भूजलपातळी वाढविणारा ‘जलतारा’ उपक्रम
-
कमी खर्चात जलसंधारण ः शेतकऱ्यांना सहा हजारांचे अनुदान
-
युवराज धोतरे
उदगीर, ता. १५ ः पावसाचे पाणी वाहून जाते आणि उन्हाळ्यात विहिरी, कूपनलिका कोरड्या पडतात. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. बदलत्या हवामानामुळे पावसाची अनिश्चितता आणि दुष्काळाचे सावट लक्षात घेता, पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कमी खर्चात भूजलपातळी वाढविणारा ‘जलतारा’ उपक्रम शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा जास्तीत- जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने शेतीसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरविल्यास भूजलसाठा वाढण्यास मदत होते. यासाठी ‘जलतारा’ ही साधी, कमी खर्चाची आणि उपयुक्त संकल्पना आहे. शेतजमिनीच्या उताराच्या दिशेला चार फूट लांब, चार फूट रुंद आणि सहा फूट खोल खड्डा काढून तो मोठे दगड व गोट्यांनी भरायचा असतो. त्यामुळे पावसाचे वाहते पाणी या खड्ड्यात जमा होऊन जमिनीत मुरते. परिणामी, जमिनीची धूप रोखण्याबरोबरच भूजलपातळी सुधारण्यास मदत होते.
तापमानवाढीचे परिणाम कमी करणे, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर आणि जलसंधारणाला चालना देणे, अशा व्यापक उद्देशांनीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. जलतारा प्रकल्पासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
----
...असा उभारावा जलतारा प्रकल्प
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलतारा उपक्रम राबविला जातो
प्रकल्पासाठी सहा हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध
शेतजमिनीच्या उताराच्या दिशेला चार फूट लांब, चार फूट रुंद व सहा फूट खोल खड्डा काढावा
खड्डा मोठे दगड आणि गोट्यांनी भरावा
पावसाचे पाणी खड्ड्यातून जमिनीत मुरल्याने भूजलपातळी वाढण्यास मदत होते
अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा
---
कोट
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलतारा उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत- जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून योजनेची माहिती घ्यावी.
-नरेंद्र मेडेवार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उदगीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.