आरोह आणि क्षितिज हे दोघेही जिवाभावाचे मित्र आहेत. त्या दोघांची पहिली भेट तेरा वर्षांपूर्वी पुण्यातील ग्रीप्स थिएटरमध्ये झाली.
- आरोह वेलणकर, क्षितिज दाते
आरोह वेलणकरने ‘रेगे’ या चित्रपटाद्वारे मराठीच्या रुपेरी पडद्यावर पाऊल टाकले आणि ते यशस्वी ठरले. आता तो लेखक आणि निर्माते रमेश दिघे, तसेच दिग्दर्शक विवेक दुबे यांच्या ‘फनरल’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारीत आहे. क्षितिज दिघेने ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, तसेच ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटांमध्ये काम आहे.
आरोह आणि क्षितिज हे दोघेही जिवाभावाचे मित्र आहेत. त्या दोघांची पहिली भेट तेरा वर्षांपूर्वी पुण्यातील ग्रीप्स थिएटरमध्ये झाली. ते दोघेही कॉलेजमध्ये असताना प्रायोगिक नाटक करायचे आणि तेव्हापासून आजवर त्यांच्या मैत्रीचा हा प्रवास सुरू आहे. क्षितिज उत्तम अभिनेता आहेच, त्याचबरोबर लेखक आणि दिग्दर्शकही आहे. प्रायोगिक नाटक आणि ग्रीप्स थिएटर या दोन्ही गोष्टींचा त्यांच्या मैत्रीमध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांची मैत्री तेथूनच सुरू झाली. आरोह म्हणाला, ‘क्षितिजला पहिल्यांदा भेटल्यावर समजले, की हा एक उत्तम कलाकार आणि मेहनती मुलगा आहे. आम्ही दोघेही एकमेकांसोबत कधीही काहीही बोलू शकतो. आम्हाला एकमेकांच्या अनेक गोष्टी न सांगताच समजतात. क्षितिजच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल आरोह म्हणाला, क्षितिज अतिशय गोड माणूस आहे आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट कलाकार लपलेला आहे. यासह तो खूप सरळ आणि साधा आहे. त्याला मिळालेल्या कोणत्याही गोष्टीचा त्याच्यामध्ये गर्व नाही. आम्ही एकमेकांना नेहमीच मार्गदर्शन करत असतो. एकाच वेळी अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन या तिन्ही गोष्टी तो उत्तमरीत्या करतो आणि त्याच्यामधील हाच गुण मला आत्मसात करावासा वाटतो. आम्ही दोघेही आमच्या कामाच्या बाबतीत अतिशय एकनिष्ठ आहोत, ही गोष्ट आमच्या दोघांमध्ये सारखी आहे. अनेक वर्षांची मैत्री असल्याने आम्ही एकमेकांची सगळी कामे पाहिली आहेत. मात्र, क्षितिजचं ‘प्राणीमात्र’ या एकांकिकेतील काम मला सर्वांत जास्त आवडले. क्षितिजला कोणतीही भूमिका द्या, तो उत्तमरीत्या सादर करतो.
कामाच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक आणि कामावर त्याची प्रचंड निष्ठा आहे. आता येणाऱ्या ‘फनरल’ या चित्रपटात मी हिरा नावाची भूमिका साकारली आहे. माझ्यासाठी ही भूमिका अतिशय आयकॉनिक आहे. तो नावाप्रमाणेच स्क्रीप्टचा हिरा आहे. तो आणि त्याचे मित्र एक फ्युनेरल मॅनेजमेंट कंपनी सुरू करतात. यानंतर त्यांच्या आयुष्यात काय चढ-उतार येतात, हे या चित्रपटात दाखवले आहे. कोणतेही काम छोटे नसते, फक्त आयुष्यात मेहनत करण्याची ठरवल्यास तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळू शकते. कोणत्याही कामाकडे पाहताना तुमचा आध्यात्मिक दृष्टिकोन असला पाहिजे, हे मी हिरा या भूमिकेतून शिकलो आहे.’
क्षितिजने सांगितले, ‘आरोह अतिशय उत्तम कलाकार आहेच, त्याचबरोबर तो अतिशय चांगला माणूसदेखील आहे. मी त्याला पहिल्यांदा स्टेजवर अभिनय करताना पाहिले आणि तेव्हापासून मी त्याच्या अभिनयाचा चाहता झालो. त्यानंतर आमच्यामध्ये खूप घट्ट मैत्री झाली. आम्ही एकमेकांचे जिवलग मित्र आहोत. आरोह जितका चांगला माणूस आहे, तसाच तो उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याचे आपल्या कामावर अतिशय प्रेम आहे. त्याची कामाबाबत असलेली निष्ठा मला फार आवडते.
आम्ही एकमेकांमधील कोणताही गुण आत्मसात केला नाहीस तरीदेखील आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत आणि यापुढे देखील राहू. त्याचा स्वभाव, त्याच्यातील चांगुलपणा, लोकांसोबत नम्रपणे वागणे या सगळ्या गोष्टींचे मला नेहमीच कुतूहल वाटते. आम्ही दोघेही दररोज एकमेकांसोबत बोललो नाही, तरी देखील आमच्यामधील बॉण्डिंग आणि आपुलकी तशीच टिकून असते. काम आणि कला या दोन्ही गोष्टी आमच्या अतिशय जवळच्या आहेत. आरोहने ‘रेगे’ चित्रपटात केलेले काम मला अतिशय आवडते. अनेक आव्हानं असताना देखील त्याने ही भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारली आहे. आरोहचा ‘फनरल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि तो चित्रपट पाहण्यास मी उत्सुक आहे.’
(शब्दांकन - जान्हवी वंजारे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.