सोलापूर : स्मार्ट सिटीअंतर्गत सोलापूर शहरात एक हजार कोटींचा खर्च झाला, पण सोलापूरकरांची स्वच्छ व नियमित पाण्याची मूलभूत गरज अपूर्णच राहिली. २५ वर्षांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळित असून, नागरिकांना सध्या पाच-सहा दिवसांआड मिळते. शहरातील सव्वादोन लाख कुटुंबापैकी दोन लाख कुटुंबासमोर पाण्याचे तब्बल नऊ ते दहा लाख बॅरल दिसतात. तेच बॅरेल डेंगीचे डास उत्पत्तीचे मुख्य ठिकाण बनल्याने १२ महिने सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याची विदारक स्थिती सोलापूर शहरात आहे.
सोलापुरातील लोकप्रतिनिधींसह आजी-माजी नगरसेवक, नोकरदारांच्या घरात पाणी शुद्धीकरणाच्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. मोठमोठ्या अपार्टमेंट, बंगल्यातही पाणी साठवण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. मात्र, २२० झोपडपट्ट्यांमधील पाच लाख लोकांना मिळेल तेच पाणी प्यावे लागते. सार्वजनिक नळ बंद केल्याने पाच-सहा दिवसांआड मिळणारे पाणी ते लोक बॅरलमध्ये साठवतात.
अनेक निवडणुका झाल्या पण हातावरील पोट असलेल्यांच्या मुबलक, स्वच्छ पाणी, पुरेशी वीज आणि दोनवेळचे पोटभर जेवण, या माफक अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे दरवर्षी झोपडपट्ट्यांमधीलच लोक मलेरिया, डेंगी अशा आजारांचे पहिले बळी ठरतात, अशी विदारक स्थिती स्मार्ट सिटीत आहे. लोकांच्या घरासमोरील बॅरल भरून ठेवण्याची पद्धत नियमित पाणीपुरवठ्याशिवाय बंद होणार नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधी किती पाठपुरावा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डास होणार नाही, याची सर्वांनीच घ्यावी खबरदारी
सोलापूर शहरात पाणीपुरवठा विस्कळित असल्याने ८५ ते ९० टक्के लोक घरासमोर पाण्याचे बॅरल आढळतात. पाण्याची शाश्वती नसल्याने लोक कोरडा दिवस देखील पाळत नाहीत. त्यावर आता घंटागाडीद्वारे जनजागृती केली जाईल. नागरिकांनीही भांडी कोरडी करून ठेवावीत, जेणेकरून डेंगी, मलेरियाचे डास होणार नाहीत.
- डॉ. राखी माने, आरोग्याधिकारी, महापालिका, सोलापूर
शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती
एकूण कुटुंब
२.६७ लाख
घरासमोरील पाण्याचे बॅरल
७ ते ८ लाख
पाणीपुरवठा
५ ते ६ दिवसाआड
दरवर्षी आढळणारे डेंगीसदृश्य रुग्ण
५० पेक्षा जास्त
कसा तयार होतो डेंगीचा डास
स्वच्छ पाण्यात एक-दोन दिवसात डेंगी डासाचे अंडे तयार होते. तिसऱ्या दिवशी लारव्हा तर चौथ्या दिवशी प्युपा तयार होतो आणि सहा- सात दिवसांत त्यातून डास बाहेर पडतो. शहरातील १०० कुटुंबासमोरील किमान १० बॅरेलमध्ये अळ्या आढळतात ही १२ महिन्याची स्थिती आहे. बऱ्याचदा एसी, फ्रिज, कुलरमागील पाण्यातही अळ्या सापडतात. कोरडा दिवस पाळणे, पाणी झाकून ठेवणे, उघड्या स्वच्छ पाण्यात थोडे खोबरेलतेल टाकणे, असे उपाय आहेत. खोबरेल तेलामुळे डेंगीच्या अळ्या श्वास घ्यायला वरती येतात आणि त्या मरतात, असे जीवशास्त्रज्ञ स्वाती अनपट यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.