Fula film
sakal solapur
यशवंत गव्हाणे
सोलापूर : कुर्डुवाडी परिसरातील चौभे पिंपरी येथील अभिनेत्री प्रियांतिका कांबळे हिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फुला’ मराठी चित्रपटातून मुरळीच्या जगण्याची वेदना पडद्यावर उभी केली आहे. पारंपरिक चालीरिती, रूढी-परंपरा आणि समाजाने थोपवलेल्या व्यवस्थेवर या चित्रपटातून प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले आहे. तिने फुला चित्रपटातून अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत दमदार एंट्री केली आहे.
आटपाडी तालुक्यातील तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट तयार केला आहे. याचे चित्रीकरण निंबवडे (ता. आटपाडी) येथे करण्यात आले आहे. यात सात गाणी आहेत. मुरळीच्या जीवनातील बदलती परिस्थिती वास्तवदर्शीपणे मांडली आहे. पूर्वी मुरळी देवादिकांच्या गाण्यांवर नृत्य करत. मात्र, बदलत्या काळात या परंपरेचे स्वरूप बदलले. आता नावालाच पारंपरिक गाणी सादर केली जातात आणि त्यानंतर फिल्मी गाण्यांवर बोली लावली जाते. यात मुरळीला जवळ बोलावणे, स्पर्श करणे अशा प्रकारातून होणारा मानसिक त्रास ‘फुला’ या पात्राच्या माध्यमातून मांडला आहे. या अन्यायाविरुद्ध फुलाने केलेला प्रतिकार आणि तिचे संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे ठरले आहेत.
फुलाची भूमिका साकारताना प्रियांतिकाला आटपाडीतील वाघ्या-मुरळी आकाश नाईक आणि आश्विनी नाईक यांनी मुरळीचे चालणे, बोलणे, नृत्यशैली आणि जीवनपद्धती याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. त्यामुळे प्रियांतिकाचा अभिनय अधिक वास्तवदर्शी झाला. प्रियांतिकाने यापूर्वी बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतही काम केले आहे. तसेच थिएटर आर्टिस्ट म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. पिंपरी (पुणे) येथे तिचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर अभिनय क्षेत्राकडे तिचे पाऊल वळले. तिचे वडील भीमराव कांबळे यांनी ‘पीसीएमसी’मध्ये मेकॅनिक म्हणून सेवा बजावली असून सध्या ते चौभे पिंपरीत शेती करतात. चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर हे बार्शीचे आहेत. त्यांंनी ‘शंकर शेठ’ ही भूमिकाही साकारली आहे.
आटपाडी तालुक्यातील कलाकारांचे योगदान
आटपाडीतील पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे. पटकथा रवीकिरण जावीर यांनी तर समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, अतुल लोखंडे यांनी कला दिग्दर्शन, राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. तर नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे. वेशभूषाकार कोमल जावीर, अक्षता पाटील असून रंगभूषाकार समाधान भोरे यांनी काम पाहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.