BMH26A09819
फोटो ओळी -
भूम ः तालुक्यातील ईडा येथील बाणगंगा साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी माजी आमदार राहुल मोटे, राजाराम घावटे व इतर.
......................
बाणगंगा कारखान्यात मिल रोलरचे पूजन
भूम, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील ईडा येथील राजगंगा शुगर ॲण्ड अलाइड प्रॉडक्ट्स संचलित बाणगंगा साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते मिल रोलरचे रविवारी (ता. २०) पूजन करण्यात आले. त्यामुळे कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावेळी राजगंगा ग्रुपचे राजाराम घावटे, संचालक प्रसाद पावटे, ज्येष्ठ नेते महादेव खैरे, तात्यासाहेब गोरे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. माजी आमदार मोटे म्हणाले की, बाणगंगा साखर कारखाना हा परंडा-भूम-वाशी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधार आहे. यंदाचा गळीत हंगाम शेतकरी बांधवांसाठी आर्थिक समृद्धी घेऊन येवो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई आणि वाढता उत्पादन खर्च अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी ऊस पीक जोपासले आहे. त्यामुळे गळीत हंगाम सुरू होणे ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारी बाब ठरणार आहे. मिल रोलर पूजनानंतर यंत्रसामग्रीची अंतिम तयारी, विविध विभागांतील कामे आणि हंगामपूर्व नियोजनाला वेग आला असून, बाणगंगा कारखान्याच्या प्रत्यक्ष गाळपाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.
.......................
वांगी खुर्दची जलयोजना रखडली
भूम, ता. २१ (बातमीदार) : भूम तालुक्यातील वांगी खुर्द येथे जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याची टाकी व पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असले, तरी पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या विहिरीचे काम रखडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी हा प्रश्न आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
ग्रामस्थांची समस्या जाणून घेत आमदार सावंत यांनी धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. गावात जलजीवन मिशनअंतर्गत टाकी व पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पाण्याचा स्रोत असलेल्या विहिरीचे काम अपूर्ण असल्याने संपूर्ण योजना उपयोगात येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. विहीर बांधण्यासाठी जागेची अडचण असल्यास ग्रामस्थांकडून जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेण्यात येईल. तसेच आवश्यक जागेचे दानपत्र प्रशासनाकडे देण्यात येईल. त्यामुळे विहिरीच्या कामाला मंजुरी देण्यास विलंब का, असा सवाल सावंत यांनी केला.
दत्तात्रय साळुंके आवश्यक पत्र घेऊन कार्यालयात येतील. संबंधित प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडदळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता प्रशासनाच्या कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.