तात्या लांडगे
सोलापूर : इराक-इराण युद्धामुळे एलपीजी, सीएनजी मिळत नाही, भाव वाढले आहेत, गॅस भरायला तास्नतास रांगेत उभारावे लागते, अशी कारणे पुढे करीत रिक्षा चालकांनी तिकीट दर वाढविला आहे. त्यानुसार आता प्रवाशांना रिक्षातून प्रवास करताना छोट्या टप्प्यासाठी ५ ते १० रुपये आणि लांबच्या प्रवासासाठी १५ रुपये ज्यादा मोजावे लागत आहेत. सोलापूर शहरात ‘आरटीओ’कडील नोंदीनुसार १७ हजारापर्यंत रिक्षा आहेत, पण प्रत्यक्षात शहरातून ३० हजारांवर रिक्षा धावतात.
मंगळवेढा रोड, अक्कलकोट रोड, ७० फूट रोड या मार्गावर भाडेवाढ केली, पण त्याठिकाणी प्रवाशांची कोणतीही अडचण नसल्याचे रिक्षा चालक सांगतात. पण, होटगी रोड, विजयपूर रोड या मार्गावरील प्रवासी वाद घालत असल्याचेही चालकांनी सांगितले. रेल्वे स्टेशन ते स्टॅण्ड आणि स्टॅण्डपासून रेल्वे स्टेशनपर्यंत यायला आता प्रवाशांना ३० रुपये द्यावे लागत आहेत. १५ दिवसांपूर्वी हा दर १५ ते २० रुपये होता.
प्रवाशांना रिक्षा भाड्याने करायची असल्यास ३० ते ५० रुपये आता ज्यादा द्यावे लागत आहेत. अनेक प्रवाशांनी त्यांच्या तक्रारी शहर पोलिस, आरटीओ कार्यालयास कळविल्या आहेत. रविवारी (ता. १५) पोलिस भरतीची लेखी परीक्षा पार पडली. त्यावेळी उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडायला बहुतेक रिक्षा चालकांनी १५० ते १८० रुपये घेतल्याचेही सांगितले.
गॅसचे दर वाढल्याने आम्हीही काही भाडे वाढविले
सोलापूर शहर हद्दीतील एलपीजी, सीएनजी पंपांवर गॅस मिळतो, पण त्याठिकाणी रिक्षांसह अन्य वाहनांच्या रांगा आहेत. त्यामुळे दीड ते दोन तास तेथे थांबावे लागते. पंपांवर गॅसचे लिटरमागील भाव देखील सुमारे ३० रुपयांनी वाढले आहेत. इराक-इराण युद्धाचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे आम्ही पण प्रवाशांना परवडेल अशी भाडेवाढ केली आहे.
- अमोल डुरके, अध्यक्ष, रिपब्लिकन सेना रिक्षा चालक-मालक संघटना, सोलापूर
विजापूर रोडचे भाडे असे...
मार्ग भाडे
स्टॅण्ड ते सात रस्ता २५ रुपये
स्टॅण्ड ते कलेक्टर ऑफिस ३० रुपये
स्टॅण्ड ते आयटीआय ३५ रुपये
स्टॅण्ड ते रंगभवन २० रुपये
स्टॅण्ड ते सैफूल ४० रुपये
---------------------------------------------------------------
होटगी रोडचे भाडे असे...
मार्ग भाडे
स्टॅण्ड ते हत्तुरे वस्ती ५० रुपये
स्टॅण्ड ते मजरेवाडी ४० रुपये
स्टॅण्ड ते आसरा चौक ४० रुपये
स्टॅण्ड ते सात रस्ता २५ रुपये
स्टॅण्ड ते गांधी नगर ३० रुपये
रिक्षा चालकांचा असा मेसेज...
‘तमाम जुळे सोलापूरमधील रिक्षाचालकांना कळविण्यात येते की, गॅसचे वाढते दर वाढले आहेत. त्यामुळे शेअरींग रिक्षाचे दर वाढविण्यात आले आहेत. त्या दरपत्रकाप्रमाणे प्रवाशांकडून भाडे घ्यावे.’ असा मेसेज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकारी रिक्षा चालकांना पाठविला आहे. परंतु, चालू वर्षात कोणतीही भाडेवाढ झाली नसल्याचे आरटीओ कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.