सोलापूर : तीन दिवसांपासून जिल्हाभर ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी धास्तावला आहे. अगोदरच पावसाळ्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने हजारो शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झाला आहे. त्यात आता अवकाळी पडल्यास आणखी नुकसान होईल, अशी शेतकऱ्यांना चिंता आहे. दुसरीकडे सोलापूर बाजार समितीतील सरासरी भाव देखील २०० ते ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. मंगळवारी (ता. ३) सोलापूर बाजार समितीत ४४३ गाड्या कांदा आला होता. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सरासरी भाव २६०० रुपयांपर्यंत मिळाला.
सोलापूर जिल्ह्यातील ३५ ते ४० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली. पण जून ते ऑक्टोबर या काळात सतत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक नाही, तरीदेखील भावात अपेक्षित सुधारणा दिसत नाही. निर्यात चालू असताना व परदेशात मागणी वाढत असताना देखील कांद्याचा सरासरी भाव २५०० रुपये ते २८०० रुपयांपर्यंतच आहे. दोन दिवसांपूर्वी सरासरी भाव २८०० रुपयांपर्यंत होता. पण मंगळवारी तो भाव २६०० रुपयांपर्यंत आला. आवक कमी असताना देखील समाधानकारक दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी बंगळूर बाजारात जात असल्याची वस्तुस्थिती आहे. पुढील आठ दिवसांत भाव वाढतील, असा विश्वास सोलापूर बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारची बाजार समितीतील स्थिती
एकूण गाड्या आवक
४४३
क्विंटलमध्ये आवक
४४,३४३
सरासरी भाव
२६०० रुपये
मंगळवारची एकूण उलाढाल
११.५३ कोटी
बंगळूरच्या बाजारातही चांगला दर
बार्शी, उत्तर सोलापूर, माळशिरस, मंगळवेढा अशा तालुक्यांमधील अनेक शेतकरी दररोज बंगळूरच्या बाजारात कांदा विकायला घेऊन जात आहेत. त्यासाठी प्रतिटन जवळपास २८ हजार रुपयांचे भाडे मोजावे लागत आहे. भाडे अधिक असले तरी प्रतिक्विंटल सहा ते साडेसहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे अनुभव शेतकरी सांगत आहेत. आवक कमी असल्याने भाव आणखी वाढतील या आशेने शेतकरी बंगळूरला कांदा घेऊन जाण्याचे प्रमाण वाढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.