आपण ज्या कलाकाराचं काम आधी पाहिलं आहे त्याच्याबरोबर संधी मिळणं आणि त्यानिमित्ताने मैत्री होणं खूप खास असतं. मृणाल कुलकर्णी आणि संग्राम समेळ यांच्यात असंच झालं.
- संग्राम समेळ, मृणाल कुलकर्णी
आपण ज्या कलाकाराचं काम आधी पाहिलं आहे त्याच्याबरोबर संधी मिळणं आणि त्यानिमित्ताने मैत्री होणं खूप खास असतं. मृणाल कुलकर्णी आणि संग्राम समेळ यांच्यात असंच झालं. ‘साथ सोबत’ या चित्रपटात ती दोघं मुख्य भूमिका साकारणार आहेत.
मृणाल म्हणाली, ‘संग्राम मला मोठ्या भावासारखा आहे. त्याला भेटण्यापूर्वी मी त्याची काही कामं पाहिली होती. परंतु त्याच्याबरोबर कधीतरी स्क्रीन शेअर करेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. ‘साथ सोबत’ या चित्रपटाच्या निमित्ताने ती इच्छा पूर्ण झाली. चित्रपटात काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ असल्याने सुरुवातीला मला दडपण आलं होतं. परंतु संग्रामने खूप पटकन कम्फर्टेबल केलं. तो स्वभावाने खूप छान, प्रेमळ, मनमोकळा आहे. तो सगळ्यांशी समान वागतो. कोणात भेदभाव करत नाही. त्याला गप्पा मारायला ओळखीची गरज लागत नाही. समोरची व्यक्ती लहान असो वा मोठी, ओळखीची असो किंवा अनोळखी; त्याला प्रत्येकाशी खूप छान संवाद साधता येतो. त्याच्याकडून कायम सकारात्मक ऊर्जा मिळते. कोणाला मदतीची गरज असल्यास तो कायम पुढे असतो. मलाही कधी एखादा सीन कठीण जात, त्यावेळी तो बारकावे समजावून सांगायचा, काही सल्ले द्यायचा. तो उत्कृष्ट सहकलाकार आहे असंच मी म्हणेन.’’
संग्रामने सांगितलं, ‘‘मी पहिल्यांदा मृणालला भेटल्यावर खूप शांत वाटली. मात्र ती अत्यंत दिलखुलास आहे. समोरच्या व्यक्तीशी नीट ओळख होईपर्यंत ती शांतच असते. ओळख झाल्यावर भरपूर गप्पा आणि चेष्टामस्करी सुरू होते. ती वयाने माझ्यापेक्षा लहान असल्याने मला धाकट्या बहिणीसारखीच आहे. सेटवरही मला ‘संग्राम दादा’ अशीच हाक मारायची. तिला नवनवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास आहे. ‘साथ सोबत’मधील तिची भूमिका खूप आव्हानात्मक होती. तिला त्यात कधी कठीण वाटत होतं. परंतु मृणालने जिद्द सोडली नाही. ती प्रयत्न करत राहिली, आम्हा सर्वांकडून शिकत राहिली आणि उत्तम काम केलं. शूटिंग दरम्यान आमच्यात छान बॉण्डिंग झालं. सेटवर दोन सीन्समध्ये आमची खूप मजा-मस्ती चालायची. गप्पा मारणं, खोड्या काढणं हे आमचं कायम सुरू असायचं. या चित्रपटाचं चित्रीकरण कोकणात झाल्यामुळे एक वेगळाच उत्साह असायचा.’’
‘साथ सोबत’या चित्रपटाबद्दल संग्राम म्हणाला, ‘‘चित्रपटात मी डॉक्टरची भूमिका साकारतोय. ही अत्यंत साधी सरळ गोष्ट आहे आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाला ती आपली वाटेल अशी आहे. ‘आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती लांब राहत आहे आणि त्या प्रत्येकाला सोबतीची गरज आहे’, यावर हा चित्रपट भाष्य करतो. मी या चित्रपटात साकारत असलेल्या भूमिकेपेक्षा मी खऱ्या आयुष्यात बराच वेगळा असल्याने हे काम करताना मला खूप मजा आली.’’
तर मृणालने सांगितलं, ‘‘या चित्रपटात मी मधुरा ही व्यक्तिरेखा साकारतेय. गावात राहणारी अत्यंत साधी-सरळ, शांत आणि गावातल्या सर्वांची लाडकी मुलगी आहे. मुख्य म्हणजे तिचं तिच्या बाबांबरोबर एक खास नातं आहे. खऱ्या आयुष्यात मीही माझ्या बाबांच्या खूप जवळ असल्याने भूमिकेला रिलेट करू शकले. अनेक दिग्गजांबरोबर मला या चित्रपटामुळे काम करता आलं आणि हा अनुभव खूप शिकवून जाणारा होता.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.