boramani murder case
solapur sakal
सोलापूर : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील दिराने वडिलोपार्जित जमिनीची वाटणी मागणाऱ्या वहिनीचा आणि पुतण्या व पुतणीचा खून केला. या तिहेरी हत्याकांडाचे २८० पानांचे दोषारोपपत्र सोलापूर तालुका पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे. पोलिसांनी यात ३० साक्षीदार तपासले असून ५० वस्तू जप्त केल्या आहेत. या खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होईल. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत काम पाहणार आहेत.
बोरामणी येथील मस्के वस्तीवर राहणाऱ्या शंकर ऊर्फ पप्पू मस्के याच्या दोन भावांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी शंकरवरच होती. पतीच्या निधनानंतर गायत्री सुधाकर मस्के या पतीच्या वाट्याची जमीन दीर शंकर याच्याकडे मागत होत्या. तसेच वहिनीने शंकरला २५ लाख रुपये हातउसने दिले होते, ते पैसेही गायत्री मस्के परत मागत होत्या. शंकर ना जमिनीचा हिस्सा देत होता ना पैसे. यावरून गायत्री मस्के आणि शंकर मस्के यांच्यात सातत्याने वाद होत होते. या रागातून शंकरने वहिनीसह पुतण्या शिवराज व पुतणी प्रियंका यांचा १ मेच्या मध्यरात्री झोपेत असताना खून केला.
यात सोलापूर तालुका पोलिसांनी शंकर मस्के, त्याची पत्नी राणी, मुलगी दीक्षा, मुलगा धीरज, मेव्हणा सूरज माधवराव मोरे आणि त्याचा मित्र सचिन शिवाजी वाघमारे यांना अटक केली. यातील सूरज मोरे व सचिन वाघमारे यांना दोन दिवसांपूर्वीच जामीन मिळाला असून, बाकीचे संशयित आरोपी जेलमध्येच आहेत. पोलिसांनी दोषारोपपत्रात डॉक्टरांचा अहवाल, संशयिताचे सीडीआर, बॅंक स्टेटमेंट जोडले आहे. गुन्ह्यात पोलिसांनी मृताचे कपडे, घटनास्थळावरील तलवार, तलवारीची तुटलेली मूठ, चारचाकी वाहन, नेकलेस, ठुसी, मंगळसूत्र, बिलवर, अंगठी, गंठण, टॉप्स, कर्णफुले, गॉगलचे पॉकेट अशा ५० वस्तू जप्त केल्या आहेत.
शिवराजच्या शरीरावर तब्बल ४९ जखमा अन्...
रागाच्या भरात तलवार घेऊन घराच्या गच्चीवर गेलेल्या शंकर मस्केने वहिनी गायत्री यांच्यावर पहिला वार केला. त्यावेळी पुतण्या शिवराज झोपेतून उठला आणि काका शंकरला प्रतिकार करू लागला. त्यावेळी त्याने शिवराजवरही वार केले आणि पुतणी प्रियंकाच्या दिशेने जाऊ लागला. त्यावेळी जखमी शिवराज पुन्हा शंकरला अडविण्याचा प्रयत्न करीत होता. रागात शंकरने शिवराजवर सपासप वार केले. यात शिवराजच्या शरीरावर तब्बल ४९ जखमा झाल्या. गायत्री यांच्या शरीरावर १३ आणि प्रियंकाच्या शरीरावर ६ जखमा असल्याचे मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालात नमूद आहे. शंकरने तिघांचाही निर्घृणपणे खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.