महाराष्ट्र

वाड्यातील फटाके बाजारात मंदी

सकाळ वृत्तसेवा

वाडा : वाडा कोलम या भाताच्या वाणामुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या वाडा तालुक्‍याला काही वर्षांपासून "फटाक्‍यांचे शहर' अशी नवी ओळख मिळाली असून येथे फटाक्‍यांची मोठी उलाढाल होते; मात्र यंदा यावर मंदीचे सावट आहे. त्यातच विधानसभा निवडणूक आणि परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे अद्यापही ग्राहक खरेदीकडे वळलेले नाहीत. त्यातच फटाक्‍यांच्या खरेदीकडे बहुतांश जणांनी पाठ फिरवल्यामुळे यंदा फटाके व्यवसायात 35 ते 40 टक्‍यांनी घट झाली आहे, अशी माहिती येथील फटाके विक्रेत्यांनी दिली. 

ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, मुंबई या जिल्ह्यांत फटाक्‍यांचे घाऊक आणि किरकोळ विक्रेते असूनही येथील फटाके व्यापाऱ्यांकडील वाजवी दरामुळे विक्रेत्यांचा ओढा वाड्याकडेच असतो. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे दिसते; मात्र यंदा या व्यवसायावरही मंदीचे सावट आहे. त्यातच निवडणुका आणि आता सततचा पाऊस यामुळे व्यवसायात कमालीची घट झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
पूर्वी दिवाळी सणापुरताच मर्यादित असलेला फटाक्‍यांचा व्यवसाय आता बाराही महिने झाला आहे.

विविध सण, लग्न समारंभ, विविध राजकीय पक्षांच्या सभा, निवडणुका, नागरिकांचे विविध कार्यक्रम, वाढदिवस अशा प्रत्येक वेळी फटाक्‍यांची मागणी असते; मात्र वाढते प्रदूषण, शाळा-महाविद्यालयांमध्ये राबवले जाणारे फटाकेमुक्त दिवाळी अभियान यामुळे फटाके विक्री मंदावली आहे. हौशी ग्राहकांकडून मात्र दर वर्षी न चुकता फटाक्‍यांची खरेदी केली जाते. त्यामुळे वाडा शहरात प्रीतम सेल्स एजन्सी, दिलीप ट्रेडर्स, मनोरे ट्रेडर्स, सिद्धिविनायक ट्रेडर्स, पातकर ट्रेडर्स, नंदकुमार ट्रेडर्स आदी घाऊक फटाक्‍यांची दुकाने दिवाळीच्या वेळेस रात्रंदिवस सुरू असतात.

तमिळनाडू येथील शिवा काशी येथे फटाक्‍यांचे उत्पादन केले जाते. तेथून थेट माल वाड्यातील व्यापारी आणतात. या दुकानात मालकासह काही कर्मचारी रात्रंदिवस येथे काम करतात. घाऊक व्यापारी व किरकोळ विक्रेते यांनी दुकानात गर्दी केल्याचे दिसते. पहिले काही दिवस हे घाऊक विक्रेते आणि दिवाळीच्या पाच-सहा दिवस आधी घरगुती ग्राहक यांची खरेदीसाठी झुंबड असलेली पहावयास मिळते. यंदा मात्र हे चित्र निराशाजनक आहे. 

फॅन्सी फटाक्‍यांची धूम 

यंदा दिवाळीनिमित्त फॅन्सी फटाक्‍यांची धूम असून त्याचीच मागणी जास्त आहे. फॅन्सी फटाक्‍यांची किंमत 50 पासून 2 हजारच्या वर आहे. यामध्ये शोभेचे फटाके, पाऊस, चक्री, फुलबाजे, रॉकेट, फॅन्सी शॉट, फॅन्सी मल्टीकलर शॉट, आकाशात उडणारे फॅन्सी शॉट, डबल बार, ट्रिपल बार, कार्टून, नागगोळी, चिटपुट, किटकॅट, ऍटमबॉम्ब, लवंगी, आकाशातील रंगीबेरंगी फटाके, सुतळी बॉम्ब, भुईचक्र, फटाकडी आदींचा समावेश आहे. 

स्विपकार्डची व्यवस्था 

फटाके व्यवसाय हा रोखीने करण्याऐवजी ऑनलाईन करावा, यासाठी व्यापाऱ्यांनी स्विपकार्डची व्यवस्था आहे. त्यामुळे स्विपकार्डद्वारे ग्राहक व्यवहार करू शकतात. 

सुरक्षिततेसाठी फायर नियंत्रण यंत्र 

फटाके हे ज्वलनशील असल्याने काही दुर्घटना घडू नये, म्हणून प्रत्येक दुकानात फायर नियंत्रण यंत्र बसवण्यात आले आहे. तसेच दुकानासभोवताली पाण्याची पाईपलाईन फिरवण्यात आली आहे. तसेच दुकानासमोर गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था आहे. 

रस्ता खराब असल्याचा फटका 

वाडा येथे फटाके खरेदीसाठी कल्याण ठाणे व भिवंडी येथून किरकोळ विक्रेते येतात; मात्र भिवंडी-वाडा-मनोर हा महामार्ग अत्यंत खराब असल्याने वाडा येथे येण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. खराब रस्त्यांमुळे अनेक विक्रेते फटाके खरेदीसाठी येत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

वाडा येथे वाजवी दरात आणि उत्तम प्रतीचे फटाके मिळत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथून फटाके खरेदी करतो. मुबईतील दहिसर येथे स्टॉल टाकून या फटाक्‍यांची आम्ही विक्री करतो. 
- दीपक गोठल, अतुल दळवी, किरकोळ विक्रेते, दहिसर (मुंबई) 

यंदा फटाके व्यवसायावरही मंदीचे सावट असून विधानसभा निवडणुका आणि सततचा पाऊस यामुळे यंदा ग्राहकांची संख्या कमी आहे. 35 ते 40 टक्‍यांनी व्यवसाय कमी झाला आहे. 
- प्रीतम भोपतराव, प्रीतम सेल्स एजन्सी, फटाके व्यापारी 

web title : Fireworks market slump in wada

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT