Maharashtra TET Result
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : ‘टीईटी’चे दोन पेपर (प्रत्येक पेपर १५० गुणांचा) असतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना प्रत्येक पेपरसाठी ९० (६० टक्के) गुण तर आरक्षित प्रवर्गासाठी १५० पैकी ८३ गुण आवश्यक आहेत. माजी सैनिकांसाठी ही अट ४५ टक्के आहे. शिक्षकांच्या मागणीवरुन आता ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत बदल करता येईल का, याची चाचपणी शिक्षण विभाग करीत आहे. मात्र, तो बदल करण्यापूर्वी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचेच (एनसीटीई) निकष बदलावे लागतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
‘एनसीटीई’ने २३ ऑगस्ट २०१० मध्ये शिक्षक पात्रता निश्चित केली आणि जुलै २०११ पासून शिक्षकांसाठी ‘टीईटी’ची अट लागू केली. त्याचवेळी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी देखील ‘एनसीटीई’ने निश्चित केली. महाराष्ट्र सरकारने १३ फेब्रुवारी २०१३ पासून शिक्षक भरतीकरिता ‘टीईटी’ बंधनकारक केली. पहिली ते आठवीच्या वर्गावरील नियुक्त शिक्षकांसाठी ही अट आहे. दरम्यान, राज्य सरकारने ‘एनसीटीई’च्या निकषांंत बदल न करता ३० जून २०२२ रोजी निर्णय काढून माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांच्या उत्तीर्णसाठी ४५ टक्के गुणांची मर्यादा निश्चित केली.
आता हाच धागा पकडून राज्य सरकारला गुणांची अट कमी करण्याचा अधिकार असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. त्यासाठी संघटनांनी तमिळनाडू सरकारने घेतलेल्या निर्णयाचाही संदर्भ दिला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी सरसकट ४५ टक्क्यांचा निकष करावा, अशी मागणी संघटनांनी सरकारकडे केली आहे. ‘एनसीटीई’च्या परस्पर त्यांनी ठरविलेल्या निकषांत राज्य सरकारला बदल करण्याचा अधिकार आहे का, यावर मार्गदर्शन मागविण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
‘टीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी सध्यातरी पूर्वीचाच निकष
‘एनसीटीई’च्या निकषांनुसार सध्या टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी ६० टक्के, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार माजी सैनिक प्रवर्गासाठी ४५ टक्के गुणाची अट आहे. आता माजी सैनिकांप्रमाणेच सर्वांसाठी ४५ टक्के गुणांचीच अट असावी, अशी मागणी होत आहे, पण त्यावर शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
- डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पुढची ‘टीईटी’ होणार जूनअखेर
सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना (इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत) दोन वर्षात ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. त्यानुसार १ सप्टेंबर २०२७ पूर्वी राज्यातील एक लाख ७० हजार शिक्षकांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना अधिकाधिक संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जून महिन्यात ‘टीईटी’ घेण्याचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी, ‘एमपीएससी’, ‘युपीएससी’च्या त्या महिन्यात परीक्षा आहेत का, याची पडताळणी केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.