सांस्कृतिक
सांस्कृतिक sakal
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Muktisangram 2023 : सामाजिक अभिसरण प्रक्रिया गतिमान व्हावी

सकाळ वृत्तसेवा

निजामकालीन हैदराबाद संस्थानात असलेल्या मराठवाड्यात दलितांवर अन्याय-अत्याचार होतच होते. मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यावरही दलितांना दुजाभावाची वागणूक मिळाली. या पार्श्वभूमीवर दलित-दलितेतर संवाद साधणाऱ्या काही सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक चळवळी मराठवाड्यात झाल्या. पण, पुरोगामी-डाव्या चळवळी आता कमकुवत झाल्यामुळे सामाजिक अभिसरणाची प्रक्रियाही मंदावली आहे. ती परत गतिमान व्हावी ही अपेक्षा, दुसरे काय?

बी. व्ही. जोंधळे

हैदराबादच्या निजाम संस्थानात मराठवाड्यासह असलेल्या हिंदू प्रजेस निजामी सत्तेकडून दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या गळचेपीबरोबरच हिंदू प्रजा धर्मांध रझाकारांच्या छळासही बळी पडत होती. मात्र, हिंदू प्रजेपेक्षाही दलित समाजाची अवहेलना ही सर्वाधिक होती. दलितांना शिक्षण, रोजगार नव्हता. त्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्यात येत होते. दारिद्र्य, निरक्षरता, जातीय अत्याचार,

अपमान, छळ हा त्यांच्या पाचविलाच पुजला होता. हैदराबाद संस्थानातील एम. व्ही. भाग्यरेड्डी वर्मा, अरिग्ये रामस्वामी, एम. एल. औंधिया, बी. एस. व्यंकटराव, बी. शामसुंदर आदी दलित नेते संस्थानात अस्पृश्योद्धाराची चळवळ चालवीत होते. भाग्यरेड्डी वर्मा आर्य समाजाच्या माध्यमातून अस्पृश्य समाजात जनजागृती करत होते. पुढे त्यांनी ‘जगन्मित्र’ ही संघटना स्थापन केली. महात्मा गौतम बुद्ध, संत चोखामेळा आदींच्या जयंत्या साजऱ्या करण्यात त्यांचा पुढाकार होता.

सामाजिक जनजागृतीसाठी त्यांनी वर्ष १९२५ मध्ये ‘भाग्यनगर’ तर वर्ष १९३४ मध्ये ‘आदी हिंदू पत्रिका’ अशी दोन नियतकालिके काढली. हैदराबाद संस्थानातील ते पहिले दलित पत्रकार होते. त्यांच्यासोबत मराठवाड्यातील तुकाराम बनसोडे, लक्ष्मण कांबळे, तुकाराम गाडे प्रभृती मंडळी समाजजागरणाचे काम करीत होती. पुढे भाग्यरेड्डी वर्मा, वामनराव नाईक, न्या. केशवराव कोरटकर यांनी ‘सोशल सर्व्हिस लीग’ची स्थापना केली.

या संघटनेने अस्पृश्यता निवारण, अस्पृश्यांना धर्मांतरापासून परावृत्त करणे, शिक्षणाचा प्रसार करणे आदी कामे केली. ‘सोशल सर्व्हिस लीगने’ मराठवाड्यात सामाजिक सुधारणेच्या नांदेड जिल्ह्यातील हादगाव भागात तीन परिषदाही घेतल्या होत्या. वर्ष १९२२ मध्ये अरिग्ये राम स्वामी यांनी ‘आदी हिंदू जात्योन्नती सभा’ या संस्थेची स्थापना केली. बी. एस. व्यंकटराव यांनी वर्ष १९२० मध्ये ‘आदी द्रविड संघम’ आणि वर्ष १९३८ मध्ये ‘डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन’ ही संघटना स्थापन केली. हैदराबाद संस्थान आणि मराठवाड्यातील दलित चळवळीचा इथे ओझरता उल्लेख एवढ्याचसाठी केला की आंबेडकरपूर्व दलित जनजागृतीच्या उल्लेखनीय चळवळी हैदराबाद आणि मराठवाडा विभागात झाल्या.

आंबेडकरी चळवळीला मराठवाड्यात खऱ्या अर्थाने वेग आला तो ३० डिसेंबर १९३८ मध्ये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत झालेल्या मक्रणपूर (ता. कन्नड) येथील दलित परिषदेनंतर. या परिषदेचे संयोजक होते दलितमित्र स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब मोरे व दुसरे शामराव जाधव. या परिषदेत भाऊसाहेब मोरे यांनी मराठवाड्यातील दयनीय दलित जीवनाची कैफियत बाबासाहेबांसमोर मांडली होती.

यावेळी बाबासाहेबांनी दलित समाजाला शिक्षण घ्या, धर्मांतर करू नका, गलिच्छ कामे सोडा, अन्यायाविरुद्ध लढा असा उपदेश करतानाच निजाम हा भारताचा व दलितांचा शत्रू असल्यामुळे त्याला सहकार्य करू नका, असे आवाहन केले. परिणामी, भाऊसाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली समाजप्रबोधनाची चळवळ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात जशी गतिमान झाली तसेच मराठवाड्यातील शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी निजामविरोधी लढ्यात भाग घेतला. निजामविरोधी संघर्षात दलितांनी तुरुंगवास भोगून हौतात्म्यही पत्करले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हैदराबाद मुक्तिसंग्रामात एक घटनातज्ज्ञ व कायदेपंडित म्हणून मोठे योगदान राहिले आहे.

हैदराबाद संस्थानातील मराठवाड्याचे तत्कालीन पाच जिल्हे १९५७ मध्ये द्वैभाषिक महाराष्ट्रात सामील झाले होते. याच दरम्यान वर्ष १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. धम्म स्वीकारामुळे खेडोपाडीच्या धर्मांतरित बौद्ध समाजात अस्मिता चेतविली गेली आणि हाच अस्मितेचा जागर सवर्ण समाजाच्या रोषास कारणीभूत ठरला.

खेडोपाडी बौद्ध-सवर्ण सांस्कृतिक संघर्ष पेटला. दलित समाजावर अन्याय-अत्याचार वाढत्या प्रमाणात होऊ लागले. गावोगावी बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आले. बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना होऊ लागली. खेडोपाडी हा जो सांस्कृतिक संघर्ष पेटून दलित-दलितेतर दुरावा निर्माण झाला. तो संपुष्टात यावा म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड व राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक अभिसरणाच्या नावाखाली वर्ष १९६७ मध्ये काँग्रेस-रिपब्लिकन युती घडवून आणली.

युतीचा परिणाम म्हणून रिपब्लिकन पक्षाला प्रत्येक जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापतिपद मिळाले. युतीमुळे बौद्ध समाजावरील अत्याचार फार काही थांबले नाहीत. वर्ष १९७०-७१ मध्ये महाराष्ट्रातील दलित समाजावर वाढत्या प्रमाणात अत्याचार होऊ लागले. परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथे दोन दलित स्त्रियांची विवस्त्र धिंड काढण्यात आली होती. नागपूरजवळील वरणगाव येथे रामदास नारनवरे या युवकाचा बळी देण्यात आला होता. पुणे जिल्ह्यात बावडा येथे दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आला होता. अशात केंद्र सरकारने दलित समाजावर होणाऱ्या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या लाया पेरूमल कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला.

या अहवालाने १११७ दलितांच्या हत्या सवर्ण समाजाने केल्याचे आपल्या अहवालात नमूद केले. परिणामी, दलित समाजात एक मोठा असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर ९ जुलै १९७२ रोजी दलित पँथरची स्थापना मुंबईत झाली. मराठवाड्यातही दलित पँथरचे लोण झपाट्याने पसरले. गंगाधर गाडे, अॅड. प्रीतमकुमार शेगावकर, एस. एम. प्रधान या सारख्या झुंझार लढाऊ नेत्यांसह शेकडो तरुण तडफदार कार्यकर्ते पँथरमध्ये समाविष्ट झाले. पँथरने आपला दरारा निर्माण केला. पण, पँथरच्या शिवराळ भाषेमुळे आणि त्यांनी देवदेवतांवर केलेल्या टीकेमुळे दलित-दलितेतर संवाद न होता दलित-दलितेतर दुरावा वाढत गेला. अर्थात पँथरचा उद्रेक सच्चा होता. त्यांचा रागही स्वाभाविक होता.

पण, उद्रेकाच्या लाटेत दोन समाजात कटुता मात्र यायला लागली. या पार्श्वभूमीवर वर्ष १९७२-७३ मध्ये प्रा. अविनाश डोळस, प्रा. प्रकाश सिरसाट, माधव मोरे आदी तरुणांनी दलित युवक आघाडीची स्थापना करून दलित-दलितेतर संवाद साधण्याचे सहिष्णू समाजकारण केले. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजमाती, विमुक्त, भटक्या निमभटक्या व कमी उत्पादनातील गट यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

वाढीसाठी युक्रांद-रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन यांनी एकत्र येऊन २६ जानेवारी १९७४ पासून शिष्यवृत्तीवाढ आंदोलन सुरू केले. या आंदोलनात दलितेतर विद्यार्थीही सामील असल्यामुळे सामाजिक अभिसरणाचा संदेश सर्वदूर गेला. बाबाआढावांचा ‘एक गाव एक पाणवटा’ हा सामाजिक संवाद साधणारा उपक्रमसुद्धा दलित युवक आघाडीने राबविला. मराठवाडा विकास आंदोलनातही दलित नेते-दलित संघटना सहभागी झाल्या होत्या. दलित युवक आघाडी, युक्रांद, रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनने जी आंदोलने केले ती सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्याचे शैक्षणिक मागासलेपण लक्षात घेऊन ज्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) वर्ष १९५० मध्ये स्थापना केली. मिलिंद महाविद्यालयाने केवळ मराठवाड्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात एक मोठा क्रांतिकारी बदल घडवून आणला. विद्यार्थी चळवळीचा पाया मिलिंद परिसरातील विद्यार्थ्यांनीच रचला.

मिलिंदमुळेच पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद या राष्ट्रीय नेत्यांचे दर्शन प्रथमच मराठवाड्याला झाले. विशेष म्हणजे दलित साहित्य संकल्पनेची पायाभरणी मिलिंदमध्येच झाली व मग पुढे दलित साहित्याचे पीक तरारून आले. या साहित्य विचारला प्राचार्य म. भि. चिटणीस, डॉ. म. ना. वानखेडे, भालचंद्र फडके यांनी उजाळा दिला. ३० एप्रिल १९६७ रोजी बौद्ध साहित्य परिषदेने आपले साहित्य संमेलन भरविले होते. दलित साहित्याच्या या वादळी चर्चेचा परिणाम म्हणूनच डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या ‘अस्मितादर्श’चा उदय झाला. ‘अस्मितादर्श’ हे दलित साहित्याचे मुखपत्र ठरले. प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणीचे पक्षी’ हे दाहक आत्मकथन याच कालखंडात साहित्यविश्वात वादळ उठवून गेले.

मिलिंद ही दलित साहित्याची जन्मभूमी ठरली. या महाविद्यालयाने दलित नाट्यचळवळीचीही मुहूर्तमेढ रोवली. बाबासाहेबांच्या सूचनेनुसार प्राचार्य म. भि. चिटणीस यांनी ‘युगयात्रा’ हे पहिले दलित जीवनावर आधारित नाटक लिहिले जे दलित नाट्य चळवळीची पायाभरणी करणारे ठरले. ‘युगयात्रा’ हे नाटक रामायण काळातील शंबुकाच्या वधापासून सुरू होऊन बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनाचा संदेश देऊन संपते. ‘युगयात्रा’चा प्रयोग नागपूरच्या दीक्षाभूमीवरही धम्मदीक्षेच्यावेळी हजारोंच्या उपस्थित सादर झाला. वंचितांच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक चळवळीस ‘युगयात्रा’ने एक परिवर्तनाची दिशा दाखविली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महान ज्ञानर्षी, प्रकांड पंडित, थोर शिक्षणतज्ज्ञ छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून मराठ‌वाड्यात त्यांनी उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. शिवाय बाबासाहेबांचे मराठवाडाप्रेमही वादातीत होते. अशा थोर महामानवाचे नाव मराठवाडा विद्यापीठास देऊन शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे उचित स्मारक उभारावे, अशी मागणी आंबेडकरानुयायांनी केली.

पण, संतांची भूमी म्हणविणाऱ्या मराठवाड्यात नामांतरास तीव्र विरोध झाला. खेडोपाडी हिंसाचार उफाळून आला. दलितांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली, जनार्दन मवाडे, पोचीराम कांबळे यांचे बळी घेण्यात आले. फौजदार भुरेवारांना पेटविले गेले. ज्यांना विद्यापीठ म्हणजे काय हेही माहीत नाही अशा गोरगरीब लोकांवर अंगावर शहारे आणणारे अत्याचार केले गेले. सरकारी मालमत्तेची नासधूस करण्यात आली. आणि हे सारे कोणत्या नावाखाली? कशासाठी? तर मराठवाड्याच्या अस्मितेच्या सबबी खाली.

पण, ही मराठवाड्याची अस्मिता नव्हती तर अस्मितेच्या नावाखाली उफाळून आलेली दलितविरोधी जातीय मानसिकता होती. नामांतर चळवळीस जातीय स्वरूप येत चालले होते. अशावेळी नामांतराच्या बाजूने नामांतरवादी दलितेतर मंडळी ठामपणे उभी राहिली. शरद पवार, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, डॉ. कुमार सप्तर्षी, बाबा आढाव, पत्रमहर्षी बाबा दळवी, प्रा. बापूराव जगताप, कॉ. मनोहर टाकसाळ, फ. मुं. शिंदे, प्रा. मोतीराज राठोड, प्रा. सुरेश पुरी, प्राचार्य राजाराम राठोड, प्रा. सुधीर गव्हाणे अशा कितीतरी परिवर्तनवादी मंडळींनी नामांतराचा पुरस्कार केला.

त्यांनी नामांतर लढा जातीनिरपेक्ष व्यापक करण्यात मोलाचा वाटा उचलला. विद्यापीठाचे नामांतर हा काही विद्यापीठाची पाटी ब‌घण्याचा, बदलण्याचा लढा नव्हता तर तो दलितविरोधी मानसिकता बदलण्याचा लढा होता. आता प्रश्न असा की नामांतरानंतर खरोखरच दलितविरोधी मानसिकता बदलली आहे काय? या प्रश्नाचे उत्तर ज्याने त्याने आपल्या मनाशी दिलेले बरे.

(लेखक दलित राजकारण व चळवळीचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT