Sanjay Raut
Sanjay Raut  Esakal
महाराष्ट्र

Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंच्या फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा; संजय राऊतांचं PM नरेंद्र मोदी यांना पत्र

अंकिता खाणे (Ankita Khane)

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा राजकीय गाजावाजा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी आणि या उपक्रमांवर आतापर्यंत झालेल्या खर्च करण्यात आलेल्या निधीचा स्रोत नेमकं काय आहे? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित करत याची चौकशी व्हावी असं म्हटलं आहे.

श्रीकांत शिंदे फाउंडेशनला कोट्यावधी रुपये कोण देत आहेत? ही माहिती मिळणे गरजेचे आहे असं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. धर्मदाय आयुक्त या संदर्भात चौकशी करावी, अशा प्रकारची तक्रार वकील नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुक्त्यांकडे केली आहे. मात्र एक महिना उलटूनही या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याचं आणि माहितीच्या अधिकारात ही सगळी माहिती दिली जात नसल्याचा संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी पत्र केलं सोशल मिडीयावर शेअर

संजय राऊत यांनी सोशल मिडीया X वरती पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यात देखील सुरू आहे. त्याखेळाचे सूत्रधार आहेत मिंधेसरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत. पैसै देणारे कोण आहेत, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊतांनी काय लिहलं आहे पत्रात?

मा. प्रधानमंत्रीजी,

विषय: श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याबाबत.

महोदय,

देशातील भ्रष्टाचार, काळ्या पैशांचे व्यवहार मोडून काढण्यासाठी आपण गेल्या १० वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आपण जनतेला पुन्हा एकदा तेच आश्वासन दिले. त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे व गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाजकार्याच्या नावाखाली 'पांढरा करण्याचा एक धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरू आहे. सदर फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील श्री. नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे, पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडून तक्रारीची साधी दखल घेतली गेली नाही. धर्मादाय आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ते माहितीच्या अधिकारातही याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत असे दिसते.

महाराष्ट्राला सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. अनेक समाजसेवकांनी प्रसंगी पदरमोड करून संस्थात्मक कार्य केले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. या फाउंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोटधवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अनेक गरजूंना रोख स्वरूपातदेखील मदत करते. मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यासाठी भव्य मंडप, देखावे, रोषणाई, कलाकारांचे संच ज्यांचा मेहनताना कोट्यवधीचा आहे. त्यांना बिदागीच्या रकमा कोणत्या माध्यमातून दिल्या गेल्या? त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी प्रकाश टाकायलाच हवा.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वैद्यकीय उपक्रम घेते. वैद्यकय मोफत उपचार करते असे सांगितले गेले. ते उपक्रम नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत, पण याबाबत ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय? ते तपासणे गरजेचे आहे. ज्यांनी देणग्या दिल्या ते मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत काय?

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे संबंध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असल्याने त्याबाबतचे सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे होते. या फाऊंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? फाऊंडेशनचे आतापर्यंतचे सर्व हिशेबे धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहेत काय? याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे व त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान ५०० कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे इर्शाळवाडी येथील प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे. तसेच या संकटामुळे अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारली आहे. सदर बाब ही माणुसकी धरूनच आहे, परंतु अशा कार्यासाठी खूप मोठा निधी लागतो. सदर निधी ज्या देणगीदारांकडून प्राप्त झाला असेल त्यांचा योग्य सन्मान आणि त्यांच्या दातृत्वाची पुरेशी प्रसिद्धी होणे उचित ठरेल, परंतु सदर उपक्रम हाती घेताना शासकीय निधीचा वापर करून जर कोणी राजकीय व्यक्ती त्याचे श्रेय घेत असेल तर ते नुसते अनैतिक नसून गुन्हेगारी स्वरूपाचेदेखील आहे. यास मराठीमध्ये मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाणे असे म्हणतात.

नागरिकांना गणपतीच्या सणासाठी गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात त्यांच्या गाड्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनला उपलब्ध करून दिल्याचे वर्तमानपत्रातून समजले. सदर गाडधांचे पैसे प्राप्त झाले आहेत किंवा नाही याची माहिती करदात्या नागरिकांस होणे आवश्यक आहे. कारण जर पैसे प्राप्त झाले नसतील तर हा शासकीय निधीचा गैरवापर असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. जर निधी प्राप्त झाला असेल तर श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून निधीच्या देणगीदारांची नावे प्रसिद्ध होणे किंवा नागरिकांना सदर बाब समजणे आवश्यक आहे. देणगीदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला कोणत्या कारणासाठी पैसे देतात की धार्मिक बाब म्हणून कोट्यवधी रुपयांची दक्षिणा देतात, याचा खुलासा आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT