तात्या लांडगे
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी असतानाही राज्यात १४ हजारांहून अधिक पुरुष तब्बल ११ महिन्यांपासून या योजनेचा लाभ घेत असल्याची बाब पडताळणीत समोर आली आहे. त्यात सोलापूर शहर-जिल्ह्यातील सुमारे ४३० पुरुष आहेत. दरम्यान, या ४३० पुरुषांकडून लाभाची संपूर्ण एकूण २३.१० कोटी रुपये रक्कम वसूल केली जाणार असून त्यासाठी संबंधितांना रक्कम परत करण्याची महिनाभराची मुदत दिली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला पात्र असताना देखील २१ पेक्षा कमी आणि ६५ वर्षांवरील महिलांनी देखील अर्ज केले आहेत. याशिवाय एका कुटुंबातील दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असा निकष असताना तीन-चार महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यातील काहींनी आमचे रेशनकार्ड विभक्त आहे, आम्ही योजनेसाठी पात्र असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे या लाभार्थींच्या याद्या शासन स्तरावरून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. त्या याद्या आता जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत त्या प्रत्येक लाभार्थीची पडताळणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल शासनाला सादर झाल्यावर संबंधितांचा लाभ बंद केला जाणार आहे. तुर्तास, पडताळणी होईपर्यंत या महिलांना लाभ मिळणार नाही.
...शासकीय आदेश अजूनही नाही
एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिला व २१ वर्षांपेक्षा कमी आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्या याद्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांना पाठवून अंगणवाडी सेविकांकडून त्यातील लाभार्थींची पडताळणी होईल. याशिवाय ज्या पुरुषांनी महिलांच्या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून रक्कम वसूल होईल, पण अजून त्यासंदर्भातील शासनाकडून आदेश प्राप्त झालेले नाहीत.
- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
वसुलीची कार्यवाही होणार बेताने...
अपात्र असतानाही योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ४० लाखांवर आहे. त्यात १४ हजारांहून अधिक पुरुष आहेत. याशिवाय एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला, वयोगटाचा निकष पूर्ण न करणाऱ्या महिला, सरकारी नोकरदार महिला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांनीही लाभ घेतला आहे. या अपात्र लाभार्थींना तब्बल सहा हजार कोटींहून अधिक रक्कम वितरीत झाली आहे. पहिल्या टप्प्यात पुरुष लाभार्थींकडून रक्कम वसूल होणार आहे. पण, शासकीय अधिकाऱ्यांकडून अर्जांची पडताळणी झाल्याने अपात्रांवर ‘एफआयआर’ करण्यास तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे बॅंकांशी पत्रव्यवहार करून अपात्र लाभार्थीच्या खात्यातील रक्कम रोखली जाणार आहे. ज्यांच्या खात्यात पैसे नाहीत, त्यांना साधी नोटीस देऊन मुदतीत पैसे भरण्यास सांगितले जाईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.