तात्या लांडगे
सोलापूर : वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीच्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांची हजेरी प्रत्येक तासाला घेऊन ती यादी ऑनलाइन अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे हजर शिक्षकांनी आवर्जुन हजेरी नोंदवावी असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने (डाएट) स्पष्ट केले होते. त्यासाठी परिपाठावेळी प्रत्येकजण हजर पाहीजे, असेही सांगण्यात आले होते. तरीपण, अनेकजण उशिराने आले. त्या शिक्षकांनी दवाखान्यात गेलो होतो, ट्राफिकमध्ये अडकल्याने उशिर झाला, अशी अनेक कारणे देऊन हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची हजेरी लागली नाही.
शिक्षक म्हणून सेवेत रूजू झाल्यानंतर १२ वर्षे पूर्ण झालेले वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी तर २४ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक निवड वेतनश्रेणीसाठी पात्र ठरतात. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास दोन हजार शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन ‘डाएट’ने केले. पूर्वी ऑफलाइन प्रशिक्षण २१ दिवसांचे असायचे, त्यामुळे वेळ कमी होता. आता मात्र १२ दिवसांत प्रशिक्षण पूर्ण होणार असल्याने सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रशिक्षण सुरू आहे. ही वेळ कमी करावी, अशी देखील मागणी अनेकांनी केली. याशिवाय मी प्रशिक्षणास हजर होतो किंवा होते, पण हजेरीपत्रक माझ्यासमोरून कधी गेले कळालेच नाही, त्यामुळे गैरहजेरी लागल्याचेही काहींनी सांगितले. मी नेहमीच लवकर आलो, पण आज पहिल्या तासिकेला उशिर झाला असल्याने माझी हजेरी ग्राह्य धरावी अशी विनंती काहींनी केली. मात्र, सर्व काही ऑनलाइन असल्याने त्यात कोणताही बदल झाला नाही.
एकदा काही शिक्षकांची अडचण समजून पहिल्यांदा अपलोड केलेली हजेरी डिलिट करून पुन्हा यादी पाठविली, पण काहीही उपयोग झाला नाही, असाही अनुभव अधिकाऱ्यांना आला. त्यामुळे कोणतेही कारण ऐकून न घेता उशिरा आलेल्यांना प्रशिक्षणास बसू दिले गेले नाही. शिक्षकांचे वेतनश्रेणीचे प्रशिक्षण १२ जूनपर्यंत चालणार असून प्रत्येकाला वेळेतच हजर राहावे लागणार आहे.
गैरहजर शिक्षकांचे ऑगस्टमध्ये प्रशिक्षण
शिक्षकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेत त्यांची तालुक्याच्या ठिकाणीच प्रशिक्षणासाठी सोय केली आहे. प्रत्येक तासाला हजेरी ऑनलाइन अपलोड होणार आहे, प्रशिक्षणाचा वेळ काय राहील, अशा सर्व बाबींची पूर्वकल्पना आदेशातून सर्वांना दिली आहे. त्यामुळे त्यानुसार प्रशिक्षण व्यवस्थित सुरू असून ज्यांना काही कारणास्तव प्रशिक्षणास यायला विलंब झाला किंवा गैरहजर राहिले त्यांचे प्रशिक्षण ऑगस्टमध्ये होईल.
- जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर
अर्ज भरताना भरमसाठ चुका
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी अर्ज भरताना काहींनी प्राथमिकमध्ये शिक्षक असताना माध्यमिकमध्ये असल्याचा पर्याय निवडला. काहीजण वरिष्ठसाठी पात्र असताना त्यांनी निवडश्रेणीसाठी अर्ज केला. तर काहींनी कला व क्रीडाऐवजी दुसराच पर्याय निवडला. त्यांची माहिती दुरूस्त करून अचूक करून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला पाठविण्यात आली आहे.
शिक्षक संघटनांकडून निषेध
वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी काही मिनिटे उशीर झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षणास अनुपस्थित म्हणून नोंदवले जात आहे. पहिल्या दिवशी गावावरून, परराज्यातून धावपळ करत प्रशिक्षणासाठी येताना पाच मिनिटे उशीर झालेल्यांनाही प्रशिक्षणासाठी बसू दिले नाही. दुसरीकडे प्रशिक्षणास वेळेवर उपस्थित राहूनही गर्दीमुळे वेळेत सही न करता आल्याने देखील अनेकांची अनुपस्थिती लागली आहे. एका शिक्षकाची प्रशिक्षणावेळी प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये जावे लागले, त्यांनी दुसऱ्या दिवशी हजर राहण्याची केलेली विनंती नाकारण्यात आली. शेकडो शिक्षकांना अशा कारणांमुळे प्रशिक्षणास मुकावे लागले. अशा बाबी निंदनीय असून शिक्षकांवर अविश्वास दाखवणाऱ्या आहेत. ‘शिक्षक शिस्तप्रिय असतातच, पण त्यांच्यावर अशी संशयाची नजर आणि त्यांच्यावर अमानवी धोरणे लादल्याने शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत मूल्यांना धोका निर्माण झाल्याचे काही शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.