सोलापूर : आई-वडिलांनी कितीही प्रयत्न केला, तरी लहान मुले सहजपणे चुकीच्या सवयींच्या जाळ्यात अडकतात. पुरेशी माहिती नसल्यामुळे लहानपणी मुले, पालकांनी आपले म्हणणे ऐकावं, त्यासाठी त्यांच्याशी किंवा मोठ्या माणसांशी बऱ्याचवेळा वाद घालू लागतात. अशा वेळी आई-वडील त्यांना रागावून वेळीच त्यांच्या चुकीची जाणीव करून देतात. मात्र तुमच्या ओरडण्यामुळे किंवा मारामुळे मुलं तुमचं सगळंच ऐकायला लागतील आणि वाद घालणं सोडतील, असे दरवेळी शक्य होत नाही. कधीकधी मुले आक्रमक होऊन अजून वाद घालतात. अशावेळी पालकांनी चार प्रमुख बाबींचा विचार करावा.
१) घरात कडक धोरणे नको
तुमच्या मुलांना वाद घालण्याची सवय लागली असेल, तर त्याच्याशी जास्त कठोरपणे वागू तथा बोलू नका. अशावेळी तुमचा आरडाओरडा ऐकून किंवा मार खाऊन मुले आणखी हट्टी स्वभावाची होऊ लागतात. त्याचबरोबर त्यांना मारले तर हळूहळू मुलांच्या मनात पालकांबद्दलची भीती देखील संपून जाते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना जास्त कडक धोरण न ठेवता त्यांना समजून घ्या.
------------------------------------------------
२) प्रेमाने समजावण्याचा हवा प्रयत्न
मुलांना त्यांच्या वाईट अथवा चुकीच्या सवयींबद्दल ओरडण्यापेक्षा, त्यांना जवळ घेऊन प्रेमाने समजावण्याचा नेहमीच प्रयत्न करावा. आपण जे सांगतो ते पालकांनी ऐकावेच, आपला हट्ट पूर्ण करावा, यासाठी मुले बऱ्याच वेळा पालकांशी वाद घालतात. अशाप्रसंगी त्यांना प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न जरूर करावा. प्रेमाने समजूत घातल्यास मुले तुमची गोष्ट टाळणार नाहीत, ते नक्की ऐकतील.
-------------------------------------------------
३) मुलांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या
अनेकवेळा मुलांना भांडताना किंवा वाद घालताना पाहून बहुतांश पालक त्यांना रागावून तथा ओरडून गप्प करतात. मात्र, तुमच्या या वागण्याचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यातून मुले आणखी रागीट बनू शकतात. त्यामुळे मुलांना ओरडून शांत करण्यापेक्षा त्यांची संपूर्ण गोष्ट ऐकून घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देणे सोईस्कर ठरते. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा.
-------------------------------------------------
४) योग्य-अयोग्य गोष्टीतील फरक समजवा
मुलांची वाद घालण्याची वाईट सवय सोडवायची असेल, तर त्यांच्याशी बोलून, त्यांना रास्त, योग्य गोष्ट कोणती, अयोग्य काय, यातील फरक समजावून सांगावा. त्यानंतर त्यांना वाद घालण्याच्या दुष्परिणामांचीही जाणीव करून द्या. वाद घालणे ही चुकीची सवय असल्याचे समजवा. मुलांशी गोड बोलून, त्यांना प्रेमाने समजावले तर त्यांच्या चुकीच्या सवयींचा विळखा वेळेत सुटू शकेल. धर्मग्रंथ किंवा थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगा, त्यातून काय बोध घ्यावा, हेही समजावून सांगायला हवा.
मनाचे श्लोक, नामस्मरणातून होईल लाभ
सध्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही. अशावेळी दहा वर्षांखालील मुलांना धर्मग्रंथातील गोष्टी सांगाव्यात. सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्यापूर्वी मनाचे श्लोक म्हणवून घ्यावेत. मुलांच्या मनाची एकाग्रता वाढावी म्हणून मेडिटेशन करायला लावावेत. नामस्मरणाचाही खूप मोठा फायदा होतो, असा विश्वास शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वीणा जावळे यांनी व्यक्त केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.