electrick wresatler Sambhaji Pawar 
महाराष्ट्र बातम्या

बिजली मल्ल संभाजी पवार

शंकर पुजारी (कुस्ती निवेदक)

प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात आणि आता पैलवान संभाजी पवार...पुकारले की अंगात वारं संचारलेला शिडशिडीत बांध्याचा मल्ल मैदानात अक्षरक्षः छलांग टाकायचा. त्याआधी जागेवरच शड्डू, वार्मअप आणि कसरती सुरु व्हायच्या. मग शौकीनही मागे सरकून जागा मोकळी करायचे. मैदानात जल्लोष सुरु व्हायचा. या जोश-माहोलमुळेच प्रतिस्पर्धी मल्ल बिथरायचा. पंजाला पंजा भिडला रे भिडला की अवघ्या दोन-तीन मिनिटात हुकमी डाव टाकत प्रतिस्पर्ध्याला चित झालेला असायचा. ही होती संभाजी पवार यांची खासियत. आला...आला म्हणेपर्यंत मैदान मारलेलं असायचं. म्हणूनच त्यांची देशभर बिजली मल्ल म्हणून ओळख झाली. 


पवार कुटुंबिय मुळचे खानापूर तालुक्‍यातील कडेपूरचे. संभाजीआप्पांचे आजोबा म्हणजे नाना पवार. ते सांगलीत आले. त्यांची कुस्ती पाहून बुधगावकर सरकारांचा टांगा त्यांना कुस्तीसाठी बोलवायला यायचा. त्यांचे सुपूत्र हरि पवार हे तर वज्रदेही म्हणून कुस्ती क्षेत्रात गौरवले गेले. पूर्ण शाकाहारी असे ते मल्ल होते. हरि पवार यांची तीन मुले संभाजी, शिवाजी आणि तानाजी. तिघेही लालमातीत रमले. त्यातल्या धाकट्या संभाजीने घराण्याचा कुस्तीतील दबदबा पुढे नेला. गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटला तर त्याला ओढून काढताना तो तुटेल पण निघायचा नाही. शिडशिडीत तब्येतीचा संभाजी पवार प्रतिस्पर्ध्याला एकदा चिकटला की झोंबलं तरी हटायचा नाही. पटात घेत चित करीतच ते बाजूला सुटायचा. मैदानात आल्या...आल्या अतिशय चलाखीने हालचाली करून प्रतिस्पर्ध्याला कळण्यापूर्वीच आस्मान दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्याचे ते पारणे फेडे. 

सन 1960 च्या दशकात कुस्ती क्षेत्रात सर्वत्र संभाजी पवारांचा बिजली मल्ल म्हणून दबदबा निर्माण झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाबसह मध्यप्रदेशातही त्यांनी मैदाने मारली. आप्पांच्या कुस्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय चलाख होते. कुस्तीचे मानसशास्त्र त्यांना अवगत होते. मैदानात नाव पुकारल्यानंतर जागेवरच शड्डू ठोकून प्रतिस्पर्ध्याला आव्हान द्यायचे. हलगीच्या कडकडाटात त्यांचा चलाखपणा आणि जागेवरच्या कसरतींनी ते साऱ्या शौकीनांना आपलंसं करायचे. आधी ते प्रेक्षकांना जिंकायचे आणि मग प्रतिस्पर्ध्याला हरवायचे. शिडशिडीत बांधा, भरपूर उंची अशा तब्येतीचा मल्ला मैदानात उभा ठाकला, की लोखंडी खांबच वाटायचा. खडाखडी होताच सापाच्या चपळाईने घोट्यातून पट काढायचे. त्यानंतर घिस्सा, धोबीपछाडसारख्या हुकमी डावाने प्रतिस्पर्ध्याला चितपट करून अख्खे मैदान डोक्‍यावरच घ्यायचे. 


आप्पांच्या अनेक कुस्त्या गाजल्या. त्यापैकी आठवेळा महाराष्ट्र चॅम्पियन व तीनवेळा ऑल इंडिया चॅम्पियन तथा कुस्तीचा जादुगर म्हटल्या जाणाऱ्या श्रीरंग शिंदेबरोबरची राजवाड्यातील कुस्ती चांगलीच गाजली. आप्पा गावभागातील आणि शिंदे सरकारी तालमीतील. त्यामुळे दोन्ही परिसरातील प्रेक्षक प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. ही कुस्ती बरोबरीत सुटली. कोल्हापूरचा हुकमी एक्का विष्णू माने आणि आप्पांची कुस्ती गाजली. मोतीबाग तालमीच्या आनंदा हेर्लेकर या ताकदवान मल्लाचा पराभव केला. एक नंबर शाळेत मिरजेच्या मैनुद्दीन हंगडला चितपट केले. कर्नाटकातील म्हैसूर येथे मुक्‍या मल्लाला पराभूत केले. दुधोंडीच्या पांडू सावंतला राजवाड्यात चितपट केले. हिंदकेसरी चंबा मुत्नाळ, रूस्तूम ए हिंद हरिश्‍चंद्र बिराजदार, रसुल हनिफ आदी अनेक मल्लांबरोबर आप्पांनी कुस्त्या केल्या. तत्कालीन ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना सातारा येथील मैदानात पुढे येत शाबासकी दिली होती. 


लालमातीच्या मैदानानंतर अवगत केलेल्या मानसशास्त्राचा त्यांनी राजकारणातही उपयोग केला. राजकारणात उतरल्यानंतर लालमातीला कधी विसरले नाहीत. सांगली जिल्ह्यातील कुस्तीचा इतिहास लिहायचा झाला तर तो त्यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही. खऱ्या अर्थाने त्यांनी सांगलीची कुस्ती सर्वत्र नेली, नावारूपास आणली. त्यांच्या निधनाने लाल मातीतला बिजली मल्ल हरपला असेच म्हणावे लागेल. 
(शब्दांकन ः घनशाम नवाथे) 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ईश्वरपूर नामांतराची १७२ वर्षांची मागणी आम्ही पूर्ण करून नागरिकांच्या भावनांचा आदर केला'; प्रचारसभेत काय म्हणाले CM फडणवीस?

Beed Politics : अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, पण धनंजय मुंडेंना परळी सुटेना! सभांना मुंडेंची दांडी, चर्चेला उधाण

Mokshada Ekadashi 2025 Donation: आज मोक्षदा एकादशी; तुमच्या राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान

Akkalkot Politics : सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ५०० कोटी; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, 'लाडकी बहीण'बाबत काय म्हणाले...

Motivational Story : एनआयटीचा प्रवेश सोडून एनडीएमध्ये सिद्धी जैनचा ऐतिहासिक विजय; राष्ट्रपती कांस्यपदक मिळवणारी देशातील पहिली महिला

SCROLL FOR NEXT