तात्या लांडगे
सोलापूर : रात्री-अपरात्री भांडण करून सासरच्यांनी किंवा पतीने घराबाहेर काढलेल्या किंवा संकटातील महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटरमध्ये आश्रय दिला जातो. राज्यात एकूण ५५ तशी केंद्रे आहेत. सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयाजवळील भगतसिंग मार्केटसमोर ते केंद्र आहे. प्रत्येक केंद्रात एकाचवेळी पाच महिला राहू शकतात, अशी सोय आहे.
सासरी नांदणाऱ्या विवाहितेला सासरच्यांकडून काही धोका असेल ती घरातून बाहेर पडते. अनेकदा माहेरचे लोक दूर अंतरावर असतात किंवा त्याठिकाणी त्यांची दखल घेतली जात नाही, अशावेळी त्या महिलांना जायचे कोठे हा प्रश्न पडतो. त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा देखील कोणीतरी घेण्याची शक्यता असते. त्या संकटग्रस्त महिला १८१ या टोल फ्री क्रमांकावर कधीही संपर्क साधू शकतात. त्यातून त्यांना अवघ्या १५ ते २० मिनिटात मदत मिळते आणि त्यांची सोय पुढे पाच दिवस केंद्र शासनाच्या वन स्टॉप सेंटरमध्ये केली जाते. कौटुंबिक हिंसाचार पीडित, बलात्कार पीडित, लैगिंक शोषण झालेल्या, बाललैगिंक पीडित, बालविवाह, हुंड्यासाठी छळ, अत्याचार, ॲसिड हल्ल्यातील जखमी, अपहरण झालेल्या महिला, मुलींना तेथे राहण्याची सोय आहे. त्या केंद्रात दाखल झाल्यावर संबंधित महिलेला तज्ज्ञ वकिलांकडून मोफत मदत मिळते. पोलिसांची मदत घेता येते, त्यांचे समुपदेशन देखील तेथे होते.
या वन स्टॉप सेंटरला केंद्र शासनाकडून दरवर्षी निधी प्राप्त होतो, त्यातून संकटग्रस्त महिलांना मदत दिली जाते. सोलापूर शहर-जिल्ह्यातील सरासरी २० ते २२ महिला दरमहा या केंद्रात मुक्कामी दाखल होतात. राज्यात दरमहा सरासरी ११०० महिला या केंद्रांमध्ये आश्रयाला असतात, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाकडे आहे.
संकटग्रस्त महिलांना वन स्टॉप सेंटरचा मोठा आधार
संकटग्रस्त महिला विशेषत: कौटुंबिक हिंसाचारातील महिलांसाठी राज्यभरात ५५ वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. त्याठिकाणी त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाते. याशिवाय त्या महिला तेथे पाच दिवस मुक्कामी राहू शकतात. या केंद्रांचा दरमहा एक हजारापेक्षा जास्त महिला आधार घेतात.
- नयना गुंडे, आयुक्त, महिला व बालकल्याण, पुणे
केंद्रातून मिळतात ‘या’ सुविधा
समुपदेशन, मारहाणीत जखमी असलेल्या महिलेस वैद्यकीय मदत
मोफत वकील किंवा पोलिसांकडून मदत केली जाते
कायदेविषयक सल्ला किंवा मार्गदर्शन
पाच दिवस मुक्कामी राहाण्याची सोय
चहा, नाष्टा, जेवण, नवे कपडे, अंघोळीसाठी साबण व अन्य वस्तू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.