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं सार्वत्रीकरण हीच पक्षाची प्रमुख ध्येयधोरणे आहेत. शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, सामाजिक न्याय, पर्यावरण आणि शहरांचा नियोजनबद्ध समतोल विकास या सात प्रमुख बाबींवर पक्षाच्यावतीने सातत्याने काम सुरू आहे.

सुसंस्‍कृतीचा अंगीकार

महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा देण्याचं सर्वांत मोठं श्रेय, निश्चितपणे स्वर्गीय चव्हाण साहेब आणि आदरणीय पवार साहेबांकडे जाते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृततेचा विचार आपल्याला दिला. तोच संस्कार पक्षाने अंगीकारला आहे. संकटांना संपूर्ण ताकदीनं सामोरं जाणं. संकटं कितीही आली आणि ती कितीही मोठी असली, तरी हार न मानता, खचून न जाता त्या संकटांशी संपूर्ण ताकदीनं लढणं. संकटांशी दोन हात करत लढण्याची जिद्द आणि शिकवण आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला थेट कृतीतूनच दिली आहे. साहेबांनी सातत्यानं महाराष्ट्राचा सन्मान कायम ठेवण्याचं, वाढविण्याचं काम केलं. ‘महाराष्ट्र कुणासमोर झुकला नाही आणि झुकणार नाही...’ हा संदेश संबंधितांपर्यंत वेळोवेळी पोहचवण्यात साहेब कायमच यशस्वी ठरले आहेत. ‘महाराष्ट्र कोणासमोर झुकणार नाही’ या ‘इतिहासा’चं साहेब हे, ‘वर्तमान’ आहेत. तोच विचार पक्षाच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अंगात भिनला आहे.

राजकीय, सामाजिक जीवनात काम करताना कोणाशी वैचारिक मतभेद असले, मतभिन्नता असली तरी अहंकार आणि दुराग्रहाने कोणासोबतचा संवाद थांबविण्याचा, त्याचा तिरस्कार करण्याचा विखार आदरणीय साहेबांनी कधी बाळगला नाही. विरोधी विचारांचाही आदर करण्याचा संस्कार साहेबांनी माझ्यासारख्या पुढच्या पिढीतल्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवला. आज पक्षवाढीसाठी साहेबांच्या कृतिशील विचारांचा, अनुभवाचा, शिकवणीचा निश्चितच उपयोग होत आहे.

कठीण प्रसंगात ठाम राहण्याची शिकवण

राजकीय जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार हे येतच असतात. ते जसे वैयक्तिक जीवनात येतात, तसेच पक्षाच्या वाटचालीतही येत असतात. त्यांना कोणी टाळू शकत नाही. मात्र कठीण प्रसंगात संयम ढळू द्यायचा नाही आणि सत्ता आल्यावर उन्माद चढू द्यायचा नाही, ही आदरणीय साहेबांची शिकवण आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या दोन दशकांच्या प्रवासात अशा गोष्टी आल्या आणि गेल्या, मात्र पक्ष आपल्या चालीने पुढं वाटचाल करतच राहिला. ज्यांची वाटचाल सरळमार्गाने थांबवता येत नाही, त्यांची बदनामी करण्याची एक प्रवृत्ती असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत, पक्षातील नेत्यांच्या बाबतीत असे अनेक प्रसंग जाणीवपूर्वक आणले गेले, काही वेळा रचले गेले. मात्र त्यातून कोणाच्याही हाती काही लागलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली घोडदौड करत राहिला आहे, यापुढेही करत राहील, याची मला खात्री आहे.

लोकशाही संकेतांची जपणूक

संविधानाचा आदर, लोकशाही संकेतांची जपणूक, उपेक्षित, वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्धता, सहकाराचे सूत्र अवलंबत गरीब शेतकरी व कष्टकरी कामगारांच्या हिताचे समाजकारण, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा मुख्य गाभा राहिला आहे.

कोरोना संकटाचा मुकाबला करणं ही सध्या आपली प्राथमिकता आहे. त्याचवेळी कोरोनापश्चात राज्याची विस्कटलेली आर्थिक, सामाजिक घडी पुन्हा बसविण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आलेली आहे. या कामात महाराष्ट्रासह देशाच्या नवनिर्माणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला वाटा नक्कीच उचलेल, याबाबत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात कुठलीही शंका नाही. त्याचदृष्टीने पक्षाची यापुढची वाटचाल असेल, याची खात्री देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत आस्था, आपुलकी, प्रेम बाळगणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांचे आभार. धन्यवाद!

साहेबांच्या नेतृत्वाखाली धोरणात्मक निर्णय

महाराष्ट्रातील फळबाग योजना, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण, वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना हिस्सा, महिलांसाठी देशातले पहिले महिला धोरण, असे महत्त्वपूर्ण निर्णय दूरदृष्टी आणि पुरोगामी विचारांतून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात घेतले गेले. या दूरदृष्टीच्या धोरणात्मक निर्णयामुळे पुरोगामी महाराष्ट्राची प्रगतीची वाटचाल अधिक गतिमान झाली, हे कोणी नाकारू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT