Bambai Meri Jaan sakal
मनोरंजन

Bambai Meri Jaan : रक्तरंजित इतिहासाची कहाणी

चित्रपटकर्त्यांप्रमाणेच प्रेक्षकांनाही गुन्हेगारी जगतातील कथानकांचं आकर्षण असल्याचं बरेचदा दिसून आलेलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

- युवराज माने

चित्रपटकर्त्यांप्रमाणेच प्रेक्षकांनाही गुन्हेगारी जगतातील कथानकांचं आकर्षण असल्याचं बरेचदा दिसून आलेलं आहे. खासकरून मुंबई अंडरवर्ल्ड संबंधित कथानकांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालेलं आहे. ‘बंबई मेरी जान’ या अॅमॅझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या वेबसिरीजमधून मुंबईवर आपलं साम्राज्य स्थापित करू पाहणाऱ्या अशाच एका माफियाची कथा सांगण्यात आली आहे.

साठच्या दशकात सुरू होणाऱ्या या कथेत इस्माईल कादरी (के. के. मेनन) हा एक इमानदार पोलिस अधिकारी आहे. आपल्या सहकाऱ्यांबरोबर सुलेमान मकबूल उर्फ हाजी (सौरभ सचदेवा) आणि पठाण (नवाब शाह) या माफियांच्या जोडगोळीला इस्माईल आव्हान देतो. त्याच्या धाडसामुळे त्याला हाजी आणि पठाणचे काळे धंदे संपवण्यासाठी बनवण्यात आलेल्या ‘पठाण स्क्वाड’चं नेतृत्व करण्याची संधी मिळते.

परंतु इस्माईलची बायको सकिनाच्या (निवेदिता भट्टाचार्य) एका हट्टामुळे त्याच्या नोकरीवर गदा येते. आधीच टपून बसलेला हाजी इस्माईलच्या परिस्थितीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतो. हतबल इस्माईलला हाजीबरोबर नाईलाजाने तडजोड करावी लागते.

दुसरीकडे लहानपणापासूनच बंडखोर वृत्तीचा असणारा इस्माईलचा मुलगा दारा कादरी (अविनाश तिवारी) हळूहळू आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात करतो. हाजी दाराला गॅंगमध्ये सामावून घेतो. पण ही गोष्ट पठाणला रुचत नाही.

त्यात मलिक (शिव पंडित) हा पोलिस अधिकारी हाजीला संपवण्याच्या आशेने दाराला पाठीशी घालतो. लवकरच दारा आपला भाऊ सादिक (जितीन गुलाटी) आणि बहीण हबिबा (कृतिका कामरा) यांना सोबत घेऊन हाजी आणि पठाणसमोर मोठं आव्हान उभं करतो. यानंतर त्यांच्यामध्ये जो जीवघेणा संघर्ष होतो त्याची कथा १० भागांमध्ये प्रेक्षकांसमोर येते.

हुसैन जैदी यांच्या ‘डोंगरी टू दुबई’ या पुस्तकावर आधारित सिरीजची पटकथा हेनरी स्विंडल यांनी समीर अरोरासमवेत लिहिली आहे, तर संवाद अब्बास आणि हुसैन दलाल यांनी लिहिले आहेत. दिग्दर्शन शूजात सौदागर यांचं आहे. कथा काही ठिकाणी रेंगाळणारी वाटत असली, तरी त्याचा उद्देश काही वेळाने प्रेक्षकांना लक्षात येतो.

उदाहरणार्थ, इस्माईलच्या मेहुण्याचा कथाभाग सुरुवातीला ताणल्यासारखा वाटत असला तरी पटकथेतील एका महत्वाच्या कलाटणीदरम्यान त्याचं महत्व अधोरेखित होतं. साठच्या आणि ऐंशीच्या दशकातील ‘बंबई’ दाखवताना प्रॉडक्शन डिझायनर नितीन गायकवाड आणि जॉन श्मिट यांचे छायाचित्रण एकत्रितरीत्या प्रभावी कामगिरी करतात.

के. के. मेनन यांचा हतबल इस्माईल असो किंवा बेछूट महत्त्वाकांक्षा असणारा अविनाश तिवारीचा दारा कादरी असो- सर्वच अभिनेते त्या त्या व्यक्तिरेखेत शोभतात. निवेदिता भट्टाचार्यची सकिना लक्षात राहतेच; पण कृतिका कामराची हबिबा या सर्वांवर कडी करते. एकूणच अभिनयाच्या आघाडीवर सिरीज उत्तम कामगिरी करते.

निर्मात्यांनी नाकारलं असलं, तरी ‘बंबई मेरी जान’ कुख्यात दाऊद इब्राहीमच्या गुन्हेगारी प्रवासावर आधारित आहे हे उघड गुपित आहे. शिवराळ भाषा आणि अंगावर येणारी व अस्वस्थ करणारी हिंसक दृश्ये असल्याने एका बैठकीत ही सिरीज पाहणे प्रेक्षकांसाठी एक मोठे आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

SCROLL FOR NEXT