सोलापूर : सोलापूर शहरातील तरूणांना ‘एमडी’ ड्रग्ज पुरवणारा मेहमूद शेख (वय ५१) याला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून सोलापुरात आणले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी जेलरोड पोलिसांत दाखल गुन्ह्यात मेहमूदलाच अटक केली होती. जेलरोडनंतर आता मेहमूदविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला मंगळवारी (ता. ४) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना पुना नाका परिसरातून एका तरूणाकडील ६.८० लाख रुपये किमतीचे ३४ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करून गुन्हे शाखेने त्यास २९ जुलैला अटक केली होती. रुपेश प्रदिप थडसरे (वय ३४, रा. मित्र नगर, शेळगी, सोलापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांना खबऱ्याकडून याबद्दल माहिती मिळाल्यावर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तत्रय माळी, पोलिस उपनिरीक्षक मनोज मोरे यांच्या नेतृत्वातील पथकाने रुपेश थडसरेला पकडले होते. त्यावेळी रेल्वेने एकजण ड्रग्ज देऊन गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी मेहमूद शेख याला मुंबईत पकडून सोलापुरात आणले आहे.
तत्पूर्वी, जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत २२ एप्रिलला गुन्हे शाखेच्या पथकाने सुफियान फुलारी व तौफिक सय्यद या दोघांना एमडी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यांच्याकडे ४६ ग्रॅम मेफेड्रोन सापडले होते. या गुन्ह्यात देखील मेहमूद शेख यालाच पोलिस उपनिरीक्षक मनोज मोरे यांच्या पथकाने मुंबईतून पकडून आणले होते. आता पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात देखील तोच पुरवठादार असल्याचे समोर आले आहे.
‘बीपी’ वाढल्याने रुग्णालयात ॲडमिट
एमडी ड्रग्ज घेऊन रेल्वेने येऊन मेहमूद शेख सोलापुरात आला आणि रुपेश थडसरे यास ड्रग्ज देऊन तो लगेचच निघून गेला होता. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय बनसुडे यांनी फौजदार चावडी पोलिसांत दाखल गुन्ह्याचा तपास केला. यात मेहमूद हाच ड्रग्ज पुरवठादार असल्याचे समोर आले. त्याला मुंबईतून सोलापुरात आणल्यावर त्याला न्यायालयात नेण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्याचा बीपी वाढल्याने त्याला रुग्णालयातच ॲडमिट करावे लागले आहे. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यावर त्याला न्यायालयात नेले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.