प्रभाकंवर म. सा. जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर, ता. १३ : कर्नाटक गजकेसरी पूज्य गुरुदेव श्री गणेशलाल म. सा यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र प्रवर्तिनी, ज्ञानगंगोत्री गुरुवर्या पूज्य प्रभाकंवर म. सा यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त कुंभारवाडा येथील महावीर भवनात १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान विविध धार्मिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडत आहेत.
या सोहळ्यात शनिवारी (ता.१४) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत उत्कर्ष समितीच्या वतीने ‘एक शाम भारत के नाम’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अधिवक्ता अश्विनी उपाध्याय हे मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला जिनशासन प्रभाविका पूज्य साध्वी चैतन्यश्री म. सा आदी ठाणा-४ यांचे सान्निध्य लाभणार आहे. रविवारी (ता. १५) सकाळी ८.३० ला गुरुदेव श्री गणेशलाल म. सा यांची १४७ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. या सोहळ्याला साध्वी चैतन्यश्री म. सा, डॉ. जिनाश्री म. सा, सुबोध म. सा आणि निर्मितीप्रभा म. सा आदी ठाणा-४ यांचे पावन सान्निध्य लाभणार आहे. यावेळी सामूहिक तेला तप, नवकार महामंत्र आराधना, गुरू गणेश जाप, स्वाध्याय आणि भव्य गुरू गुणगान आदी धार्मिक उपक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन मोतीलालजी संचेती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्योतीबाई मोतीलालजी संचेती, वैजापूर यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.
----------
सोमवारी बहीण-बेटी संमेलन
दरम्यान, सोमवारी (ता.१६) कुंभारवाडा येथील महावीर भवनात बहीण-बेटी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिनशासन प्रभाविका पूज्य साध्वी श्री चैतन्यश्री म.सा आदी ठाणा-४ यांच्या पावन सान्निध्यात हा कार्यक्रम होणार आहे.
या उपक्रमासाठी मागीलाल मानकचंद फुलपगर, तुषार राजेंद्र खिवंसरा, सुशीलाबाई मदनलाल देसरडा, नूतन शैलेश कांकरिया आणि सुनीता शेखर देसरडा यांचे सहकार्य लाभले आहे.