vande mataram

 

sakal solapur

महाराष्ट्र बातम्या

८० वर्षांनंतर स्वातंत्र्यदिनी प्रथमच राष्ट्रगीतापूर्वी गायले जाणार ‘वंदे मातरम्‌’! ध्वजारोहणानंतर आधी राष्ट्रीय गीत, नंतर राष्ट्रगीत, शेवटी राज्यगीत गायले जाणार

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनी उद्या जिल्ह्यात प्रथमच नव्या गीतक्रमानुसार स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम होणार आहेत. ‘वंदे मातरम्‌’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा ध्वजारोहणापूर्वी संपूर्ण सहा कडव्यांचे संपूर्ण ‘वंदे मातरम्‌’ गायन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर ध्वजारोहण, राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि शेवटी राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ असा क्रम राहणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनी उद्या जिल्ह्यात प्रथमच नव्या गीतक्रमानुसार स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम होणार आहेत. ‘वंदे मातरम्‌’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा ध्वजारोहणापूर्वी संपूर्ण सहा कडव्यांचे संपूर्ण ‘वंदे मातरम्‌’ गायन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर ध्वजारोहण, राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि शेवटी राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ असा क्रम राहणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार शाळांसह शासकीय व निमशासकीय कार्यालये, संस्था, संघटना तसेच विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका आणि ग्रामपंचायत मुख्यालयांवर या गीतक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या असून, शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून गीतांचा सराव करून घेण्यात आला आहे. ‘वंदे मातरम्‌’ने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. स्वदेशी चळवळीला व्यापक स्वरूप देण्यातही या गीताची भूमिका राहिली. मातृभूमीचे वंदन आणि भारताच्या नैसर्गिक समृद्धीचे, वैभवाचे वर्णन करणाऱ्या या गीताला स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात विशेष स्थान आहे.

शिक्षकांकडून नव्या गीतक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती

नव्या गीतक्रमानुसार कार्यक्रम घेण्यासाठी शाळांमध्ये तयारी करण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रीय गीत’ आणि ‘राष्ट्रगीत’ यांतील फरकही समजावून सांगण्यात आला आहे. काही शाळांमध्ये ‘वंदे मातरम्‌’चा नियमित सराव असल्याने विद्यार्थ्यांना गीत परिचित आहे.

८.३५ ते ९.३५ दरम्यान अन्य शासकीय कार्यक्रमांना बंदी

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ या वेळेत कोणताही अन्य शासकीय अथवा निमशासकीय कार्यक्रम आयोजित करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत. स्वतंत्र ध्वजारोहण करावयाचे असल्यास ते सकाळी ८.३५ पूर्वी किंवा ९.३५ नंतर घेता येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शाळा

  • जिल्हा परिषद : 2,373

  • माध्यमिक : १,०८५

  • खासगी : १,३६२

  • महापालिका : ६३

  • नगरपालिका : ४०

  • इतर खासगी शाळा : सुमारे ३,०००

शासनाच्या परिपत्रकानुसार सर्वांना सूचना

शासनाच्या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयांसह शाळा, संस्था व संघटनांना ध्वजारोहणापूर्वी ‘वंदे मातरम्‌’ गायनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत म्हणण्याच्या सूचना तालुका व ग्रामस्तरावर देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना त्यानुसार तयारी करण्यास सांगितले आहे.

- कार्तिकेयन एस., जिल्हाधिकारी, सोलापूर

--------------------------------------------------------------------------------------------

सर्व शाळांमध्ये प्रथम राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्‌’

राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार स्वातंत्र्यदिनी सर्व शाळांमध्ये प्रथम राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्‌’, त्यानंतर राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि शेवटी राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सादर केले जाणार आहे. या नव्या गीतक्रमाबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनीही या बदलाची माहिती घेऊन कार्यक्रमासाठी तयारी केली आहे.

- रजनी राऊळ, पर्यवेक्षिका, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर

---------------------------------------------------------------------------------------------

देश व राज्याविषयी अभिमानाची भावना रुजण्यास मदत होईल

आमच्या शाळेत ‘वंदे मातरम्‌’चे नियमित गायन होत असल्याने विद्यार्थ्यांना हे गीत परिचित आहे. त्यामुळे यंदा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्याचे सामूहिक गायन करताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह असेल. राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीत या तिन्ही गीतांमधून विद्यार्थ्यांमध्ये देश व राज्याविषयी अभिमानाची भावना रुजण्यास मदत होईल.

- संगीता जाधव, मुख्याध्यापक, मनपा मुलांची मराठी केंद्र शाळा क्र. २, सोलापूर

-----------------------------------------------------------------------------------------------

‘वंदे मातरम्‌’चा इतिहास व त्यामागची प्रेरणाही नव्या पिढीपर्यंत पोहोचेल

आतापर्यंत बहुतेक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांच्या शेवटी ‘वंदे मातरम्‌’ गायिले जात होते. यंदा या गीतास १५० वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्याचे गायन होणे हा विशेष योग आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल आणि ‘वंदे मातरम्‌’चा इतिहास व त्यामागची प्रेरणाही नव्या पिढीपर्यंत पोहोचेल.

- कृष्णपरमेश्वर सुतार, मुख्याध्यापक, मनपा मुलांची केंद्र शाळा क्र. २८, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT