-जीवनमूल्ये,यशोधन साखरे
कोणत्या राज्यास सुशासित राज्य म्हणते? असा प्रश्न आपल्या समोर येतो तेव्हा त्याचे उत्तर येते की जे राज्य भयमुक्त आहे त्याला सुशासित राज्य म्हणावे. ही अभयता सांगितलेली आहे, त्यात थोडसा बारकावा आहे. सज्जन लोक हे भयमुक्त असावेच आणि दुर्जन लोक मात्र भीतीयुक्त असावेत, हे सुशासित राज्याचे लक्षण आहे.
थोडे सोप्या शब्दात सांगायचे तर पोलिसांना पाहून सज्जन भयमुक्त झाला पाहिजे तर दुर्जन घाबरला पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती सहजतेने निर्माण करणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. ही सज्जनाचे अंतःकरणात असणारी अभयता हे एक दैवी जीवनमूल्य आहे. ही अभयता कशी निर्माण होईल याचा विचार करण्यापूर्वी भयाचा विचार करणे आवश्यक आहे. भय अथवा भीती ही स्वविरोधी गोष्टीपासून असते. व्यवहारात आपण पाहतो की आपल्याला आपल्या शत्रूची, आपल्या प्रतिस्पर्ध्याची भीती वाटते. दुसरे भय हे स्वश्रेष्ठ गोष्टीपासून असते. आपल्यापेक्षा जो अधिक शक्तीसंपन्न असतो त्यापासूनही आपल्याला भीती वाटत असते अथवा स्वभिन्न पदार्थापासून अथवा स्वभिन्न व्यक्तीपासून आपल्याला भय वाटत असते. ही व्यावहारिक स्वरूपाची भीती निवृत्त करण्यासाठी परस्परांमध्ये असलेला शत्रुभाव निवृत्त होऊन मित्रभाव निर्माण होणे आवश्यक आहे.
जे शक्तीसंपन्न आहेत त्यांनी असे वर्तन केले पाहिजे की जे सात्त्विक सज्जन लोक आहेत त्यांना त्यांची भीती न वाटता त्यांचा आधार वाटला पाहिजे. किंबहुना शक्तीसंपन्न व्यक्तीने प्राणीमात्रामध्ये अभयता निर्माण करणे हे एक पुण्यदायी कर्म मानलेले आहे. या विषयी एक सुभाषितकार म्हणतात ‘जीवानां रक्षणं श्रेष्ठं जिवा जीवितकांक्षिणः । तस्मात्समस्त दानेभ्योऽभयदानं प्रशस्यते ॥’ सर्व प्राणिमात्रांना भयमुक्त जीवन जगण्याची इच्छा असते. या कारणास्तव तशा स्वरूपाचे अभयदान देणे हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान आहे.
सर्व प्राणिमात्रांना सगळ्यात जास्त कशाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे मृत्यूची. शास्त्रामध्ये या मृत्युभयाचा विचार करताना शास्त्र सांगते की ‘मृत्युः इति भयसीमा।’ भयाची परिसीमा म्हणजे मृत्यू. या भयापासून जर मुक्ती प्राप्त करून अभयतेकडे जायचे असेल तर आत्मस्वरूपाचा यथार्थ परिचय होणे व तसा यथार्थ अनुभव येणे आवश्यक आहे आवश्यक आहे.
आत्मस्वरूप कसे आहे हे सांगताना भगवान श्रीकृष्ण सांगतात ‘अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्।विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति॥ आत्म स्वरूप हे अविनाशी अव्यय आहे. मृत्यू हा शरीर दृष्टीने आहे असा अनुभव आला म्हणजे बृहदारण्यकोपनिषदा मध्ये सांगितलेली ‘अभयं वै जनक प्राप्तोसि इति होवाच भगवान् याज्ञवल्क्यः।’ ही यथार्थ अभयता प्राप्त होते. ही दैवी जीवनमूल्य स्वरूप असणारी अभयता मानवानी प्राप्त करून घेतली पाहिजे. ही अभयता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर त्यासाठी अत्यंत सोपा उपाय श्री ज्ञानराज माउली सांगतात ‘उठा उठा जागा पाठीं भय आलें मोठें । पंढरीवांचुनि दुजा ठाव नाहीं कोठें ॥’ तुम्ही उठा जागे व्हा तुमच्या मागे मोठे भय म्हणजेच मृत्यूचे भय लागले आहे. या भयापासून मुक्त होऊन यथार्थ अभयता प्राप्त करायची असेल तर पंढरीची वारी हा अत्यंत सुलभ मार्ग आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.