solapur chincholi midc
solapur
सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोळी एमआयडीसीतील बंद उद्योगाच्या गोडावूनमध्ये टॅंगोपंच व भिंगरी ब्रॅंडचे बनावट उत्पादन सुरू होते. पोखरापूर येथील बापू भोसले आणि बार्शीचा रमाकांत उर्फ सतीश कदम या दोघांच्या भागीदारीत ही अवैध फॅक्टरी सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे.
चिंचोळी (ता. मोहोळ, सोलापूर) एमआयडीसीत ८०० हून अधिक उद्योग असून त्यातील सव्वाशेहून अधिक उद्योग सध्या बंद आहेत. २०१८ आणि २०२४ या वर्षात याच एमआयडीसी एमडी ड्रग्जचा मोठा साठा सापडला होता. त्यांनतर आता बंद पडलेल्या उद्योगाच्या गोडावूनमध्ये देशी दारू निर्मितीचा अवैध कारखाना आढळला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने आठ दिवस पाळत ठेवून बनावट फॅक्टरीचा पर्दाफाश केला. यात बापू भोसलेकडे बनावट दारूसाठी ग्राहक शोधायची तर फॅक्टरी सांभाळायची जबाबदारी रमाकांतकडे होती. चिंचोळी एमआयडीसी मोठी असल्याने तेथे सतत कामगार, वाहने ये-जा करतात. त्यामुळे कोणाला संशय येणार नाही म्हणून त्यांनी बनावट दारू फॅक्टरीसाठी ही बंद पडलेल्या उद्योगाची जागा हस्तांतर करून घेतली होती. एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यातील चौघे फरार आहेत. त्यात बापू भोसले व रमाकांत उर्फ सतीश कदम या दोघांचाही समावेश आहे.
‘एमआयडीसी’ अधिकाऱ्यांचे म्हणणे...
अवैध दारूची फॅक्टरी ज्या जागेत आढळली, तेथे पूर्वी मिल्क प्रॉडक्टचा व्यवसाय सुरू होता. एप्रिलमध्ये त्या बंद उद्योगाचे वॉटर कनेक्शन बंद करण्यात आले होते. जून महिन्यात ही जागा रमाकांत कदम याच्या नावे ट्रान्स्फर झाली होती. त्यावेळी त्यांनी पुन्हा वॉटर कनेक्शन घेतले होते. होम नेट (घरगुती जाळी) बनविण्याचा उद्योग सुरू करण्यासाठी ती जागा ट्रान्स्फर केली होती. पण, गोडावून बाहेरून बंद आणि आत अवैध दारू निर्मिती सुरू, अशी स्थिती होती. जागा मालकासंबंधीची कागदपत्रे राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिली आहेत, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांनी स्वत:हून द्यावी माहिती
आपल्या परिसरात कोठेही अवैध दारू निर्मिती, विक्री, साठा आढळल्यास नागरिकांनी थेट १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क करावा, किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. लोकांनी दिलेल्या माहितीवरून निश्चितपणे जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक थांबू शकते.
- भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर