सूर हरवलेला बॅंड (रॉक ऑन 2)
सूर हरवलेला बॅंड (रॉक ऑन 2)  
मनोरंजन

सूर हरवलेला बॅंड (रॉक ऑन 2)

महेश बर्दापूरकर

"रॉक ऑन' हा आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित चित्रपट त्यातील वेगळं कथानक, संगीत आणि अभिनय यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आठ वर्षांनंतर आलेला या चित्रपटाचा सिक्वेल "रॉक ऑन 2' पहिल्या दोन आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्यानं निराशा करतो. कथेचा दुसरा भाग मांडताना ओढून ताणून केलेली कसरत, पटकथेची विस्कळित मांडणी, आत्मा हरवलेलं संगीत यांमुळं चित्रपट शेवटपर्यंत पकड घेत नाही.

फरहान अख्तर आणि अर्जुन रामपाल यांचा अभिनय चित्रपटाला वाचवू शकलेला नाही.
"रॉक ऑन 2'चं कथानक सुरू होतं मेघालयात. आदि (फरहान अख्तर), जो (अर्जुन रामपाल) केदार (पूरब कोहली) हे गेल्या भागातील तिघं मित्र आणि मॅजिक या बॅंडचे सदस्य आता वेगळे झाले आहेत. आदि मेघालयात शेतकऱ्यांसाठी काम करतो आहे, तर जो आणि केदार मुंबईतच संगीताच्याच माध्यमातून पैसा कमावण्याच्या प्रयत्नात आहेत. हा बॅंड चर्चेत असतानाच पाच वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडलेली असते आणि त्यामुळंच या तिघांना वेगळं व्हावं लागतं. या घटनेचा मोठा मानसिक धक्का आदिला बसलेला असतो व त्यातून सावरण्यासाठीच त्यानं मेघालयात स्थायिक होण्याचा निर्णय घेतलेला असतो. तिथं तो गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळाही चालवत असतो.

या दरम्यान मुंबईमध्ये केदारची ओळख जियाशी (श्रद्धा कपूर) होते. अपघातानंच ती आदिला मेघालयातही भेटते. एका संकटात सापडलेला आदि मुंबईमध्ये परततो. पुन्हा संगीतात रमू पाहतो. जिया त्याला पुन्हा एकदा भेटते आणि पाच वर्षांपूर्वी झालेल्या दुर्दैवी घटनेच्या जखमा पुन्हा उघड्या होतात. या घटनेचं प्रायश्‍चित्त घेण्यासाठी आदि एक योजना आखतो. काय असतं ती घटना, जिया नक्की कोण असते, आदिची योजना सफल होते का, या प्रश्‍नांची उत्तरं चित्रपटाच्या संगीतमय शेवटामध्ये मिळतात.


चित्रपटाच्या कथेमध्ये नावीन्य नाही आणि त्यात धक्का तंत्राचाही अभाव आहे. मॅजिक बॅंडचे सदस्य वेगळे होण्यामागचं कारण सांगण्यासाठी खूप वेळ घेतला आहे आणि ते कारणही पटत नाही. आदि थेट मेघालयात जाऊन प्रायश्‍चित्त घेतो, हेही पटत नाही. जिया कोण असणार, याचा अंदाज प्रेक्षकांना आधीच येतो. चित्रपटाच्या पहिल्या भागाचं वैशिष्ट्य असलेली संगीताचा पार्श्‍वभूमी कथेत अगदी शेवटी येते. ती आणण्यासाठी दिग्दर्शक सुजित सौदागर यांना खूप तडजोडी कराव्या लागल्या आहेत. शेवट घडवून आणण्यासाठी निवडलेले प्रसंगही अगदीच बाळबोध आहेत. सर्वाधिक निराशा होते ती संगीताच्या आघाडीवर. शंकर-एहसान-लॉय यांना कथेच्या ओघात फारशी संधीच मिळालेली नाही. पहिल्या भागातील गाण्यांच्या फ्लॅशबॅकमध्येच प्रेक्षकांना समाधान मानावे लागते. या त्रुटीचा फटका पूर्ण चित्रपटाला बसला आहे. मेघालयातील चित्रण ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.


फरहान अख्तरनं आदिची भूमिका जीव ओतून केली आहे. आयुष्यातील चढउतारांमुळं खचलेला रॉकस्टार त्यानं छान उभा केला आहे. अर्जुन रामपालनं रागीट जोची व्यक्तिरेखा मागील भागाप्रमाणंच झोकात साकारली आहे. श्रद्धा कपूरला मात्र भूमिकेचा सूर सापडलेला नाही. पूरब कोहली, प्राची देसाई यांना फारशी संधी नाही.


एकंदरीतच, संगीत हाच आत्मा असलेल्या या चित्रपटाची तीच बाजू लंगडी पडल्यानं हा बॅंड सूर हरवून बसला आहे.



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT