Keshavrao jedhe
Keshavrao jedhe Sakal
महाराष्ट्र

न्यायासाठी मैदानात उतरणारा लढवय्या

सकाळ वृत्तसेवा

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याने प्रभावित झालेले विशीतले केशवराव पुढे महात्मा फुले यांचा सत्यशोधकी वारसा आणि छत्रपती शाहू महाराजांचा बहुजन-उद्धाराचा वसा घेऊन थेट राजकारणात उतरले. धार्मिक-सामाजिक सुधारणांची चळवळ १९१९नंतर राजकीय चळवळीत बदलू लागली आणि ब्राह्मणेतर पक्षाच्या माध्यमातून केशवराव जेधेंनी पुण्यातील सनातनी-प्रतिगामी वर्गाला हर प्रकारे सळो की पळो करून सोडले. सन १९२५ मध्ये पुणे म्युनिसिपालटीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले केशवराव यांनी तत्कालीन पुण्यातील सामाजिक समस्या सभागृहात आक्रमकपणे मांडल्या आणि सभागृहाबाहेरही प्रतिगामी व्यक्ती-वृत्तींविरूद्ध व्यापक जनसंघर्ष उभा केला.

पुढे महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी आपला मोर्चा स्वातंत्र्य लढ्याकडे वळवला. या प्रवासात त्यांची काकासाहेब ऊर्फ न. वि. गाडगीळ यांच्याशी घनिष्ट मैत्री झाली आणि त्यांचा काँग्रेसमधील राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीमुळे १९३६ मध्ये फैजपूर येथे भरलेले ग्रामीण भागातील काँग्रेसचे पहिले अधिवेशन ऐतिहासिक ठरले. ते १९३८ मध्ये महाराष्ट्र प्रांतीक काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खेडोपाडी, घरोघरी पोचली; पण पुढे केंद्रीय नेतृत्वाने शेतकरी-कष्टकरी वर्गाकडे केलेले दुर्लक्ष, त्या नेतृत्वाची भांडवलधार्जिणी भूमिका आणि पक्षांतर्गत कलह यांमुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि १३ जून, १९४८ मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.

शेकापच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे संघटन, त्यांच्यात जनजागृती करण्याचा लक्ष्यवेधी कार्यक्रम हाती घेतला. पुढे शंकरराव मोरे यांच्याशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे ते शेकापमधून बाहेर पडले आणि काहीशा विरामानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.

गोव्याच्या आंदोलनातही सक्रिय

दरम्यानच्या काळात केशवरा, भारतातील पोर्तुगीज वसाहती स्वतंत्र करण्यासाठी गोव्यातील देशभक्तांना साहाय्य करावे यासाठी स्थापलेल्या गोवा विमोचन सहायक समितीचे अध्यक्ष होते. या समितीने गोव्याबाहेरील भारतीयांनी गोव्याच्या हद्दीत घुसून सत्याग्रह करावे असे ठरवले. पोर्तुगीज पोलीसांचा संभाव्य लाठीमार लक्षात घेता, समितीने जेधेंना गोव्यात जाण्यापासून हद्दीवर रोखले. सत्याग्रहींना निरोप द्यायला केशवराव स्वतः १५ ऑगस्ट १९५५ रोजी बांदा येथे गेले; पण तिथेच पोलीसांचा लाठीमार आणि हिंसाचार सुरू झाला. तिथला रक्तपात पाहून केशवरावांनी सत्याग्रह तहकूब केला; पण काही सत्याग्रही भावनावेगात ही आज्ञा पाळू शकले नाहीत, त्या वेळी केशवराव त्यांच्या काळजीपोटी कडाडले, ‘‘तुम्हाला जायचेच असेल तर माझ्या शरीरावरून जावे लागेल; मग मीच सर्वप्रथम गोवा हद्दीत उडी घेईन.’’

संयुक्त महाराष्ट्र लढा

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही केशवराव जेधेंनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली होती. १९४६ साली बेळगावातील मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकर यांनी मुंबईसह महाराष्ट्र अखंड राहावा यासाठी मागणी केली. याचा पाठपुरावा करण्यासाठी आणि संमेलनातील मंजूर ठरावांची अमलबजावणी करण्यासाठी दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापण्यात आली. केशवराव जेधे या समितीत स्वतः होते. शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेत आचार्य दादा धर्माधिकारी यांनी मुख्य ठराव मांडला. त्याला दुजोरा देताना केशवरावांनीही भाषण केले. ‘महाराष्ट्रातील मराठी बोलणारा आणि मराठीवर प्रेम असणारा प्रत्येक मनुष्य मराठाच आहे, मग तो कोणत्याही जातीचा असो,’ असा क्रांतिकारी विचार केशवरावांनी सर्वप्रथम मांडला. इतकेच काय; महाराष्ट्रात आलेले जे परप्रांतीय लोक मस्तवाल आणि भ्रष्ट होते, जे काळा बाजार करून मराठी जनांना सतावत होते त्या व्यापाऱ्यांना केशवरावांनी इशाराही दिला, ‘माझ्या मराठी माणसांचे शोषण जे परप्रांतीय करत आहेत, त्यांची ही मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही.’

बारामतीचे पहिले खासदार

संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५७च्या मार्च महिन्यात सार्वत्रिक निवडणुका लढवण्याचे ठरवले. या निवडणुकीत काँग्रेसने केशवराव जेधेंना बारामती मतदारसंघातून तिकीट दिले. आबासाहेब शितोळे यांना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले. याशिवाय मालतीबाई तेंडुलकर याही रिंगणात होत्या. या तिहेरी लढतीत केशवरावांची सरशी झाली आणि ते बारामती मतदारसंघाचे पहिले खासदार ठरले. बारामतीच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाची पाळेमुळे रुजली आहेत ती केशवराव जेधेंच्या कार्यकर्तृत्वात आणि विचारांत!

केशवराव जेधे यांच्यामध्ये एक लढवय्या आणि संवेदनशील राजकारणी दडला होता. त्यामुळेच प्रचंड जनसमुदाय त्यांच्याशी पाठीशी कायम उभा राहिला. त्यांच्याइतकी लोकप्रियता अपवादानेच एखाद्या नेत्याला लाभली असावी. अशा लढाऊ बाण्याच्या नेत्याला विनम्र अभिवादन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT