mast mein rehne ka movie
mast mein rehne ka movie sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : मस्त में रहने का... : एकाकी आयुष्यावरचा ‘हसरा’ तोडगा

महेश बर्दापूरकर

मुंबईसारख्या महानगरात एकाकी आयुष्य जगणाऱ्या वृद्धांच्या समस्या अनंत आहेत. मुलं सोडून गेल्यानंतर किंवा त्यांच्याशी बिनसल्यानंतर वाट्याला आलेलं आयुष्य मरणप्राय बनतं आणि अशा वेळी जोडीदाराची, समजून घेणाऱ्याची गरज लागतेच. मुंबईतच पोटापाण्याच्या सोयीसाठी आलेल्या, त्यासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

दिग्दर्शक विजय मौर्य यांनी अशा दोन समांतर कथा एकत्र बांधत ‘मस्त में रहने का’ या चित्रपटातून अत्यंत नेमका व भावुक संदेश हसत-खेळत, विनोदी प्रसंगांच्या माध्यमातून पोचवला आहे. जॅकी श्रॉफ व नीना गुप्ता या दिग्गज कलाकारांचा जबरदस्त अभिनय, त्यांना नव्या कलाकारांची साथ, सुश्राव्य संगीत व मुंबईचं नेमकं चित्रण यांच्या जोरावर ॲमेझॉन प्राइमवरील हा चित्रपट सुखद अनुभव देतो.

‘मस्त में रहने का’ची कथा मुंबईतील एका मध्यमवर्गीय भागात राहणाऱ्या व्ही. एस. कामत (जॅकी श्रॉफ) या एकल वृद्धाची दिनचर्या सांगत सुरू होते. पत्नीच्या निधनानंतर एकाकी पडलेले कामत स्वतःच्याच कोषात जगत आहेत. कोणाशी न बोलता, मन मारून जगताना त्यांना आयुष्य नकोसं झालं आहे. कॅनडामध्ये आपल्या मुलाकडं राहणारी प्रकाशकौर हांडा (नीना गुप्ता) पतीच्या निधनानंतर त्याच परिसरातील आपल्या घरात राहायला आली आहे.

नन्हे (अभिषेक चौहान) हा तरुण टेलरिंगचं काम करून मुंबईत जम बसवण्यासाठी धडपडतो आहे. सना (राखी सावंत) ही नृत्य दिग्दर्शिका त्याला कपडे शिवण्याची काही कामं मिळवून देते, मात्र नन्हेवरचं कर्ज वाढतच चाललं आहे.

सिग्नलवर भीक मागणाऱ्या राणीशी (मोनिका पवार) त्याची ओळख होते व दोघं मिळून या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा विचार करू लागतात. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी नन्हे एकट्या राहणाऱ्या वृद्धांचा घरात चोऱ्या करीत असतो.

या प्रयत्नांत तो कामतच्या घरी चोरीसाठी येतो आणि कथा मोठं वळण घेते. ‘शेजाऱ्याशी संबंध वाढवा, त्यांच्याशी बोलत राहा,’ हा पोलिसांचा सल्ला मानत कामत लोकांशी ओळखी वाढवू लागतात आणि त्याच प्रयत्नांत त्यांची प्रकाशकौरशी मैत्री होते आणि कामत-प्रकाशकौर आणि नन्हे-राणीच्या कथा एकमेकांना छेदतात...

एकटं राहण्याचं दुःख आणि गरिबीतून बाहेर पडण्याची धडपड या मोठ्या शहरांतील दोन समस्यांना एकत्र आणत दिग्दर्शकानं सांगितलेली गोष्ट मनोरंजक आहे. तिला मध्यमवर्गीयांच्या समस्यांबरोबरच गरिबीच्या चटक्यांची जोड मिळाल्यानं कथा सर्वसमावेशक झाली आहे.

माणसांत मिसळू लागल्यावर, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊ लागल्यावर आपल्या समस्या कमी वाटू लागतात हा संदेश मध्यमवर्गीयांना देतानाच, प्रामाणिकपणे कष्ट केल्यास संघर्ष कधीतरी संपतोच हा संदेश गरिबीतून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना दिला जातो. हे सर्व छोटे व विनोदी प्रसंग, हलके-फुलके संवाद यांच्या माध्यमातून दिल्यानं कथा उगाच डोस पाजल्यासारखी वाटत नाही. शेवट अपेक्षित असला, तरी तो योग्य संदेश देण्यात यशस्वी ठरतो.

जॅकी श्रॉफला कोणतंही ग्लॅमर नसलेल्या मध्यमवर्गीय वृद्धाच्या भूमिकेत पाहताना धमाल येते. त्यानं देहबोली, निवृत्त माणसाची चालण्याची लकब, मराठी व हिंदी मिश्रित लहेजा यांचा छान वापर करीत कामत जिवंत केला आहे. हळव्या प्रसंगांतील त्याचा अभिनय दमदार आहे. नीना गुप्ता यांचा अशा प्रकारच्या भूमिका साकारण्यात हातखंडा आहे.

पंजाबी भाषेतील बिनधास्तपणा आणि त्याचवेळी आपलं दुःख लपवत हसणारी प्रकाशकौर त्यांनी ताकदीनं उभी केली आहे. मोनिका पवारला ‘जामतारा’ या वेब सिरीजच्या दोन सीझनमध्ये अभिनयाचे विविध पैलू साकारताना आपण पाहिलं आहे. इथंही तिनं आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. अभिषेक चौहाननं तिला चांगली साथ दिली आहे. संगीत उत्तम असलं, तरी निर्मितीमूल्यांच्या बाबतीत चित्रपट कमी पडतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT