solapur
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्राच्या समृद्ध शाहिरी परंपरेचा गौरव करणाऱ्या ‘शाहिरी महोत्सवा’स सोमवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात प्रारंभ झाला. मात्र, पुरेशा प्रसिद्धीअभावी प्रेक्षकांनी या महोत्सवाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. सभागृहात अवघे ६० ते ७० प्रेक्षक उपस्थित असल्याने शाहिरांनीही खंत व्यक्त केली. त्यांना सभागृहातील रिकाम्या खुर्च्यांनाच मुजरा करावा लागला.
महोत्सवाची सुरवात दीपप्रज्वलन व वाद्यपूजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर शाहीर विश्वास फाटे यांचे चिरंजीव चंद्रकांत फाटे, कवीराय रामजोशी यांचे वंशज अनंत जोशी, नगरसेवक सात्त्विक बडवे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सदाशिव खैरे, संयोजक अमोल धाबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अमोल धाबळे यांनी प्रास्ताविकात लवकरच नाट्यछटा महोत्सवाचे आयोजन होणार असल्याचे सांगितले.
यावेळी जळगाव येथील शाहीर वेदराज कपाटे, अशोक पाटील, उमेश पाटील, जितेंद्र भांडारकर, उमेश भांडारकर, शिवाजी धर्मा पाटील, योगेंद्र राऊळ, भूषण पवार आणि बाळकृष्ण पाटील यांनी आपली शाहिरी कला सादर केली. सोलापूरसारख्या शाहिरी परंपरा लाभलेल्या जिल्ह्यात एवढेच दर्दी उपस्थित असल्याबद्दल शाहिरांनी खंत व्यक्त केली. निवडक पोवाडे वगळता बहुतांश सादरीकरणे स्वरचित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नव्या महाराष्ट्राचा पोवाडा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील हिंदी पोवाडा सादर केला.
आज, उद्या दोन दिवस शाहिरी कार्यक्रम
या शाहिरी महोत्सवात मंगळवारी व बुधवारी दररोज सायंकाळी ७ वाजता शाहिरी कार्यक्रम सादर होणार आहेत. या महोत्सवातून महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी, सामाजिक प्रबोधनाशी आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेशी नाते सांगणाऱ्या शाहिरी कलेचा जागर मांडला जाणार आहे. मंगळवारी (ता. २८) शाहीर गणेश गलांडे व सहकारी, शाहिरा प्रा. संगीता हेमंतराजे मावळे व सहकारी तसेच शाहीर राजेंद्र कांबळे व सहकारी आपली कला सादर करणार आहेत.
ठळक बाबी
प्रवेशद्वारात बॅनर, रांगोळीसह सभागृहाची आकर्षक सजावट
शहरात केवळ जुळे सोलापुरात एकाच ठिकाणी बॅनर
सभागृहात अवघे ६० ते ७० प्रेक्षक उपस्थित
कार्यक्रमापूर्वी केवळ तीन ते चार दिवस प्रसिद्धी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.