महाराष्ट्र

आनंदस्वर नव्वदीत

मंदार कुलकर्णी

पुणे - ‘‘रामरक्षा करायची माझी इच्छा आहे. भगवद्‌गीतेतल्या अध्यायांचं रेकॉर्डिंग करताना खूप आनंद मिळाला होता. तसं रामरक्षेशी संबंधित काही काम करायला आवडेल. रामायणातल्या काही गोष्टींचं रेकॉर्डिंग करायला आवडेल. हिंदीतल्या चांगल्या चांगल्या कवींच्या रचनाही करण्याची इच्छा आहे...’’ नऊ दशकांचा आनंदस्वर किणकिणतो. ज्या आवाजानं पाच पिढ्यांचं जगणं व्यापून टाकलं, तो हा आनंदस्वर. अजूनही नव्या कल्पना आहेत, जुन्या आठवणींचा जिव्हाळा आहे, कलेविषयीची निष्ठा तर शब्दाशब्दांतून सांडते.

लता मंगेशकर हे या आनंदस्वराचं नाव. गेल्या वर्षी दीदींच्या गानकारकिर्दीचा अमृतमहोत्सव साजरा झाला आणि शुक्रवारी (ता. २८) त्या नव्वदाव्या वर्षात पदार्पण करताहेत. त्या निमित्तानं त्या ‘सकाळ’शी बोलत होत्या. बोलण्यात कमालीची आत्मीयता, तळमळ. श्रुती-स्मृती तल्लख. अनेक शब्दांना जिवंत करीत त्यांची रूपं रसिकांच्या मनावर कोरणाऱ्या दीदी बोलतात, तेव्हा त्याला सकारात्मकतेची झालर असते. 

नव्वद वर्षांच्या या लोकविलक्षण प्रवासात तुमच्या मनात काय भावना आहेत, कुणाची आठवण येते, असा प्रश्न आपण विचारतो आणि मंद स्मित करत दीदी मोरपिशी भूतकाळात जातात ः ‘‘मला माझ्या बाबांची-मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची आठवण येते. बाबांनंतर जवळजवळ पन्नास वर्षं आई (माई मंगेशकर) आमच्यासोबत होती. तिनं आम्हाला जसं शिकवलं, वाढवलं, त्याची मला आठवण येते. मी ज्यांच्याबरोबर गायले, ते किशोरकुमार, मन्ना डे, मुकेश यांचीही आठवण येते. मुकेश यांच्याबरोबर तर आमचे घरोब्याचे संबंध होते. मी त्यांना राखी बांधायची. मला वाट दाखवणाऱ्या अनेक संगीतकारांचीही मला आठवण येते. गुलाम हैदर, अनिल विश्वास, खेमचंद प्रकाश, मदनमोहन किती नावं सांगू? शंकर-जयकिशन आणि मी तर साधारण बरोबरच करिअर सुरू केलं. अनिल विश्वास यांनी अगदी श्वासाचासुद्धा आवाज कसा होऊ द्यायचा नाही, तो कसा टाळायचा, हे शिकवलं. अशा चांगल्या लोकांना मी विसरू शकणार नाही.’’ 

‘अरेबिक गाणं गायचं राहिलंय’ 
इतक्‍या वर्षांत भरभरून काम केलेल्या, प्रयोगांचे डोंगर उभारलेल्या दीदींना कोणतं काम राहिल्याची खंत वाटते का, हा प्रश्न आणि त्यावर दीदींचं फार छान उत्तर ः ‘‘मी एका रशियन कार्यक्रमात गेले होते, तिथं मी रशियन गाणं गायलं. ते लोकांना खूप आवडलं. टोरांटोमध्ये एका गायिकेच्या विनंतीवरून मी तयारी करून एक इंग्लिश गाणं गायलं. मी फिजी भाषेतलंसुद्धा गाणं गायले आहे. मात्र, अरेबिक भाषेतलं एखादं गाणं गायची माझी इच्छा अपूर्ण राहिली आहे. त्यात फार छान छटा असतात.’’ 

‘दीदी तुम्ही केलेलं काम अक्षरशः सागराएवढं आहे, त्यामुळं ही किंचित खंत असं आपण म्हणूया,’ या टिप्पणीवर दीदी खळखळून हसतात- ‘‘मला तीही मोठी वाटते,’’ ही त्यांची टिप्पणी त्यांचं मोठेपण अधोरेखित करते. 

कुणाचं मन न दुखावणं, हेच तत्त्वज्ञान
दीदी आध्यात्मिक वृत्तीच्या. मंगेशाच्या भक्त. सगळे देव मानतात. शिर्डीचे साईबाबा, स्वामी समर्थ यांचाही त्या उल्लेख करतात. आयुष्याच्या या टप्प्यावर कोणतं तत्त्व तयार झालंय, या प्रश्नावर त्या फार छान सांगतात ः ‘‘माझ्या या सगळ्या प्रवासात मी शिकले ते म्हणजे कुणाचं मन दुखवायचं नाही. लोकांशी चांगलं बोलावं, आदर द्यावा. माझ्यासमोर चार वर्षांचं मूल आलं, तरी मी अहो-जाहो म्हणते. शक्‍य असेल तिथं कुणाचं मन दुखवायचं नाही, हे मी पाळते.’’

आत्मचरित्र लिहायचा विचार नाही
‘‘मी आत्मचरित्र लिहिणार नाही,’’ असं त्या स्पष्टपणे सांगतात. ‘‘मला बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्‍य सांगावंसं वाटतं. त्यांनाही कुणी तरी असं विचारलं होतं, तेव्हा ‘माझं आत्मचरित्र धूळ खात पडलेलं मला आवडणार नाही,’ असं ते म्हणाले होते. मलाही तेच वाटतं. तुम्हीच बघा ना, आम्ही केलेल्या रेकॉर्डस आज त्या स्वरूपात विकल्या जात नाहीत, पुस्तकं पडून असतात. आमचा जो रेकॉर्डसचा, पुस्तकांचा काळ होता, तो आता राहिलेला नाही. त्यामुळं आत्मचरित्र लिहिण्यात अर्थ नाही,’’ अशी पुस्ती त्या जोडतात. 

रीमिक्‍समध्ये ‘स्वत्व’ आहे का?
रीमिक्‍सबद्दल प्रतिकूल मत दीदींनी याही आधी व्यक्त केलंय. त्यामागचे विचार त्या सांगतात ः ‘‘मला रीमिक्‍स कधीच आवडलं नाही. मूळ गायकानं जे गाऊन ठेवलेलं असतं, ते नवीन गाण्यात येत नाही. मी तर ऐकलं आहे, की आमची काही गाणी शब्द बदलून आता मालिकांमध्येसुद्धा वापरतात. पण, मग त्यात तुमचं ‘स्वत्व’ आहे का? तुम्ही तुमचं तयार करावं.’’ 

नवीन गायकांनी गाण्याआधी शास्त्रीय संगीत शिकलं पाहिजे. बेस पक्का केला पाहिजे, असं दीदींचं मत. कुणाची कॉपी करू नका, असंही त्या आवर्जून सांगतात ः ‘‘माझी गाणी मुलं गातात, पुरुष गातात. त्यात काही अर्थ नाही. प्रत्येकानं स्वतःची वाट तयार केली पाहिजे. मात्र, त्याला पाया शास्त्रीय संगीताचा हवा.’’  

बोलता बोलता दीदी हृदयनाथ मंगेशकर यांच्या चालींचा उल्लेख करतात. ‘‘त्याची गाणी गायला खूप अवघड असतात. त्याचं संगीत मला आवडतं. ते गाताना गायकाला खूप विचार करावा लागतो. आम्ही संत ज्ञानेश्वरांचे अभंग केले. त्यात ‘मोगरा फुलला’ ही रचना होती. तेव्हा हृदयनाथनं मला सांगितलं, की ते लिहिताना संत ज्ञानेश्वरांनी जो विचार केला, तो विचार करून तू गा. मी तसा विचार करून गायले,’’ असं दीदी सांगतात, तेव्हा त्यांची गाणी काळाच्या लाटेतही टिकून का राहिली याचं उत्तर आपोआपच मिळतं.  आता गाण्यांचं तंत्र बदललंय, नव्या पद्धती आल्या आहेत- मात्र अभिजात संगीत कुठं तरी हरवलं आहे. पूर्वीच्या काळातली तळमळ, निष्ठा कमी झाली आहे का, असा प्रश्न विचारल्यावर दीदी फार सकारात्मक उत्तर देतात ः ‘‘जो वर येतो तो खाली जातो आणि जो खाली जातो तो पुन्हा वर येतो. दुनिया गोल है! त्यामुळं अभिजात संगीताचं युगसुद्धा पुन्हा येईल, अशी मला आशा वाटते.’’ ही आशा, ही सकारात्मकताच या नऊ दशकांच्या आनंदस्वराला ताजंतवानं ठेवते. बोलणं संपतं, तेव्हा ‘श्रुती धन्य जाहल्या’ असतातच; पण मनातही सकारात्मकतेचं चांदणं फुललेलं असतं!

जयोस्तुते लता...
नम्रता विनम्रता
लीनता सभ्यता
प्रसन्नचित्त तू सदा
तूच केवळ ती लता।

    अजातशत्रू मान्यता
    कार्यकुशल निपुणता
    देशाची तू अस्मिता
    तूच केवळ ती लता।

राष्ट्रभक्त गायिका
सप्तसूर अंकिता
‘भारतरत्न’ मंडिता
तूच केवळ ती लता।

    गानमान सर्वोच्चता
    सुस्वभावी नि-गर्विता
    भूषण तू भारता
    तूच केवळ ती लता।

हरिरूपा दीनानाथा
कन्यका तू लता
जयोस्तुते लता लता
तूच केवळ ती लता।
(कवी : बाळ आडकर, पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT