mantralay
तात्या लांडगे
सोलापूर : दरवर्षी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या केल्या जातात. यंदाही शिक्षक संघटनांच्या मागण्यांवरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या, पण जनगणनेमुळे केंद्र सरकारने काढलेला आदेश अडथळा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यंदा मतदार पुनरीक्षण, जनगणना व नवीन शिक्षक भरतीमुळे एकाही शिक्षकाची ना आंतरजिल्हा ना जिल्हांतर्गत बदली होईल, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
पती एका जिल्ह्यात, पत्नी दुसऱ्याच जिल्ह्यात; मुले आई किंवा वडिलांकडे, अशी परजिल्ह्यातील शिक्षकांची वस्तुस्थिती आहे. जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी संबंधित जिल्ह्यात तो शिक्षक किमान ५ वर्षे सलग सेवा पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, विशेष संवर्गातील कर्मचारी आणि पती-पत्नी एकत्रीकरण प्रकरणांमध्ये ही अट ३ वर्षांची असते. सध्या या निकषांनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी सुमारे दोन हजार शिक्षक पात्र आहेत. त्यांनी विनंती करूनही त्यांना ‘एसआयआर’, जनगणनेचे कारण सांगितले जात आहे. यावर शिक्षक म्हणतात, ‘आता आमच्या बदलीची कार्यवाही सुरू करा आणि जनगणनेचे काम झाल्यावर कार्यमुक्त करा’. पण, जनगणनेच्या कामामुळे शिक्षकांच्या बदल्या २०२७-२८ मध्येच होतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी आझाद मैदानावर मुंडण आंदोलन
२९ जुलैला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी देखील काहीच निर्णय झाला नाही. त्यानंतर ६ जानेवारीला देखील शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांसंदर्भातील बैठक झाली होती. त्याअनुषंगाने १९ जानेवारीला सर्व जिल्हा परिषदांना आदेश काढून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून बिंदुनामावली अद्ययावत करावी आणि पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश काढले. मात्र, त्या आदेशानुसार काहीच कार्यवाही झाली नसून, अजूनही अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही सुरूच आहे. दुसरीकडे, शिक्षक भरतीचीही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांची शक्यता धूसर मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षक ११ ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर ‘मुंंडण आंदोलन’ करणार आहेत.
...म्हणून बदल्यांची यंदा झाली नाही कार्यवाही
केंद्र शासनाच्या माध्यमातून जनगणनेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या होऊ शकत नाहीत. आपण दरवर्षी बदल्या करतोच, पण यंदा जनगणनेच्या कामामुळे बदल्यांची कार्यवाही झालेली नाही.
- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सचिव, ग्रामविकास व पंचायत राज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.