Dead Bodies
Dead Bodies Sakal
छत्रपती संभाजीनगर

'त्या’ मृतदेहावर तब्बल ३६ तासांनी अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

पाचोड - पत्नीच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यातील तरुणाला पोलिसांनी ठाण्यात आणून पैशासाठी बेदम मारहाण केली तसेच दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलविल्याने त्याने पोलिसांच्या धास्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप करीत मृत तरुणांच्या नातेवाइकांनी पोलिसांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करावी, अशी मागणी करीत तब्बल नऊ तास मृतदेह मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर ठेवल्याची घटना पाचोड (ता. पैठण) येथे घडली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे नातेवाइकांनी मंगळवारी ताब्यात घेऊन सदर तरुणावर अंत्यसंस्कार केले.

पोलिसांनी सांगितले की, मोहन गोरख राठोड (वय २४, रा. दाभरूळ तांडा ता. पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. दाभरूळ तांडा येथील रोशनी मोहन राठोड (वय २२) या विवाहितेने पती मोहन व अन्य सहा जणांविरुद्ध माहेरहून दीड लाख रुपये आणण्यासाठी छळ करीत असल्याची शनिवारी (ता.११) तक्रार दिली होती. यामुळे पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशीसाठी मोहन राठोड व इतरांना बोलावून घेतले होते. त्यानंतर पती मोहन यास सोडून देण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यास पुन्हा पोलिसांनी बोलावले होते, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे.

मात्र, पोलिस पुन्हा मारतील या धाकाने मोहन राठोड याने सोमवारी (ता.१३) जामखेड शिवारातील जांबुवंताच्या डोंगर पायथ्याशी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता दुपारी बारा वाजता मृतदेह मिळून आला. त्यामुळे संतापलेल्या शेकडो नातेवाइकांनी मोहन राठोड यास खासगी वाहनाद्वारे पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रम ठाकरे यांनी तपासून मृत घोषित केले. तोच मृतदेह नातेवाइकांनी सोमवारी दुपारी तीन वाजता थेट पोलिस ठाण्यात आणला.

यावेळी उपस्थित सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी चर्चा केली असता नातेवाइकांनी उपरोक्त कैफियत मांडून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी केली. नसता उत्तरीय तपासणी करू देणार नाही तसेच मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका घेतली.

या घटनेची माहिती मिळताच पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी पाचोड येथे धाव घेऊन नातेवाइकांची समजूत काढत मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊन डॉक्टरांचा अहवाल मिळताच दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. मात्र सोमवारी रात्रीचे बारा वाजले तरी नातेवाईक जुमानत नसल्याचे पाहून औद्योगिक पोलिस ठाणे, पैठण व बिडकीन पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर रात्री बारा वाजता पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून मृतदेह टाकून नातेवाइकांना इच्छितस्थळी उत्तरीय तपासणीसाठी नेण्यासाठी विनंती केली. एक तास उलटला तरी कुणीच नातेवाईक रुग्णवाहिकेत बसत नसल्याने पोलिस ठाण्यात उभी राहिली.

अखेर पोलिसांनी सदरील मृतदेह पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयाच्या शवागृहात आणून ठेवला. यानंतर मंगळवारी (ता.१४) उजाडला तरी उशिरापर्यंत नातेवाइकांनी शवविच्छेदनास विरोध दर्शवीत संबंधितावर गुन्हे नोंदवून अटक करण्याची मागणी लावून धरली. अनेकांच्या मनधरणीनंतर नातेवाइकांनी मंगळवारी दुपारी शवविच्छेदनास सहमती दर्शविली. दुपारी एक वाजता वैद्यकीय अधिकारी डॅा. बाबासाहेब घुगे यांनी प्रक्रिया पार पाडली. दुपारी शोकाकुल वातावरणात गावी दाभरूळ तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून संबंधितांनी दोन पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दिली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, उपनिरीक्षक सुरेश माळी करीत आहे.

मृतदेहाचा शवविच्छेदनानंतर अहवाल प्राप्त होताच दोषींवर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

- विशाल नेहुल (उपविभागीय पोलिस अधिकारी, पैठण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

SCROLL FOR NEXT