solapur city Ekrukh medium project
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर-तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगाजवळील एकरुख मध्यम प्रकल्प १८७१ मधील आहे. ब्रिटिशांनी शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी अदिला नदीवर प्रकल्प बांधला. त्याची साठवण क्षमता तीन टीएमसी असून त्यामुळे ११ गावातील १२२९ हेक्टर सिंचनाखाली आले. तलावाची उभारणी, जॅकवेल मजबूत बांधकामाचे उत्तम उदाहरण असून शुद्ध व गोड पाणी या तलावाचे वैशिष्ट्य आहे. १५४ वर्षांचा हा जुना एकरूख प्रकल्प आता वर्ल्ड हेरिटज घोषित झाला आहे.
भारतातील कृष्णा नदीच्या खोऱ्यातील सीना उप-खोऱ्यात स्थित जागतिक वारसा सिंचन संरचना म्हणजेच एकरुख मध्यम प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगाने (आयसीआयडी) वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केले आहे. दीड वर्षांपूर्वी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकरुख प्रकल्पाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता मोहन जाधवर यांनी एकरुख प्रकल्प वर्ल्ड हेरिटजमध्ये समाविष्ठ करावा, असा प्रस्ताव सादर केला होता.
तो प्रस्ताव मान्य झाला असून एकरुख तलावाला ‘आयसीआयडी’कडून वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित झाला. त्याचे प्रमाणपत्र सेंट्रल वॉटर कमिशनने स्वीकारले आणि ते सोलापूरच्या जलसंपदा विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९० वर्षे जुना धामापूर तलाव वर्ल्ड हेरिटजमध्ये समाविष्ठ झाला आहे.
जागतिक वारसा स्थळ बनण्याचे फायदे...
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकल्पाचे संरक्षण, जतन आणि संवर्धन होणार
अशा वास्तू, प्रकल्प नष्ट होऊ नयेत म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरुन संरक्षण विशेषत: युद्ध काळात संरक्षण मिळते
जागतिक वारसा स्थळे म्हणून ओळख मिळाल्यावर जगभरातील पर्यटक तेथे आवर्जून भेटी देतात. त्यातून पर्यटनाला चालना मिळते
स्थळांचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जगाला ज्ञात होतो. तो भविष्यातील पिढ्यांसाठी जपला जातो
स्थळांच्या दुरुस्ती व विकासासाठी ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा निधीतून विशेष मदत मिळते
एकरुख प्रकल्पाबद्दल थोडक्यात...
सोलापूर शहर महाराष्ट्रात औद्योगिकरणात मुंबई, पुणे, नागपूरनंतर चौथ्या क्रमांकांवर होते. त्यावेळी भविष्याची गरज ओळखून ब्रिटिशांनी १८६८ मध्ये एकरुख प्रकल्पाचे काम सुरु केले आणि तीन वर्षात पूर्ण केले. सुरवातीला शेतीसाठी पाणीपुरवठा हा हेतू होता, पण १९३० पासून त्यातून सोलापूर शहरालाही पाणी आणले. हा प्रकल्प वर्ल्ड हेरिटज झाल्याने अदिला नदीचेही पुनर्जीवन होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.