Kishori Amonkar sakal
मनोरंजन

Kishori Amonkar : नवोदित गायकांनी किशोरीताईंकडून शिकावं असा हा किस्सा

सन १९८० मधील गानसरस्वती किशोरीताईंची मुंबई येथील मैफल ऐकण्याचा थेट योग आला नाही. परंतु पुढील काळात 'यु ट्यूब' वर या मैफिलीचा योग जुळून आला.

रवींद्र मिराशी

( सध्याच्या काळात अनेक नवोदित कलाकारांना शास्त्रीय संगीताच्या दुनियेमध्ये 'परफॉर्मिंग आर्टिस्ट' या व्याख्येत अल्पावधी मध्ये जाऊन बसायचे आहे. अशा कलाकारांसाठी सन १९८० मधील गानसरस्वती किशोरीताईंची मुंबई येथील मैफल निश्चित एक आदर्श उदाहरण ठरेल असे वाटते. हा आदर्श का ठरेल, तर या मैफिलीत अल्पावधीत 'परफॉर्मिंग आर्टिस्ट' व्याख्येत बसण्याचे कोणतेच लक्षवेधी उद्योग नाहीत. विलंबित काही ठिकाणी अतिविलंबित ख्याल गायन चालू आहे. पूर्ण मैफिलीत तानांचे स्वरलिपीतील नोटेशन पाठांतर नाही, का लक्षवेधी तराणा नाही. द्रुत ख्याल नाममात्र आहे. मुख्य म्हणजे ठराविक अंतराने सोलो तबलावादन नाही. मात्र तरीही किशोरीताईंनी उच्च दर्जाची कलाकृती साकारली आहे. )

सन १९८० मधील गानसरस्वती किशोरीताईंची मुंबई येथील मैफल ऐकण्याचा थेट योग आला नाही. परंतु पुढील काळात 'यु ट्यूब' वर या मैफिलीचा योग जुळून आला. मैफिलीच्या प्रारंभीच दोन्ही तानपुऱ्याचे नादसौंदर्य विलक्षणरित्या एकमेकांत मिसळून गेल्याची जाणीव होते. साथसंगतीचा उल्लेख मला आवर्जून प्रारंभी करावासा वाटतो.

जो शेवटी करण्याचा प्रघात आहे. या गायनामध्ये तानपुऱ्याची आणि गायन साथ करताना, श्रीमती माणिक भिडे यांनी आपल्या अतिशय मुलायम आणि मधुर आवाजात सांगीतिक संवाद साधला आहे. तबला साथ करताना उस्ताद निजामुद्दीन खां साहिबांनी शास्त्रीय संगीताची चौकट कोठेही ओलांडलेली नाही. तबला पूर्ण मैफिलीत कोठेही टिपेच्या आवाजात नाद करत नाही. उस्ताद सुलतान अहमद खां साहिबांची सारंगी, किशोरीताईंच्या बरोबरीने गाते आहे. संवादिनीची साथ साक्षात पंडित आप्पा जळगावकर करत आहेत.

एखाद्या व्यक्तीच्या मागे जेव्हा 'साक्षात' हा शब्द लिहावा वाटतो, तेव्हा ते व्यक्तिमत्व अर्थातच खूप उंचीचे असते. उदा. पंडित तुळशीदास बोरकर, पंडित आप्पा जळगावकर, पंडित डॉ. अरविंद थत्ते. केवळ संगीत रसिक श्रोता या भूमिकेतून माझ्या छोट्याशा आयुष्यातील ही एका आगळ्या उंचीवरील नावे आहेत, की ज्यांच्या मी कैक जिवंत मैफिली ऐकल्या आहेत. या मैफिलीची एक विशेष खासियत अशी की, साथसंगत किती उच्च दर्जाची असावी ! याचे एक उत्तम उदाहरण. नाद सौंदर्याच्या प्रसन्न वातावरणात किशोरीताई नकळत आपला सुर मिसळतात. गायनाचा प्रारंभ किशोरीताईंनी 'खेम' या रागाने केला आहे. या रागासाठी त्यांनी उस्ताद अल्लादिया खां साहिबांची....

बालमवा तुम बिन,

रैन दिना जुगत बितत ।

बेगी सुध लो मोरी अहमदपिया,

दरसन देहो नित नित ॥

ही रचना निवडली आहे. किशोरीताईंची आई म्हणजे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर. या जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादिया खां साहिब यांच्या शिष्या. 'खेम' रागातील हा ख्याल विलंबित अद्धा मध्ये आहे.

अर्थात काही ठिकाणी तो अति विलंबित आहे, असा देखील भास होतो. राग म्हणजे एक भाव आहे, असे ताईंचे म्हणणे असायचे. तो भाव म्हणजे मनाची एक अंतरीक अवस्था. जी कलाकार संगीताच्या माध्यमातून अभिव्यक्त करतो. त्या त्या रागातील ठराविक भावाच्या वातावरणामध्ये एकरूप होऊन जाणे, हीच मुळात किशोरीताईंच्या गायनातील तपश्चर्या अथवा साधना असायची. 'खेम' हा राग म्हणजे 'यमन' रागाचे उत्परिवर्तन (म्युटेशन) म्हणण्यास हरकत नाही, असे मला वाटते. म्हणजे 'ब्यूटिफुल व्हेरिएंट ऑफ राग यमन'. 'यमन कल्याण' आणि 'खेमकल्याण' हे दोन्ही राग अगदी एकमेकांचे शेजारी.

'निरेगम धनीसा' आणि 'सारेगम धनीसा' एवढाच स्वर क्रमवारीमध्ये फरक आहे, अशी अश्विनीताईंनी (भिडे -देशपांडे) एका मैफिलीत उकल केली आहे. जसजशी किशोरीताईंची 'खेम' रागाची मैफल पुढे सरकते आहे, तस तसे ताई या रागाच्या भावाशी अधिकाधिक एकरूप होऊन जात आहेत. अर्थात कला सादर करताना कलाकाराचे 'चित्त' योग्य जागेवर असेल, तर श्रोत्यांचे आपसूकच तेथे येते.

एखादा राग गाताना ताईंच्या डोक्यामध्ये त्या रागाची विपुल सामग्री (मटेरियल) असते. त्यामुळे पुनरावृत्ती होत नाही. उलटपक्षी श्रोत्यांना त्या रागाच्या विविध भाव रूपांचे दर्शन होते. सध्याच्या काळात 'परफॉर्मिंग आर्टिस्ट' या व्याख्येत बसणारे कोणतेच उद्योग या मैफिलीत नाहीत. विलंबित काही ठिकाणी अतिविलंबित ख्याल गायन चालू आहे. पूर्ण मैफिलीत तानांचे स्वरलिपीतील नोटेशन पाठांतर नाही, का लक्षवेधी तराणा नाही. एक सारख्या लयीत सर्व संगीत श्रोत्यांना बरोबर घेऊन अखंड सांगीतिक प्रवास चालू राहतो आहे. कोणत्याही लक्षवेधी करामती नसताना सुद्धा मातब्बर कलाकार मैफल कशी जिंकतो ! हे नवोदित कलाकारांसाठी आदर्श उदाहरण. अखेरीस...

'मोरा मनहर ना आयो री

बीती जाए सावन'

ही द्रुत बंदिश तसे पाहायला गेले तर केवळ दोन-तीन मिनिटाची आहे. ही ताईंची स्वतःची रचना आहे. जी त्यांनी अद्धा तीन तालामध्ये गायली आहे. जे संगीत रसिक श्रोते किशोरीताईंच्या या 'खेम' रागाच्या सांगितीक प्रवासात एका 'लयी' मध्ये एकरूप होऊन वाटचाल करत आहेत, त्यांना या रागातील भावाचे अत्युच्च दर्शन घडते आहे. जणू देवी सरस्वतीच्या दरबारातील गानसरस्वतीचे गायन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT